सिनेकारकिर्दीत अभिनेता संजय दत्त नेहमीच चर्चेचा विषय बनत आला आहे. मग ते अमली पदार्थांचा विषय असो, अती मद्यपानाचा विषय असो. तेव्हाची मासिकंही त्याच्याच चर्चांनी भरलेली असायची. प्रसारमाध्यमांचा तेव्हाचा तो आवडीचा अभिनेता होता. नशेत धुंद असताना त्याने राजेश खन्ना यांच्यावर गोळी चालवली होती, अशा बातम्यांनी ९० च्या दशकांतले मासिकांचे रकानेच्या रकाने भरले जायचे. पण या घटनेनंतर संजय दत्तने कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर संजय दत्तने त्याच्या रागावर नियंत्रण ठेवणे शिकले असे सर्वांना वाटत असतानाच तो परत एकदा लोकांच्या नजरेत आला. त्यावेळी संजय दत्त जाने दो या सिनेमाचे चित्रिकरण नाशिकमध्ये करत होता. या सिनेमात अनेक महत्त्वपूर्ण दृश्य ही सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये राहून चित्रित करायची होती. जेव्हा संजय त्याचा शॉट देण्यासाठी तयार व्हायचा तेव्हाच चित्रिकरण पाहायला आलेली लोकं त्याची मस्करी करायला सुरुवात करायची. तो किती वाईट अभिनेता आहे अशा प्रकारे बोलून त्याला खिजवत होती. त्यानंतरही एका समुहाने संजय दत्तला खिजवण्याचे सोडले नाही. संजयच्या कुटुंबियांबद्दलही त्या समुहाने टोमणे द्यायला सुरुवात केली होती. संजय दत्तला राग यावा आणि तो भांडायला यावा असेच त्या समुहाला वाटत होते. त्यांना संजयने सिनेमातल्या हिरोप्रमाणे भांडायला, मारामारी करायला यावे असे वाटत होते. पण त्यांच्या या सततच्या चिडवण्यामुळे संजय त्याच्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकत नव्हता. एकदाचे ते दृश्य चित्रित झाल्यावर संजय आपल्या हॉटेलवर परत गेला.

दुसऱ्या दिवशी परत तोच समुह संजयला त्रास देण्यासाठी चित्रिकरणाच्या जागी आला होता. सकाळपासून ते लोक संजयची आणि त्याच्या संपूर्ण टीमची वाट पाहत होते. त्यांच्या सततच्या टोमण्यांमुळे संजय त्याच्या कामावर लक्ष केंद्रीत करुच शकत नव्हता. त्या दिवशीसंजयचे फार कमी दृश्य चित्रित करायची होती, त्यामुळे दुपारपर्यंत त्याचे काम झाले. संध्याकाळीही तसेच सुरु राहिल्याने तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच लक्षात आले की यावर काही प्रतिक्रिया देत नाही तोवर हे थांबणारे नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी संजय दत्त इतरांपेक्षा आधी सेटवर पोहचला आणि त्या माणसांची वाट बघत होता. जेव्हा ती माणसे आली तेव्हा त्यांनी नेहमी प्रमाणे संजयची मस्करी करायला सुरुवात केली. यावेळी संजयही पूर्ण तयारीने आला होता. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे संजयने त्याचे शर्ट काढले, त्याच्या हातातली तलवार उंचावली आणि शक्य तितक्या जोरात त्या समुहाकडे बघून ओरडला. त्यांना त्याच्यासमोर येण्याचे त्याने आव्हान केले. संजयचा ते रुप पाहून ती माणसं चांगलीच घाबरली आणि पळून गेली. अवघ्या १० मिनिटांत सेटवरचे संपूर्ण वातावरण बदलून गेले. त्यावेळी सिनेसृष्टीतले अनेक लोक त्याच्या रागाला घाबरून असायचे.