बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७, २० जानेवारीपासून सुरु झाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म फाऊंडेशन व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. प्रतिष्ठानच्या चव्हाण सेंटरमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल शरद पवारांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच या महोत्सवात प्रतिष्ठानचे महोत्सव संचालक जब्बार पटेल, सरचिटणीस शरद काळे, मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, समन्वयक संजय बनसोडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.

[jwplayer qZqlrdj1]

साहित्यासोबतच चित्रपटदेखील आपले जीवन समृद्ध करत असतो. आयुष्य जवळून पाहण्याची संधी चित्रपट महोत्सव देत असतात. म्हणूनच चित्रपट महोत्सव आवश्यक असतात. आज या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माझा गौरव करण्यात आला हा मी माझा सन्मान समजतो. मराठी चित्रपट गेल्या काही वर्षात सर्वांगाने प्रगल्भ झालेला आहे. या चित्रपटातून मी खूप काही शब्दात सत्कारमूर्ती अभिनेते पंकज कपूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मी चित्रपट फारसे पाहत नाही. पण पंकज कपूरसारखे कलाकार चित्रपटांना वेगळी परिभाषा देतात. असे चित्रपट महोत्सव होणे आवश्यक आहे. अभ्यासू आणि ज्ञानपिपासू लोकांची चित्रपटाविषयीचे ज्ञान परिपूर्ण करण्याच काम यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेल्या ७ वर्षांपासून करत आहे अशा शब्दात शरद पवारांनी महोत्सवाचे कौतुक केले.

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ महोत्सवाचे यंदा ‘७ वे’ वर्ष आहे. या महोत्सवादरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्यास गौरविण्यात येते. आतापर्यंत अनुपम खेर, वहिदा रेहमान यांसारख्या दिग्गज कलाकारांना गौरविण्यात आले आहे.

यंदा या महोत्सवात चित्रपट रसिकांसाठी विविध भाषेतील आणि विविध देशातील काही निवडक ७४ चित्रपटांची मेजवानी आहे. महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले ‘स्मिता पाटिल स्मृती व्याख्यान’ दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याशी गप्पा २२ जानेवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे, तसेच चिली देशातील संगीत दिग्दर्शक जॉर्ज ऍरिगडा यांचा मास्टर क्लास ‘म्युझिक ऍन्ड साऊंड इन सिनेमा’ या विषयावर २१ जानेवारी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. काही मोजक्या मराठी चित्रपटांच्या कलाकार आणि दिग्दर्शकांशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. नॅशनल फिल्म अर्काईव्ह्जतर्फे ‘आझादी सत्तर’ या विषयावर चित्रपटांच्या पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

२० जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान मुंबईकरांना जगभारतील विविध भाषातील नावाजलेले चित्रपट पाहता येणार आहेत. चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की, चिली आदी देशांतील चित्रपट एकच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वासाठी सर्व चित्रपट रसिकांना आहे अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ . जब्बार पटेल यांनी दिली.

[jwplayer IvE9EhpP]