दिल्लीच्या कमानी सभागृहात पंचम निषाद या संस्थेच्या वतीने ‘बोलावा विठ्ठल’ हा संगीतमय कार्यक्रम रंगला. पंडित संजीव अभ्यंकर, जयतीर्थ मेवुंडी व देवकी पंडित या मान्यवर कलाकारांनी अवीट गोडीची भक्तिगीते सादर करून वाहवा मिळविली. पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या दिल्लीकरांनी यानिमित्ताने आषाढी एकादशीपूर्वीची आषाढी साजरी केली. तिन्ही कलावंतांनी श्री विठ्ठलाची ही स्वर-पूजा बांधली! त्यांना अमर ओक, सूर्यकांत सुर्वे, प्रकाश शेजवळ आणि साई बनकर यांनी समर्थ साथसांगत केली. या कार्यक्रमाला मराठी बांधवांसह िहदी भाषिक रसिकांनीही उत्स्फूर्त हजेरी लावली. अच्युत पालव यांनी विठ्ठलाचे देखणे चित्ररूप व्यासपीठावर साकारले होते. पंचम निषादने सलग दहाव्या वर्षी आषाढीनिमित्त अभंगवाणीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. शशी व्यास यांनी प्रास्ताविक करताना मुक्ती आणि मोक्ष या संकल्पनांबरोबरच आत्मानंदाची अनुभूती देणारा परमोक्ष भारतीय संगीतातूनच मिळतो असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचा दमदार प्रारंभ करताना अभ्यंकर व मेवुंडी यांनी जय जय राम कृष्ण हरी हा अभंग सादर केला. मेवुंडी यांनी रूप पाहता लोचनी, विसावा विठ्ठल, ओमकार उकार मकार, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, परी विठ्ठल अपरंपार ही पंचपदी सादर केली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या सभाग्यदा लक्ष्मी बराम्मा व राजस सुकुमार या लोकप्रिय रचना लोकाग्रहास्तव सादर करताना मेवुंडी यांनी यथोचित न्याय दिला आणि या अभंगांना टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. अभ्यंकर यांनी आणिक दुसरे मज नाही आता, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, आणि देवा पांडुरंगा हे अभंग विलक्षण सुरेलपणे रंगवले. त्यांच्या गायनाला दिल्लीकरांची मोठी दाद मिळते हे पुन्हा दिसून आले. देवकी पंडित यांनी या पंढरीचे सुख, अबीर, गुलाल उधळीत रंग या रचना सादर केल्या. आपले गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांची आठवण जागविली. मजवरी कृपा करा- ताटी उघडा ज्ञानेश्वरा या अभंगाला उत्स्फूर्त दाद मिळाली. या अभंगवाणीने तृप्त झालेले कानसेन, तीर्थ विठ्ठल, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा आणि अबीरगुलाल हे अभंग गुणगुणतच घरी परतले..!