अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने सध्या चर्चेत आहे. निर्माता – दिग्दर्शक करण जोहरच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये रणबीर एका महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याने नुकतेच कतरिना कैफ या त्याच्या प्रेयसीसोबत झालेल्या ब्रेकअप विषयी प्रतिक्रिया दिल्यामुळेही रणबीर आणि कतरिना पुन्हा एकदा चर्चेत आले होते. पण सध्यातरी एका मुलाखतीदरम्यान रणबीरने केलेल्या विधानामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रणबीरच्या म्हणण्यानुसार त्याला एका हॉलिवूड अभिनेत्रीने ‘गेट लॉस्ट’ म्हटले होते.
एका मुलाखतीदरम्यान रणबीरने त्याला हॉलिवूडपटांमध्ये ऑफर आल्याचे सांगितल्यामुळे अनेकांना अाश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेता बनण्याच्या तयारीत असताना रणबीर काही हॉलिवूड कलाकारांचा निस्सिम चाहता होता. त्यातच नताले पोर्टमॅन हिच्याबाबतचा एक किस्सा रणबीरने मुलाखतीदरम्यान सांगितला. एकदा नताले पोर्टमॅन रणबीरला न्यूयॉर्क मध्ये दिसली. एखादा सर्वसामान्य चाहता ज्याप्रमाणे थक्क होतो त्याचप्रमाणे रणबीरची काहीशी अवस्था झाली होती. रणबीर लगेचच त्या अभिनेत्रीपाशी ‘आपल्याला तिचे काम आवडते’ असे सांगण्यासाठी गेला खरा, पण नताले दुसऱ्याच कामात व्यस्त असल्यामुळे ती रणबीरला ‘गेट लॉस्ट’ म्हणाली. ‘आपल्या अतिशय आवडत्या कलाकाराने असे म्हटल्यामुळे माझे हृदय फार आधीच तुटले होते’ असेही रणबीर म्हणाला.
दरम्यान नुकतेच एका मुलाखतीमध्ये रणबीरने त्याच्या आणि कतरिनाच्या ‘ब्रेकअप’ बद्दल आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘आपल्या आईवडिलांनंतर कतरिना ही एकमेव आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती आहे. तिचे आपल्या आयुष्यातील स्थान आजही तितकेच प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे आहे’, अशी कबुली रणबीरने एका मुलाखती दरम्यान दिली. एक सहकलाकार म्हणून कतरिनाबरोबर काम करण्यात खूप मजा येते, असे सांगत अजूनही आपण एकत्र येऊ शकतो निदान पडद्यावर तरी.. असे संकेत त्याने दिले.