काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांचे आत्मचरित्र ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले होते. या पुस्तकात त्यांनी, आयुष्यात घेतलेले अनुभव, विनोदी किस्से आणि खासगी आयुष्याबद्दल बरेच काही लिहिले आहे. ऋषी कपूर यांच्या या पुस्तकासाठी रणबीरने पहिले पान लिहिले असले तरी शेवटचे पान हे नितू कपूर यांनी लिहिले आहे.

या पुस्तकात नितूने एक किस्साही सांगितला आहे, ‘कुठेही जाताना किंवा कुठून येताना ऋषी यांना ‘जय माता दी’ असा मेसेज करायचाच असा त्यांच्या घरातला अलिखिती नियम आहे.’

एकदा रणबीरने विमानात बसल्यावर ‘जय माता दी’ असा मेसेज पाठवला होता. पण दरम्यान काही कारणांमुळे त्याच्या विमानाला पोहोचायला उशीर झाला. पण तोवर बॉबने (ऋषी) रणबीरने मेसेज केलेला वेळ आणि विमान पोहचण्याच्या कालावधीचं गणित मनात मांडलं होतं. जेव्हा रणबीर विमानतळावर उतरला तेव्हा त्याला बाबांचा म्हणजे ऋषी कपूर यांचा पहिला ओरडाच ऐकावा लागला.  ऋषी म्हणाले की, ‘जर विमान सुटलेच नव्हते तर आधीच मेसेज का केलास? ठरलेल्या वेळेत तू पोहोचला नाहीस त्यामुळे मला फार काळजी वाटत होती.’

तर दुसरा असाही एक किस्सा घडला की, ‘बेशरम’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये नितू, ऋषी आणि रणबीर तिघंही एकत्रच प्रवास करत होते. तेव्हा रणबीरने आई नितूला सांगितले की, ‘आपण तिघं एकत्र प्रमोशनसाठी फिरतो हे एक बरं झालं नाही तर मला त्यांना जय माता दी हा मेसेज टाकायचा एवढा तणाव असतो की मला भितीही वाटते की मी मेसेज न टाकता झोपलो तर तिकडे बाबा रागाने लालबूंद होतील.’

दरम्यान, ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये ऋषी कपूर यांनी रणबीच्या बालपणीच्या आठवणी सांगत कार्यक्रमामध्ये रणबीरची कमी भरुन काढण्याचा प्रयत्न केला होता. ‘मी चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे रणबीर हा माझ्यापेक्षाही आई नीतूसोबत जास्त काळ असायचा. त्याला माझी गरज असल्याचे कळत असून देखील मी त्याला वेळ देऊ शकलो नाही, असे सांगत ऋषी यांनी मुलासोबतच्या संबंधातील निर्माण झालेल्या दरीबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली होती. बदलत्या पिढीनुसार रणबीर आपल्या मुलांसोबत माझ्यासारखे वागणार नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी रणबीरचा मित्र होऊ शकत नसल्याचेही सांगितले होते.