महिला दिनाचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. ८ मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात महिलांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत हा एक दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला, मुलगी, आई, बहिण, प्रेयसी अशा विविध रुपांत आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर ‘ती’ची भूमिका फारच महत्त्वाची असते. महिलांच्या या विविध भूमिकांना शह देत काहीजणींनी तर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांच्या याच कर्तृत्त्वाला बॉलिवूडकरही विसरले नाहीयेत. विविध चित्रपट आणि मुख्यत्वे चित्रपट गीतांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्यात बॉलिवूडही पुढे आहे. ‘ती’चा सन्मान करणारी ही आहेत काही गाजलेली चित्रपट गीते..
हम तो ऐसे है भैय्या-

‘लागा चुनरी मे दाग’ या चित्रपटातील हे गाणे बनारसच्या सुंदर घाटांवर चित्रित करण्यात आले असून यामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी आणि कोंकणा सेन शर्मा यांचा नटखट अंदाज पाहायला मिळत आहे. दोन बहिणींच्या जीवनावर, त्यांच्या बदलत्या नात्यांवर आणि परिस्थितीमुळे त्यांच्या जीवनात आलेल्या अनपेक्षित वळणांवर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

ये मेरी कहानी-

भावनांची गुंतागुंत असलेले हे गाणे विद्या बालनच्या ‘कहानी’ या चित्रपटातील आहे. विद्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली होती.

एक हॉकी दूंगी रखके-

भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूंवर आधारित ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील हे गाणे. महिला हॉकी संघातील खेळाडूंची ओळख करुन देण्यासाठी हे गाणे चित्रपटात समाविष्ट केलेले असून, या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगलीच दाद दिली होती.

आन मेरी मै तुमको ना छुने दुंगी-

राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘मर्दानी’ या चित्रपटातील हे गाणे आहे. आजच्या तरुणाईला विशेषत: तरुणींना या गाण्यातील शब्दांद्वारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ये हौसला कैसे झुके-

अभिनेत्री आएशा टाकिया आणि गुल पनाग यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘डोर’ या चित्रपटातील हे गाणे आहे. नेहमीच्या बी टाऊन चित्रपटांपेक्षा या चित्रपटाचे कथानक फारच वेगळे होते. भारतात विध्वा स्त्रियांची परिस्थिती आणि त्यांची होणारी घुसमट याचे या चित्रपटात चित्रण करण्यात आले होते. त्यासोबतच एखादी स्त्री तिच्या पतीचा जीव वाचवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करु शकते याचेही चित्रण चित्रपटामध्ये केले आहे. या चित्रपटातील ‘ये हौसला कैसे झुके’ हे गाणे अनेकांच्याच पसंतीचे आहे.

जिद्दी दिल-

ओमंग कुमारच्या ‘मेरी कोम’ या चित्रपटातील ‘जिद्दी हे गाणे महिला सबलीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गाणे समजले जाते. या चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुख्य भूमिका साकारली होती.

जिया रे-

‘जब तक है जान’ या चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शर्मावर चित्रित ‘जिया रे’ या गाण्याने अनेकांनाच भुरळ घातली होती. काही मर्यादा आणि सीमारेषा ओलांडत चौकटीपल्याड जाण्यासाठी हे गाणे प्रेरित करते.

बादल पे पाँव है-

शाहरुख खानने साकारलेल्या ‘कोच कबीर’ची भूमिका आणि त्या चित्रपटामध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास या महत्त्वाच्या घटकांमुळे ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट आजही अनेकांच्याच आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील ‘बादल पे पाँव है’ गाण्याच्या माध्यमातून महिला खेळाडूंना सलाम करण्यात आला आहे. त्यासोबतच यशाला कसल्याच सीमा नसतात हा संदेशही या गाण्यामार्फत देण्यात आला आहे.