बॉलिवूडच्या मस्तानीने आता हॉलिवूड स्टारलाही घायाळ केले आहे. हॉलिवूडचा स्टार विन डिझेल दीपिकाच्या प्रेमात पडला आहे. दीपिका पदुकोनने विन डिझेलसोबत ‘xXx: The Return Of Xander Cage’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी दीपिकासोबत घालविलेल्या क्षणांना विनने उजाळा दिला आहे. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय असल्याची भावना विन डिजेलने व्यक्त केली आहे. तिच्यावरील प्रेम शब्दात व्यक्त करता येऊ शकत नसल्याचेही विन यावेळी म्हणाला.

दीपिकासोबतच्या आठवणी सांगताना विनने ‘xXx: The Return Of Xander Cage’ या चित्रपटानिमित्त पहिल्या भेटीत दीपिकाला पाहताच आपल्या सहकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती. याचा देखील खुलासा त्याने केला. दीपिकाला बघता क्षणी सर्व सहकारी अवाक झाले होते. एवढेच नव्हे तर तिच्या सौदर्याने सर्वांना घायाळ केले. असे तो म्हणाला. दीपिकाच्या सौदर्याचे कौतुक करताना दीपिकाचा चेहरा जागतिक स्तरावर झळकेल असेही तो म्हणाला.

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय ‘बिग बॉस’च्या घरातून दीपिका पदुकोनने ‘xXx: The Return Of Xander Cage’ या आपल्या हॉलिवूडपटाचा ट्रेलर लाँच केला. ट्रेलरच्या भारतीय आवृत्तीत दीपिकाचा जलवा पाहायला मिळतो. भारतात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये दीपिकाला केंद्रस्थानी ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. याआधीच्या ट्रेलरमध्ये दीपिकाला फारसे दर्शविण्यात न आल्याने तिचे चाहते नाराज झाले होते. आता ती चूक सुधारण्यात आली असून, ट्रेलरमधील अनेक दृश्यांमध्ये दीपिकाचा जलवा पाहायला मिळतो. दीपिकाने कमालीची मेहनत घेतल्याचे ट्रेलर पाहून जाणवते. ट्रेलर पाहिल्यानंतर बिग बॉसचे सूत्रसंचालन करणाऱ्या सलमानने दीपिकाची गंमत देखील केली होती ‘आम्हाला तर वाटतं होतं की दीपिकाने हॉलिवूड चित्रपटात काम केलंय. परंतु, इथे तर विन डिझेलनं हिंदी चित्रपटात काम केलंय, असे सांगत सलमाने दीपिकाच्या ट्रेलरचे स्वागत केले.

तिने साकारलेले अॅक्शन सिन, डायलॉग डिलिव्हरी आणि चित्रपटातील तिचा लूक सर्वकाही लाजवाब. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात दीपिकाने सेरेना नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी दीपिका आणि विन डिझेलच्या फोटोवरुन चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. खुद्द दीपिकाने विनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिने शेअर केलेल्या फोटोंना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.