बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतातील ‘संस्‍कारी बाबूजी’ म्हणजेच आलोकनाथ यांनी नुकताच ६१ वा वाढदिवस साजरा केला. आलोकनाथ हे वडिलांची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एकेकाळी अभिनेत्री नीना गुप्ता आणि त्यांच्या प्रेमसंबंधांच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

८०च्या दशकात आलोकनाथ चित्रपटसृष्टीत आपले करिअर घडवण्यासाठी धडपड करत होते. त्याचवेळी १९८२ साली नीना यांच्यासोबत त्यांचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटादरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे म्हटले जाते. ते एकमेकांच्या प्रेमात पडलेले. मात्र, आलोकनाथ यांच्या वडिलांना त्यांचे लग्न दुसऱ्या मुलीशी व्हावे असे वाटत होते. हे नीना गुप्ता यांना कळले तेव्हा त्यांनी आलोकनाथ यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर नीना यांचे नाव संगीतकार शारंगदेव आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्याशी जोडले गेले. तर आलोकनाथ यांनी बिहारच्या अंशू सिंह यांच्याशी लग्न केले. हे दोघंही एकमेकांना पहिल्याच भेटीत पसंत पडले होते. या भेटीनंतर जवळपास तीन वर्षांनी त्यांनी १९८७ साली लग्न केले. त्यावेळी अंशू सिंह प्रोडक्शन असिस्टंट म्हणून कार्यरत होत्या.

वाचा : ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्रीला मिळते सर्वाधिक मानधन

आलोकनाथ यांचा जन्म दिल्ली येथे १० जुलै १९५६ साली झाला. त्यांचे वडील डॉक्टर आणि आई गृहिणी होत्या. आपल्याप्रमाणेच आलोकनाथ यांनीही डॉक्टर व्हावे असे त्यांच्या वडिलांचे मत होते. दिल्लीतच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आलोकनाथ यांना अभिनयात रस होता. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना ते एका थिएटर  ग्रुपशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून अभिनयाचे धडे घेतले.

आज आलोकनाथ हे संस्कारी बापू म्हणून ओळखले जात असले तरी करिअरच्या सुरुवातीला त्यांनी हिरोच्या भूमिकाही साकारल्या आहेत. इतकेच नव्हे तर १९८७ साली आलेल्या ‘कामाग्नि’ चित्रपटात त्यांनी रोमॅण्टिक दृश्यही दिलेली. ‘विनाशक’, ‘षड्यंत्र’ आणि ‘बोल राधा बोल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिकाही साकारली आहे.