स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री हिना खान ही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा टेलिव्हिजन विश्वात रंगली आहे. या मालिकेत ती अक्षराची व्यक्तिरेखा साकारते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ कार्यक्रमाचा पूर्व सुपरव्हायजिंग प्रॉड्युसर रॉकी जयस्वाल आणि हिना हे एकमेकांना ब-याच दिवसांपासून डेट करत आहेत. पण अद्यापपर्यंत हिनाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. असे असले तरी या दोघांच्या लग्नाची बातमी गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे.
२८ वर्षीय हिना आणि रॉकी यांनी आपल्या रिलेशनबाबत अजूनपर्यंत मौन बाळगले आहे. पण, या दोघांच्या लग्नाबाबत चर्चा होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी गेल्यावर्षीच हे दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता २०१६ चा डिसेंबर येण्याची वेळ आली तरी या दोघांचे लग्न झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या लग्नाची बातमी निव्वळ अफवा म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यावर्षी टेलिव्हिजन जगतातील ब-याच सेलिब्रेटींनी लग्नगाठ बांधली. यंदा सनाया ईराणी- मोहित सेहगल आणि दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया यांनी विवाह केला. तर काही दिवसांपूर्वीच बिग बॉसची स्पर्धक राहिलेली संभावना सेठ हिने अविनाश द्विवेदी या तिच्या प्रियकराशी लग्नगाठ बांधली.
लग्नाच्या अफवांपूर्वी हिना ही वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली होती. आरोग्य ठीक नसल्यामुळे हिना काही दिवस कार्यक्रमातून गायब झाली होती. हिना तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टीवर गेली होती. त्यानंतर सुट्टीवरून परतल्यानंतर कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यानच पोटात दुखू लागल्याने हिनाला रुग्णायात दाखल करण्यात आले होते.