तरुणाईकडून दिवाळीचे स्वागत; शुभेच्छांचा वर्षांव, गप्पांचे फड, कलाकारांची हजेरी

रांगोळ्यांची भव्य आरास.. आकाशकंदिलांचा झगमगाट.. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.. सोबत ढोल-ताशांचा गजर.. सिनेकलाकारांची हजेरी.. आणि या साऱ्यांमध्ये गुंग झालेली पारंपरिक वेशभूषेतील तरुणाई.. अशा जल्लोशपूर्ण वातावरणात डोंबिवलीतील फडके रोडवर मंगळवारी सकाळ उजाडली. गुढीपाडव्यासोबत दिवाळीच्या पहाटे तरुणाईने गजबजून जाणाऱ्या फडके रस्त्यावर या वर्षीही उत्साहाला उधाण आले होते. केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे तर मुंबई, ठाणे, अंबरनाथ आणि बदलापूरमधील तरुण-तरुणींचे जथे दिवाळीचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी या रस्त्यावर एकत्र आले होते. बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटल्याचा आनंद, त्यातून रंगलेले गप्पांचे फड, शुभेच्छांचा वर्षांव, ढोल-ताशांचा गजर अशा माहोलमध्ये फडके रस्ता मंगळवारी भारून गेला होता.
डोंबिवलीतील फडके रस्त्यावर दिवाळीचा उत्साह आणि त्यातील तरुणाईचा जल्लोश याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या ५० वर्षांपासून अविरतपणे ही परंपरा सुरू असून या माध्यमातून दिवाळीचे जल्लोशात स्वागत केले जाते. मंगळवारी सकाळीही महाविद्यालयीन तरुणांनी फडके रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. पारंपरिकतेबरोबरच आधुनिकतेला महत्त्व देत मुलांनी पेहराव केला होता. सहावारी साडय़ांवर नथींचा साज चढवलेल्या तरुणी येथील
खास आकर्षण ठरल्या. तर अनेक तरुणींनी जिन्स, टॉप, वनपीससारख्या आधुनिक पेहरावासह दागिने घालून आधुनिकता
आणि पारंपरिकतेचा मिलाफ घडवून आणला
होता.

मराठी मालिकांच्या कलाकारांची उपस्थिती
फडके रस्त्यावरील दिवाळी कार्यक्रमात मराठी मालिकांमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावून तरुणाईचा आनंद द्विगुणित केला. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील रेश्मा म्हणजेच सखी गोखले, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील स्नेहा माजगावकर व नंदिता धुरी उपस्थित होत्या. अभिनेते सुनील तावडे, विजय पटवर्धन यांच्यासह गायक-गायिका रेश्मा कुलकर्णी, जुईली जोगळेकर, प्रल्हाद जाधव, महेश कंठे यांनी गाणी सादर केली, तर मधुरा व मृण्मयी गोंधळेकर यांनी नृत्य सदर केले.

दणदणाटाने हिरमोड
दिवाळीच्या निमित्ताने तरुणाईच्या भेटीगाठींचे हक्काचे स्थान असलेल्या फडके रोडवर यंदाच्या दिवाळीत मोठय़ा प्रमाणात ढोल पथकांनी हजेरी लावली होती. एकाच वेळी रस्त्याच्या मधोमध सात ते आठ पथकांनी जागा व्यापून आपली प्रात्यक्षिके सादर करण्याचा प्रयत्न केला. एका ढोल पथकाचा आवाज चढल्यानंतर दुसरे पथक अधिक आक्रमक वादन करीत होते. त्यामुळे या मंडळींची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र फडके रस्त्यावर निर्माण झाले होते. हा दणदणाट आणि ढोल पथकांच्या गलक्यामुळे अनेकांना त्रास झाला.