मोठय़ा कलाकारांच्या मोठय़ा तऱ्हेवाईक गोष्टी कित्येकदा ऐकायला मिळतात. सतत चित्रीकरणात व्यग्र असलेल्या कलाकारांची झोप पूर्ण होत नाही हे साहजिक आहे. मात्र बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही मुशाफिरी करून आलेल्या ओम पुरी यांनी झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही, हे मनाशी पक्के केलेले दिसते. ‘वॉरीयर सावित्री’ नामक चित्रपटात ओम पुरी यांनी काम केले आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांसाठी त्यांना ठिकठिकाणी हजेरी लावावी लागते. मध्यंतरी अशाच एका कार्यक्रमाला ते वेळेवर पोहोचले खरे, पण चित्रपटाची नायिका मुख्य अभिनेत्री निहारिका रायजादा हिला तिथे पोहोचण्यासाठी उशीर लागणार होता. तिची वाट पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा ओम पुरी यांनी आपल्या निद्रासमाधीला पसंती दिली. भर कार्यक्रमाच्या जागी तिथे ठेवलेल्या चार खुच्र्या एकत्र करून ते चक्क आडवे झाले. नायिका कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचताच तितक्याच उत्साहाने ओम पुरी यांनी तो कार्यक्रमही पार पाडला. ओम पुरी यांच्या झोपेच्या गोष्टी नवीन नाहीत. त्यांना आपली झोप किती प्रिय आहे, याचा अनुभव अनेक निर्माते-दिग्दर्शक यांनी याआधीही घेतलेला आहे. मेकअप रूममध्ये शिरल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला प्रवेश करण्याआधी पुरेसा वेळ उपलब्ध असतो तेवढय़ा वेळेत मेकअप रूममध्येच ते आपली झोप पूर्ण करतात आणि मग नव्या जोमाने जमलेल्या लोकांना भेटतात, याला म्हणतात खरा व्यावसायिकपणा.. आपली झोपही गमवायची नाही, वेळही घालवायचा नाही आणि कार्यक्रमही तितक्याच प्रेमाने साजरा करायचा. या गोष्टी जमल्या म्हणूनच तर ते जगाच्या नकाशावर ‘ईस्ट’ ते ‘वेस्ट’ आपला ठसा उमटवू शकले आहेत.