जगाला सत्य, सत्याग्रह आणि अहिंसेचं तत्त्वज्ञान देणारे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू ना. गोपाळ कृष्ण गोखले होते, हे सर्वश्रुत आहे. परंतु त्यांचे आध्यात्मिक गुरूही होते, हे ‘युगपुरुष’ नाटकात प्रथमच कळले. श्रीमद राजचंद्र मिशनची निर्मिती असलेलं हे नाटक. श्रीमद राजचंद्रजींच्या दीडशेव्या जन्मवर्षांनिमित्ताने ते आणि महात्मा गांधी यांच्यातील आध्यात्मिक अनुबंधावर आधारित या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी आदी अनेक भाषांमध्ये या नाटकाचे प्रयोग होत असून, सबंध देशात व विदेशातही हे प्रयोग होणार आहेत. ‘युगपुरुष’चा मराठी प्रयोग पाहण्याची संधी नुकतीच मिळाली. खरं तर यानिमित्ताने जैन तत्त्ववेत्ते श्रीमद राजचंद्रजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही परिचय झाला.

‘श्रीमद राजचंद्र मिशन, धरमपूर’ या संस्थेने जैन तत्त्ववेत्ते श्रीमद राजचंद्रजी यांच्या जीवनकार्याचा परिचय जगाला करून देण्यासाठी या नाटकाची निर्मिती केली असली तरी या नाटकात हा हेतू पूर्णत: सफल झालेला नाही. ‘महात्मा गांधींच्या परिप्रेक्ष्यातून श्रीमद राजचंद्रजी’ असे या नाटकाचे स्वरूप आहे. त्यामुळे राजचंद्रजींचे महात्मा गांधी यांच्यासमवेत असलेले आध्यात्मिक बंध, उभयतांत झालेली जीवनमूल्यांची चर्चा व आदानप्रदान वगळता राजचंद्रजींचे उर्वरित जीवन कसे होते, त्यांच्या आयुष्यातील ठळक घटना-प्रसंग, त्यांची शिकवण, त्यांची तत्त्वे व मूल्यांचा प्रचार-प्रसार यासंदर्भात नाटकात विस्ताराने काही गोष्टी यायला हव्या होत्या. परंतु त्या तशा आलेल्या नाहीत. त्यामुळे राजचंद्रजींचं माहात्म्य हे गांधीजींच्या संदर्भातच आपल्याला जाणवतं. नाटक राजचंद्रजींच्या समस्त जीवनकार्याचे यथायोग्य चित्रण करण्यात कमी पडल्याची भावना मनात निर्माण होते. गांधीजींना ‘महात्मा’पदाकडे नेणारे त्यांचे आध्यात्मिक गुरू एवढाच मथितार्थ नाटकातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. असो.

नाटकाचा प्रारंभ बापू आपल्या अनुयायांना आपले आध्यात्मिक मार्गदर्शक श्रीमद राजचंद्रजींचा परिचय करून देत असल्याच्या प्रवेशाने होतो. १८९१ साली बॅरिस्टरची पदवी प्राप्त करून मोहनदास करमचंद गांधी भारतात परतले. त्यावेळी मुंबईत त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या मित्रांकडून श्रीमद राजचंद्रजींबद्दल त्यांना प्रथमच कळतं. त्यांच्या भेटीसाठी गांधींना नेलं जातं. आणि प्रथम भेटीतच दोघांचा स्नेह जुळतो. व्यापारी पेढीत भागीदार असलेले राजचंद्रजी उत्तम व्यापारी होते. परंतु तरी त्यात त्यांनी स्वत:ला सर्वस्वानं गुंतवून घेतलं नव्हतं. त्यांना आध्यात्मिक चिंतनात जास्त रस होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या परस्परविरोधी पैलूंबद्दल गांधींना सुरुवातीला आश्चर्य वाटलं. आसक्ती-विरक्तीचा हा संगम त्यांना अनोखा वाटला. पण हळूहळू त्यांच्यातील स्नेह गाढ होत गेला. राजचंद्रजींकडे गांधी ओढले गेले. त्यांच्यात धर्म, मूल्ये, आदर्श, अध्यात्म यावर चर्चा होऊ लागल्या. त्यातून राजचंद्रजींची विलक्षण स्मरणशक्ती आणि अष्टावधानी प्रज्ञेची प्रचीती गांधींना येत गेली. दोघांना परस्परांची आध्यात्मिक ओढ समजून आली. दरम्यान, गांधींना कामानिमित्त द. आफ्रिकेला जावं लागलं. परंतु तिथूनही त्यांच्यात पत्रव्यवहार सुरूच राहिला. तिथं गांधींना पडलेल्या प्रश्नांची राजचंद्रजी सविस्तर उत्तरं देत. त्यातून गांधींच्या मनातले धर्मविषयक तसेच अन्य वैचारिक संभ्रम दूर होत गेले. जीवनात माणसानं कोणती मूल्यं अंगीकारावीत, त्यातून मनुष्यजातीचं कसं भलं होऊ शकेल, याबाबतीत गांधींची ठोस वैचारिक मनोभूमिका तयार होण्याच्या कामी राजचंद्रजींचे हे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. सत्य, अहिंसेचा आग्रह, ब्रह्मचर्यपालन आदी गांधींनी स्वीकारलेली आणि पुढे त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितलेली तत्त्वे ही राजचंद्रजींकडून आलेली आहेत. मात्र, धर्माच्या कडवेपणाला राजचंद्रजींचा ठाम विरोध होता. त्यांनी कधीही गांधींना आपल्या जैन धर्माचा स्वीकार करण्यासाठी आग्रह केला नाही. गांधींनी पुढे विकसित केलेली तत्त्वे आणि मूल्ये ही मूलत: त्यांना राजचंद्रजींकडून मिळाली आहेत, असे त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे.

तथापि, गांधींना राजचंद्रजींचा सहवास (प्रत्यक्ष आणि पत्रांतून) अवघा दहाएक वर्षेच मिळाला. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी राजचंद्रजींचे देहावसान झाले. परंतु त्यांची जीवनविषयक तत्त्वे गांधींजींनी प्रत्यक्षात आचरली आणि जगाला सांगितली. आणि त्याद्वारे ते ‘महात्मा’पदी पोहोचले. असा हा ‘मोहनदास ते महात्मा’ हा गांधीजींचा प्रवास घडवणारे श्रीमद राजचंद्रजी!

उत्तम गाडालिखित आणि राजेश जोशी दिग्दर्शित हे नाटक चरित्रात्मक (आणि प्रचारीही!) असलं तरी त्यात नाटय़तत्त्वांना कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता दिग्दर्शकाने घेतली आहे. कथनात्मक शैलीने प्रारंभ होणाऱ्या या नाटकाचा पुढील प्रवास मात्र प्रसंगरेखाटनातून होत जातो. क्वचित कुठे निवेदनाचा आधार घेतला ंगेला असला तरी त्याचा अतिरेक टाळला आहे. गांधी-राजचंद्रजी भेट, त्यांच्यात हळूहळू निर्माण झालेले स्नेहबंध, उभयतांच्या आध्यात्मिक प्रेरणांचा संयोग, राजचंद्रजींचं विरक्त, चिंतक व्यक्तित्व, त्यांची अफाट प्रज्ञा, गांधी आणि त्यांच्यात निर्माण होत गेलेलं अद्वैत, त्यातून गांधींना मिळालेल्या जीवनप्रेरणा, राजचंद्रजींचं अकाली जाणं आणि गांधींना त्यांच्या या जाण्यानं जाणवलेली अथांग पोकळी.. अशा तऱ्हेने या नाटकाचा प्रवास होतो. नाटकाचा विषय गंभीर असला तरीही तो हलक्याफुलक्या नर्मविनोदी प्रसंगांची पखरण करत जडजंबाल होणार नाही याची खबरदारी घेतली गेली आहे. गांधीजी आणि राजचंद्रजींच्या भोवतालची माणसं अस्सलरीत्या उभी केली गेली आहेत. नाटकात वयोवृद्ध गांधींपेक्षा तरुण गांधी अधिक प्रभावी ठरले अहेत. राजचंद्रजींचं आध्यात्मिक व्यक्तित्वही ठाशीवपणे उभं राहिलं आहे. एकूणात, उत्तम नसलं तरी एक चांगलं नाटक पाहिल्याचं समाधान या प्रयोगात नक्की मिळतं.

या नाटकाचं सतत बदलतं नेपथ्य प्रसंगानुकूल व वास्तवदशी आहे. सचिन-जिगर यांच्या संगीताने आवश्यक ती वातावरणनिर्मिती केली आहे. वेशभूषा व रंगभूषेने यातल्या समस्त पात्रांना यथार्थ ‘चेहरा’ प्राप्त करून दिला आहे.

अमलेंदू जोशी यांनी श्रीमद राजचंद्रजींचं धीरगंभीर, अदबशीर आणि प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व प्रत्ययकारीतेनं साकारलं आहे. त्यांच्या अष्टावधानी उत्तुंग प्रज्ञेचा प्रत्यय देणारा प्रसंग तर खास उल्लेख करण्याजोगाच. श्रेयस राजे यांनी तरुण गांधी तडफदारपणे उभे केले आहेत. मोहनदास गांधींची तारुण्यसुलभ उत्सुकता, बुद्धिवादी व्यक्तित्व, आध्यात्मिक ओढ या गोष्टी त्यांनी चोख दर्शविल्या आहेत. त्यामानाने देवेश काळे यांनी वठवलेले उतारवयातले गांधी ‘ठीक’ या सदरात मोडतात. संतोष म्हात्रे (दादाजी, गांडाभाई, अब्दुल्लाशेठ, डाह्य़ाभाई), आकांक्षा वाघमारे (कस्तुरभा, आभा), प्रीती पंडय़ा (पोलॉक), विशाल सोनावणे (डॉ. प्राणजीवन, बेकर), संजीव चौहान (रेवाशंकर), ऋषिकेश धामापूरकर (रशीद), केयुर पाटील (मनसुख), प्रसाद रावराणे (अंबालाल, भिका, सत्याग्रही), अमोल कागसरे (पोलीस, गोपाळभाई) यांनी आपल्या भूमिका चोख वठवण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आहे.