बॉलीवूड बादशहा शाहरुख खानला आपण रुपेरी पडद्यावर अॅक्शन सिन करताना पाहिलं आहे. चित्रपटात खलनायकाला चांगली अद्दल घडविणाऱया शाहरुखला त्याच्या रिअल लाईफमध्ये एका सामान्य महिलेने कानशिलात लगावल्याचा प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे अगदी खरं आहे आणि खुद्द शाहरूखने त्याचा खुलासा केला आहे.
शाहरुख ९० च्या दशकात दिल्लीहून मुंबईत स्थायिक झाला. त्यावेळी पहिल्यांदाच शाहरुखने दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी ट्रेनने प्रवास केला होता. याविषयी बोलताना शाहरुख म्हणाला की, मी पहिल्यांदा दिल्लीहून मुंबईला ट्रेनने आलो. तेव्हा मला कल्पना नव्हती की मुंबईला ती ट्रेन पोहोचताच डब्यात लोकल ट्रेनसारखी गर्दी होऊन जाईल. दिल्लीमध्ये लोकल ट्रेन नसल्याने मला याबाबतची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे ट्रेन मुंबईत पोहोचताच इतर लोकांनी ट्रेनमध्ये चढून कुठेही बसण्यास सुरुवात केली. हा आमचा बर्थ आहे, असे म्हणून मी लोकांना आमच्या जागेवरून उठायला लावत होतो. त्यानंतर एक महिला अजून एका व्यक्तीसह आमच्या बर्थमध्ये येऊल बसली. तुम्ही येथे बसू शकता पण तुमच्यासोबत असलेली ही व्यक्ती येथे बसू शकत नाही, असं मी त्या महिलेला म्हटलं. त्यावर त्या महिलेने माझ्या जोरात कानशिलात लगावली. मी तर येथे बसेनचं पण डब्ब्यात असलेल्या इतर व्यक्तीही येथे बसतील, असेही त्या महिलेने सांगितल्याचे शाहरुखने म्हटले.
‘फॅन’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी चाहत्याशी संवाद साधताना शाहरुखने त्याच्या या रंजक प्रवासाबद्दल सांगितले. ‘फॅन’ चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.