सुखात असो वा दु:खात प्रत्येक व्यक्तीला गाणी ही फार जवळची वाटतात. गाणी बऱ्याचदा दोन व्यक्तींना जवळ आणण्यासाठीही महत्त्वाची ठरतात. आपण ज्या गोष्टी एखाद्याशी बोलू शकत नाही त्या कवितांच्या किंवा गाण्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. प्रेमापासून ते देशभक्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर आपल्याला गाणी ऐकायला मिळतात. गाणी ही आपल्या रोजच्या जगण्यातील जणू एक भागच असल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सध्याच्या घडीला अरिजीत सिंग, आकृती कक्कर, पपॉन, जुबैन नॉटियाल, शाल्मली खोलगडे, निती मोहन, दिलजित दोसांज यांसारख्या अनेक तरुण गायकांनी तरुणाईला आपल्या गाण्यांची भुरळ पाडली आहे. पण, यातही एक नाव सध्या फार गाजत आहे ते म्हणजे सनम पुरी. अगदी ७०, ८०च्या दशकापासून ते आतापर्यंतच्या अनेक गाण्यांना त्याने रिटच केले असून युट्यूबवर त्याची गाणी प्रचंड गाजत आहेत.

सनम पुरी या अवघ्या २५ वर्षांच्या युवकाने ‘सनम’ हा बॅण्ड सुरु केला असून, भारतातील टॉपच्या १० स्वतंत्र युट्यूब चॅनलमध्ये त्याच्या चॅनलचे नाव घेतले जाते. सनम पुरी, समर पुरी, वेंकट सुब्रमण्यम आणि केशव धनराज या चार तरुणांनी ‘इंडी स्टायल’मध्ये जुनी गाणी त्यांच्या युट्यूब चॅनलवर सादर केली आहेत. गीतकार आणि गायक असलेल्या सनम पुरी आणि त्याच्या बॅण्डबद्दल जाणून घेऊयात.
सनमचा जन्म ३० जून १९९२ रोजी नवी दिल्ली येथे झाला.

वाचा : मराठमोळ्या लावणीवर सनीचा ठसका पाहिला का?

मस्कट, ओमानमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीतील किरोरी मल कॉलेजमध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र, कॉलेजमध्ये होणाऱ्या रँगिगमुळे त्याने मध्यातच कॉलेज सोडले.

वयाच्या अवघ्या १२ वर्षापासून सनमने गाणी लिहिण्यास सुरुवात केली. सनममधील हे कलागुण पाहून त्याच्या आई-वडिलांनी त्याला गायक होण्यासाठी पाठिंबा दिला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तीन वर्षांच्या कालावधीत त्याने विविध स्पर्धांमध्ये जवळपास ३६ पारितोषिके जिंकली.

वाचा : कलाकारांच्या वाढदिवसांच्या तारखांमध्ये होणारा घोळ थांबणार कधी?

‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपटातील ‘धत तेरी की..’ गाण्यामुळे सनमला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.

‘सनम’ या त्याच्या युट्यूब चॅनेलचे १ लाख ६६ हजारांपेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनलच्या माध्यमातून तो वर्षभरात कोट्यवधीच्या घरात कमाई करतो.

‘गुलाबी आँखे’ हे त्याने गायलेले गाणे बरेच गाजले. आतापर्यंत या गाण्याला १८ मिलियनपेक्षाही अधिक लोकांनी ऐकले आहे.

युट्यूब चॅनेलव्यतिरीक्त हा बॅण्ड दर महिन्याला अंदाजे १५ लाइव्ह शोदेखील करतो. १५०-१८० मिनिटे परफॉर्म करण्यासाठी हा बॅण्ड जवळपास १५ ते २० लाख रुपये घेतो.