अभिनेता शाहरूख खान याने कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केल्याचे आपल्यापैकी अनेकांना माहितीच असेल. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीच टेलिव्हिजनवरच्या ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ या मालिकांमुळे शाहरूख खानला बरीच लोकप्रियता मिळाली होती. मात्र, शाहरूख खान नव्वदीच्या दशकात दुरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करायचा ही बाब आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल.

त्या काळातील उगवत्या गायकांसाठीचे व्यासपीठ असलेल्या दुरदर्शनवरील संगीत कार्यक्रमात शाहरूख सूत्रसंचालन करत असे. या कार्यक्रमाचा एक दुर्मिळ व्हिडिओ शाहरूखच्या चाहत्याने यू ट्युबवर शेअर केला आहे. या कार्यक्रमात शाहरूख आणि त्याची सहकारी सूत्रसंचालक प्रेक्षकांना गायक कुमार सानू यांची ओळख करून देताना दिसत आहेत. शाहरूखप्रमाणेच कुमार सानू नव्वदीच्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. त्यांनी सलग पाचवेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता.