एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील एका महत्त्वाच्या गाण्याची चित्तथरारक झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘बाहुबली २’मधील ‘साहोरे बाहुबली’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये पार्श्वसंगीताच्या रुपात याच गाण्याचा वापर करण्यात आला आहे.

पहाडी आवाजाचा प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीने गायलेल्या ‘साहोरे बाहुबली’ या गाण्यामध्ये अमरेंद्र बाहुबलीचे वेगळं रुप पाहायला मिळत आहे. अमरेंद्र बाहुबलीवर असणारं त्याच्या जनतेचं प्रेम, तो करत असलेले पराक्रम, त्याचं साम्राज्य या साऱ्याची सांगड ‘साहोरे बाहुबली’मध्ये घालण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ज्या भव्यतेसाठी राजामौलींच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत त्याचा हलकासा अंदाज या गाण्यातून येत आहे. ३० सेंदांच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याच लक्षवेधी गोष्टी आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमधूनच जर का अशी सुरेख दृश्यं पाहायला मिळत असतील तर ‘बाहुबली २’ खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार यात शंका नाही.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये ‘बाहुबली २’च्या प्रदर्शनात काही अडथळे निर्माण केल्याचे पाहायला मिळाले. पण, आता मात्र चित्रपटाला होणारा विरोध मावळला असून २८ एप्रिला हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईतही या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. अभिनेता प्रभास, सत्यराज, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटीया, राणा डग्गुबती यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणते नवे विक्रम रचतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राजामौलींच्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये एक प्रकारचं वलय तयार केलं आहे, ज्याचा फायदा चित्रपटाला नफ्याच्या स्वरुपात होताना दिसतोय.