९०च्या दशकात जिथे सुनील शेट्टीने एक अॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळाली होती तिथे सुनीलने हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी असे विनोदीपट करुन आपली दुसरी बाजूही प्रेक्षकांना दाखवली. सुनीलने आतापर्यंत ११० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या जेन्टलमन सिनेमात त्याने कर्नलची व्यक्तिरेखा साकारली.

सुनील शेट्टीने जेव्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले तेव्हा त्याच्या मागे कोणत्याही बड्या स्टारचे पाठबळ नव्हते. पण तुम्हाला माहित आहे का, सुनीलचे बाबा हॉटेलमध्ये काम करायचे. त्यांनी तिथली भांडीही घासली आहेत. आपल्या मेहनतीने सुनीलने यश आणि संपत्ती मिळवली. सुनील शेट्टीची वर्षाची मिळकत सुमारे १०० कोटींच्या घरात आहे. आता त्याला जे हवे ते तो मिळवू शकतो, पण एक वेळ अशी होती की त्याच्याकडे यातले काहीच नव्हते.

एका मुलाखतीत सुनीलने सांगितले की, त्याचे वडील एका हॉटेलमध्ये प्लेट साफ करायचे. २०१३ मध्ये आपल्या नवीन व्यवसायाच्या उद्धाटनावेळी सुनीलचे बाबा वीरप्पा शेट्टी ज्या ठिकाणी काम करायचे त्याच जमिनीवर त्याने आपला नवीन व्यवसाय सुरू केला. वीरप्पा यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात केली होती. अनेक वर्षांच्या मेहनतीने त्यांनी १९४३ मध्ये एक संपूर्ण इमारत विकत घेतली, जी वरळी येथील फोर सीझन हॉटेलच्या बाजूलाच आहे.

आज सुनील शेट्टीचा खंडाळ्याला सुमारे ६२०० चौ. फुटांचा अद्यावत गोष्टींनी परिपूर्ण असा एक बंगला आहे. या बंगल्यात खासगी गार्डन, स्वीमिंग पूल, दुमजली लिव्हींग रुम, पाच बेडरुम आणि किचन आहे. डायनिंग रुम ही संपूर्ण बंगल्याची खासियत आहे. स्वीमिंग पूलला लागूनच सुनीलने डायनिंग रूम केले आहे. जॉन अब्राहमचा भाऊ एलनने या घराचे आर्किटेकचर केले आहे.

सुनीलचा मुंबईमध्ये रेस्तराँचा व्यवसाय आहे. तो ‘मिसचीफ डायनिंग बार’ आणि ‘क्लब एच २०’ चा मालक आहे. या दोन्ही रेस्तराँकडे त्याचे जातीने लक्ष असतेच. शिवाय हाकिम आलिम याच्या सलॉनमध्ये सुनीलचे ५० टक्के शेअर्स आहेत. सुनीलने त्याचे पैसे अशा पद्धतीने गुंतवले आहेत की, त्याने अनेक छोट्या गोष्टींमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे जरी तो व्यवसाय डबघाईला आला तरी त्याला फार मोठे नुकसान सहन करावे लागणार नाही. पण यामुळे त्याला त्याचे लक्ष एकाच जागी न ठेवता अनेक ठिकाणी ठेवावे लागते. पण पॉवर डिस्ट्रीब्युशनमार्फत हे करणं शक्य आहे.

‘व्यवसाय करणं हे आमच्या रक्तातचं आहे. आमच्या अनेक पिढ्या या व्यवसायच करत आल्या हेत. सिनेसृष्टीमुळे मी लोकांच्या अधिक जवळ येऊ शकलो. पण आज जर तुम्ही पाहिले तर सिनेसृष्टीतील प्रत्येकजण स्वतःचा ब्रॅण्ड तयार करत आहे, जे मी गेल्या २५ वर्षांपासून करतोय,’ असे सुनीलने एका मुलाखतीत म्हटले.