अभिषेक बच्चन शुक्रवारी घाबरलाच होता. मनात एक भिती बसली होती. सतत देवाच्या नावाचा धावा तो करत होता. तो हे सगळं यासाठी करत होता, कारण तो ज्या विमानात बसला होता, त्याचा वैमानिकच नव्हता.

यात घाबरण्यासारखे काही नाही, कारण विमान काही हवेत नव्हते. ते जमिनीवरच होते. पण जस जसा वेळ पुढे सरकत होता तसा अभिषेकच्या संयमाचा बांध फुटत होता. डोक्यात राग प्रचंड होता आणि तो राग व्यक्त करण्याचं एक माध्यमही त्याच्या हातातच होते, ते म्हणजे ट्विटर. अभिषेकने ११.४५ वाजता लागोपाठ पाच ट्विट केले. खरंतर अभिषेकला जेट एअरवेजच्या विमानाने चेन्नईला जायचे होते. सर्व गोष्टींची औपचारिकता करुन जेव्हा तो विमानात बसला तेव्हा त्याला कळले की या विमानाचा वैमानिकच आलेला नाही. हळूहळू बाकीचे प्रवासीही विमानात येऊ लागले. सगळे प्रवासी विमानात येऊन बसले तरी वैमानिकाचा पत्ताच नव्हता. अभिषेकने रागाने याबाबत ट्विटही केले. ‘जर प्रवाशांना उशीर झाला तर त्यांना विमानात प्रवेश दिला जात नाही. आता जर विमान निघायलाच उशिर झाला असेल तर प्रवाशांना विमानातून उतरण्याची परवानगी आहे का?’ अभिषेकच्या या ट्विटनंतर सुमारे एक तास वैमानिक आलाच नाही. यानंतर अभिषेकने परत एक ट्विट केले आणि म्हटले की, ‘देवाने माझी प्रार्थना ऐकली. वाटतं विमान सुरु झालंय…’

सिनेकलाकार शक्यतो त्यांच्या खाजगी विमानातूनच प्रवास करतात. पण जेव्हा त्यांनाही कधी सर्वसामान्यांसारखा प्रवास करावा लागतो तेव्हा त्यांना खऱ्या गोष्टी कळतात. शेवटी वेळेचं महत्त्वही अशाच काही प्रसंगातून कळतं हेच खरं