अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे प्रतिपादन
जीवन देणाऱ्या आणि घडवणाऱ्या महिलांना व्यक्त होण्यासाठी योग्य व्यासपीठ हवे असते. ‘प्रारंभ कला अकादमी’तर्फे ठाणे शहरात होणारा महिला महोत्सव ठाण्यातील महिलांना व्यक्त होण्यासाठी उत्तम माध्यम आहे, असे मत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी प्रारंभ कला अकादमीतर्फे आयोजित केलेल्या ‘आम्ही साऱ्या जणी’ या महिला महोत्सवात व्यक्त केले. डॉ. अरुंधती भालेराव संचालित प्रारंभ कला अकादमीतर्फे आयोजित केलेल्या महिला महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला. या वेळी अभिनेत्री रेणुका शहाणे, पितांबरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय जोशी, सिन्नरकर असोसिएट्सचे सचिन सिन्नरकर तसेच अभिनेत्री आदिती सारंगधर उपस्थित होते. या महोत्सवाच्या तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न ‘नाम’ फाऊंडेशनला देण्यात आले. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही या वेळी ‘नाम’ला ५० हजार रुपयांची देणगी दिली.
‘प्रारंभ कला अकादमी’तर्फे गेली तीन वर्षे या महिला महोत्सवाचे आयोजन होत असते. या वर्षीच्या महिला महोत्सवात सुधीर गाडगीळ यांच्या ‘मुलखावेगळी माणसं’ हा एकपात्री कार्यक्रम, महिला वादकांची ढोलकी-ढोल यांची जुगलबंदी, तसेच प्रारंभच्या विद्यार्थिनी महिलांचे ‘सखी गं सखी’ नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. अभिनेत्यांना पडद्यावर पाहता येते, मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी पडद्याआड असतात. या उद्देशाने फुलोरा गप्पांचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत वंृदा गजेंद्र अहिरे, शिल्पा मकरंद अनासपुरे, अलका सय्याजी शिंदे यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून डॉ. अरुंधती यांनी त्यांना बोलते केले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ठाण्यातील व्यास क्रिएशनचे नीलेश गायकवाड, डॉ. उल्का नातू, मुंबई आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित तसेच कल्याणच्या चेतना रामचंद्रन अशा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार प्रारंभतर्फे करण्यात आला. प्रारंभतर्फे सामान्यातील असामान्य कर्तृत्व करणाऱ्या एका महिलेचा सौदामिनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी शंभरहून अधिक मान्यवरांची रेखाचित्रे काढून त्यावर त्यांची स्वाक्षरी घेणाऱ्या तसेच अभिनय, निवेदन या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या मधुमती जोगळेकर- पवार यांना पाच हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सौदामिनी पुरस्काराने गौरवण्यात आले.