शाहरूख खान आणि अनुष्का शर्माला अद्याप हरवलेली अंगठी सापडली नाही. कोणती अंगठी असा प्रश्न तुम्हाला पडला ना? ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे दोन आठवडे राहिले आहेत आणि या चित्रपटातच सेजल म्हणजेच अनुष्का शर्माची अंगठी हरवते आणि ते शोधून देण्यात हॅरी म्हणजेच शाहरूख तिची मदत करत असतो. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. शाहरूख आणि अनुष्काचा मजेदार आणि तितकाच रोमॅण्टिक प्रवास या ट्रेलरमधून दाखवण्यात आलाय.

याआधी चित्रपटाचे मिनी ट्रेलर्स पाहायला मिळाले होते. आता हा तीन मिनिटांचा ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्याची अधिक उत्सुकता निर्माण होते. अनुष्काला तिची अंगठी मिळते का, अंगठी शोधण्याच्या या प्रयत्नात ती शाहरूखच्या प्रेमात कशी पडते या सर्व प्रश्नांची उत्तरे ४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत तुम्हाला मिळेलच.

ट्रेलर पाहून मनमौजी हॅरीच्या प्रेमात तुम्हीही नक्कीच पडाल. मनमौजी अंदाज, स्वतंत्रपणे जगणारा, मनासारखा वागणारा हॅरी या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. या प्रवासात त्याला सेजल म्हणजेच अनुष्कात भेटते. दोघांमध्ये प्रेम फुलते मात्र एका सर्वसामान्य टूर गाईडसाठी सेजल आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सोडेल का, याचे उत्तर ४ ऑगस्टलाच मिळेल.

वाचा : ‘रिमिक्स गाणी म्हणजे सुंदर बनारसी साडीला फाडून केलेली बिकिनी’

चित्रपटातील गाण्यांच्या प्रदर्शनासाठी नाईट क्लबमध्ये फिरणे असो, मिनी ट्रेलर्स असो किंवा चाहत्यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या शहरांत फिरणे असो शाहरूख आणि अनुष्काने प्रमोशनसाठी अनोखे फंडे आजमावले. ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’नंतर दोघांचा एकत्रित हा तिसरा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले असून शाहरूख आणि अनुष्काची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि त्यांचा हा मजेदार प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.