क्रिकेटच्या पंढरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दमदार खेळी दाखवत भारतीय संघ या सामन्यात इतिहास रचणार का? याकडे काल तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. अगदी बॉलिवूड चित्रपटसृष्टीनेही महिला क्रिकेटपटूंना भरभरुन शुभेच्छा दिल्या होत्या. पण, लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम फेरीत झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघावर ९ धावांनी मात केली.

आपल्या आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी लंडनला गेलेल्या अभिनेता अक्षय कुमारने हा अंतिम सामना याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा अनवाणी धावत ट्रेन पकडली. जर त्याची ठरलेली ट्रेन चुकली असती तर त्याला कदाचित या सामन्याला मुकावे लागले असते. पण, सामना चुकवला जाऊ नये म्हणून अनवाणी प्रवास करणाऱ्या अक्षयने भारतीय संघाला प्रोत्साहन देताना नकळत तिरंगा उलटा पकडला होता. भारतीय महिला संघाला प्रोत्साहन देण्यासाठी अक्षयने हातात तिरंगा धरला होता. त्याने स्वतः तो फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला होता. मात्र, तिरंगा उलटा पकडल्याने लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता अक्षयने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांची माफी मागितली आहे. त्याने ट्विट केलंय की, तिरंग्यासंबंधी असलेली आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मी सर्वांची माफी मागतो. कोणाचाही अपमान करण्याच्या उद्देशाने मी हे केले नव्हते. तो फोटो आता मी सोशल मीडियावरून काढला आहे.

अक्षयने फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला ट्रोलही करण्यात आले होते. एका ट्विटर युझरने लिहिलं की, जर त्याने असे केले तर त्याला भारतात राहू दिले जाणार नाही. तर दुसऱ्या युझरने लिहिलं की, भारतीय तिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही. ‘तिरंगा उलटा पकडणाऱ्या अक्षय कुमारवर पंतप्रधान कारवाई करणार का?’ असा सवाल नदिम अली या युझरने केला आहे.