येत्या ख्रिसमसच्या मुहुर्तावर बॉलीवूडमध्ये दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ आणि रोहित शेट्टीचा ‘दिलवाले’ हे दोन्ही चित्रपट १८ डिसेंबरला प्रदर्शित होतील. या चित्रपटांमधील कलाकारही तितकेच तगडे आहेत. एकीकडे बॉलीवूडचा बादशाहा शाहरुख तर दुसरीकडे लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करणारा रणवीर सिंग. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर यावेळी कोण उजवा ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’सोबत ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. यासंबंधी विचारले असता रणवीर म्हणाला की, मला खरचं या गोष्टीशी काहीचं फरक पडत नाही. फक्त माझ्या चित्रपटाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळेल याची मला चिंता आहे. आमच्या चित्रपटाने चांगली कमाई करावी अशी माझी इच्छा असली तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद हा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी चित्रपट ही एक कला आहे तर काहींसाठी तो व्यवसाय आहे. शेवटी सर्वांचा कल हा कमाईकडेचं असतो पण कलाकार म्हणून मला याविषयी काही वाटत नाही. विकेन्ड कलेक्शन क्या था? असे विचारणा-यांमधला मी नाही. उलट मी हा प्रश्न विचारतो की, भैय्या पिक्चर कैसी चली? मी भावनिकदृष्ट्या या चित्रपटात गुंतलो गेलो आहे हे कोणापासून लपलेले नाही.
‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ यापैकी कोणाच्या पारडे जड ठरतेय हे १८ डिसेंबरलाच कळेल.