वॉल्ट डिज्नी या चित्रकाराने जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर इतिहास घडवला. त्याने कागदावरील कार्टूनला अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञान व दूरदर्शनच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवले. त्याने निर्माण केलेल्या मिकी माऊस, डोनाल्ड डक, गुफी, सिम्बाया या कार्टून व्यक्तिरेखांनी लोकप्रियतेची सर्वोच्च पातळी गाठली. प्रचंड संघर्ष करून त्याने तयार केलेली ‘द वॉल्ट डिज्नी’ ही आज जगातील सर्वात मोठी मीडिया कंपनी म्हणून ओळखली जाते. परंतु मनोरंजन क्षेत्रावर राज्य करणारी ही कंपनी आज आर्थिक कोंडीत सापडली आहे. गेल्या काही वर्षांत या कंपनीने तयार केलेले चित्रपट एकामागून एक पडल्यामुळे त्यांना मोठय़ा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. आणि या संकटातून बाहेर येण्यासाठी या कंपनीने आता स्वत:चीच एक वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही वर्षांत वॉल्ट डिज्नीचे उत्पन्न १३ टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे त्यांना प्रतिवर्ष १४.१६ कोटी अमेरिकी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागते आहे. या आर्थिक कोंडीतून बाहेर येण्यासाठी त्यांनी आपल्या चित्रपट वितरणाचे हक्क ‘नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट’ या कंपनीना दिले. परंतु त्यातूनही त्यांना अपेक्षित नफा मिळवता आला नाही. परिणामी त्यांची परिस्थिती आणखीन खालावत गेली. शेवटी यातून बाहेर येण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याची गरज आहे असे मानणाऱ्या बॉब यांनी डिज्नी वाहिनीची घोषणा केली. या वाहिनीवर डिज्नीने आजवर तयार केलेले सर्व चित्रपट, मालिका व कार्टून दाखवण्यात येतील. या बातमीमुळे कार्टून चित्रपट चाहते सुखावले आहेत. कारण त्यांना याआधी कार्टूनपट पाहण्यासाठी युटय़ूब, नेटफ्लिक्स यांसारख्या इंटरनेट वाहिन्यांवर अवलंबून राहावे लागत होते. तसेच डिज्नीच्या काही वाहिन्या कार्यरत असल्या तरी त्यांची व्याप्ती फार नसल्यामुळे चाहत्यांची निराशा होत होती. पण आता चोवीस तास टीव्ही व इंटरनेटवर चालणारी वाहिनी येणार असल्यामुळे चाहत्यांना दर्जेदार कार्टूनपटांचा आस्वाद घेता येईल.