आतापर्यंत अक्षय कुमार आणि आमिर खान यांनी एकाही सिनेमात एकत्र काम केले नाही. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच हे खरंतर शक्य झालं असतं. ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातून आमिर खान आणि अक्षय कुमार सिनेरसिकांना एकत्रित दिसू शकले असते. १९९२ मधला हा सुपर हिट सिनेमा होता. या सिनेमात आमिर खान, आएशा झुल्का, मामाक सिंह, दीपक तिजोरी आणि कुलभूषण खरबंदा यांसारखे कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या आंतरराष्ट्रीय मामि चित्रपट महोत्सवामध्ये जो जीता वही सिकंदरची संपूर्ण टीम उपस्थित राहीली होती. यावेळी या सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टींवर चर्चाही झाल्या.

नृत्य दिग्दर्शक फराह खानने अक्षय कुमारशी निगडीत एक गुपीत उघड केलं. यावेळी ती म्हणाली की, ‘अक्षयनेही या सिनेमासाठी ऑडिशन दिले होते. फक्त अक्षयच नाही तर अनेक अभिनेत्यांनी या सिनेमासाठी ऑडिशन दिले होते.’ आमिरला मात्र याबाबत काहीच माहित नसल्याचे दिसले. जेव्हा फराहने या गोष्टीचा खुलासा केला तेव्हा तो स्वतः आश्चर्य चकित झाला होता.

जेव्हा फराह या गोष्टी सांगत होती, तेव्हा आमिरने तिला मधेच थांबवले आणि विचारले की, ‘नेमकी कोणत्या भूमिकेसाठी अक्षयने ऑडिशन दिले होते.’ यावर उत्तर देताना फराह म्हणाली की, ‘तुझ्या भूमिकेसाठी नाही. तो दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला आला होता.’

यावर आमिरने तिला परत प्रश्न विचारला की, ‘मग तू त्याला का नाही घेतलं?’ यावर फराह म्हणाली की, ‘अक्षयला फराहने नाही तर खुद्द दिग्दर्शक मंसूर खान यांनीच घेतलं नव्हतं.’ जर त्यावेळी अक्षय कुमारची जो जीताच्या ऑडिशनमध्ये निवड झाली असती. तर एवढ्या सुपर हिट सिनेमामध्ये दोन दिग्गजांची जोडी नक्कीच पाहायला मिळाली असती.