श्रीदेवीचा ‘मॉम’ सिनेमा ७ जुलैला प्रदर्शित झाला. या सिनेमात तिने एक आई आणि एका शिक्षिकेची व्यक्तिरेखा निभावली आहे. श्रीदेवीने आतापर्यंत हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. पण ‘१६ वायाथिनाले’ हा सिनेमा तिच्या नेहमीच लक्षात राहिल असा आहे. या सिनेमाच्या एका दृश्यात श्रीदेवीला सुपरस्टार रजनिकांत यांच्यावर चक्क थुंकायचे होते.

…स्मृती इराणी यांच्या मुलीचा हा फोटो पाहिलात का?

पण अनेक रिटेकनंतरही तिला ते दृश्य चित्रीत करायला जमत नव्हते. शेवटी यावर उपाय म्हणून चक्क रजनी यांनीच श्रीदेवीला थोडं पुढे येऊन त्यांच्यावर खरंखुरं थुंकायला सांगितलं. परफेक्शनसाठी त्यांनी श्रीदेवीला त्यांच्यावर थुंकायला सांगितले होते. आता रजनीकांत सांगणार आणि श्रीदेवी ऐकणार नाही असं तर होणार नाही ना? श्रीदेवीनंतर खरोखरंच त्यांच्यावर थुंकली आणि दिग्दर्शकाने त्या सीनला ओकेही दिलं.

रजनीकांत यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमधले काही किस्से एका मुलाखतीत सांगितले होते. यावेळी ते म्हणाले की, ‘दाक्षिणात्य सिनेमांमध्ये जेव्हा काम करायला सुरूवात केली तेव्हा मी एक होतकरु कलाकार आहे असेच पाहिले जायचे. माझ्याशी कोणी बोलायचेही नाही. एवढंच काय तर माझ्या सिनेमाचे निर्माते एसए राजकन्नू यांच्याशी माझी पहिली भेट सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच झाली होती.’ ‘१६ वायाथिनाले’ या सिनेमात रजनीकांत आणि श्रीदेवीसोबत कमल हसन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

आलोकनाथ नीना गुप्ताला डेट करत होते तेव्हा..

या सिनेमाचा एक किस्सा सांगताना कमल म्हणाले होते की, ‘सुरुवातीला हा सिनेमा अजिबात चालणार नाही असेच प्रत्येकजण बोलत होते. एकदा तर स्टुडिओमधून घरी जात होतो, तेव्हा बाइकवरून एक व्यक्ती आला आणि मला म्हणाला की हा सिनेमा अजिबातच चालणार नाही. पण प्रदर्शनानंतर हा सिनेमा सुपरहिट ठरला.’

तामिळ सिनेमा ‘मूंडरू मुडिचू’ (१९७६) मध्ये श्रीदेवीने रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी श्रीदेवीचे वय फक्त १३ वर्ष होते तर रजनीकांत यांचे वय २६ वर्ष होते. श्रीदेवीने फक्त दाक्षिणात्य सिनेमांमध्येच रजनीकांत यांच्यासोबत काम केले असे नाही तर अनेक हिंदी सिनेमांमध्येही ते एकत्र दिसले होते.