हॉलीवूड चित्रपटांचे जाळे आता जगभर पसरले आहे. हॉलीवूडचे चित्रपट हे इतर स्थानिक चित्रपटसृष्टांसाठी नेहमीच तगडे स्पर्धक राहिले आहेत. यावर्षी भारतात हिंदी चित्रपटांसोबत अनेक हॉलीवूड चित्रपटांनी दमदार कमाई केल्याचे दिसून आले.  यंदाच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटांपेक्षा हॉलीवूडपटच वरचढ ठरताना पाहावयास मिळाले. त्यामुळेही बॉलीवूडसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलेयं.
हॉलीवूड आता इतर चित्रपटसृष्टींप्रमाणे बॉलीवूडलाही गिळंकृत करू पाहतेय. त्यावर बोलताना अमिताभ म्हणाले की, आपण त्यांच्याविरुद्ध लढायला हवे. यालाचं स्पर्धा म्हणतात. हॉलीवूडमध्ये बरीच ताकद आहे हे आपल्याला माहित आहे. हे चित्रपट जेथे गेले तेथील स्थानिक चित्रपटसृष्टी त्याने नष्ट केलेयं. मग ते लंडन, जर्मनी, फ्रान्स, स्पेन किंवा जपान असो, हॉलीवूड जेथे गेले तेथील बाजारपेठेवर त्यांनी वर्चस्व गाजविले. हेच आता आपल्याकडेही हळूहळू होताना दिसत आहे. आपण लढायला हवे. बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये चांगली स्पर्धा रंगेल.
१९९५ साली मी एबीसीएलची (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड) स्थापना केली होती. त्यावेळीच मी म्हटले होते की,  अमेरिकन स्टुडिओ आणि तेथील फिल्म मेकर्स हे भारतात येतील. त्यांच्याकडे बराचं पैसा असेल आणि त्यामुळे आपण त्यांच्यासमोर महासागरातील एका थेंबाप्रमाणे असू . ती वेळ आता आली आहे. त्यामुळे आता आपण सज्ज झाले पाहिजे, असे अमिताभ यांनी सांगितले.