विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणा-या कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’. दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होण्याची आपली परंपरा कायम राखत याहीवर्षी अतिशय रंगतदार पद्धतीने हा सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न  झाला. यावर्षी ‘कल आज और कल’… अशी हटके थीम घेऊन हा सोहळा रंगला.
यावर्षीचा सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटाच्या बहुमानासह मर्डर मेस्त्री चित्रपटाने व श्री बाई समर्थ या नाटकाने पुरस्कार सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. तर  चित्रपट विभागात प्रशांत दामले यांनी सर्वोत्कृष्ट नायकाचा आणि क्रांती रेडकर व मानसी नाईक यांनी सर्वोत्कृष्ट नायिकेचा मान मिळवला. नाटक विभागात अभिजीत चव्हाण व निर्मिती सावंत यांनी बाजी मारली. तसेच पुनरुज्जीवित नाटक विभागात संशयकल्लोळ नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. याच विभागासाठी अभिनेता प्रशांत दामले (संशयकल्लोळ) व अभिनेत्री  हेमांगी कवी (ती फुलराणी) यांनी पुरस्कार पटकावले. पाच दशकाहून अधिक काळ मराठी रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांना या सोहळ्यात प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोकनाट्याचा विशेष पुरस्कार कोकणातील ज्येष्ठ दशावतारी कलावंत महादेव चोडणेकर यांना देण्यात आला. अभिनेते अरुण नलावडे यांना विशेष ज्युरी पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा,  सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कार आणि त्याला मिळणारी  प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद यामुळे ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’चा नेत्रदीपक सोहळा रंगतदार झाला.
zee talkies

चित्रपट विभाग विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट –  ‘मर्डर मेस्त्री’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राहुल जाधव (मर्डर मेस्त्री)
सर्वोत्कृष्ट लेखन –  नेहा कामत, प्रशांत लोके (मर्डर मेस्त्री)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – प्रशांत दामले(भो भो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री– क्रांती रेडकर(मर्डर मेस्त्री), मानसी नाईक ( कॅरी ऑन देशपांडे)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धार्थ मेनन(पोस्टर गर्ल),
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री-  मैथिली वारंग (वॅान्टेड बायको नंबर १)

नाटक विभाग विजेते
सर्वोत्कृष्ट नाटक – ‘श्री बाई समर्थ’
’सर्वोत्कृष्ट संहिता – ‘कुछ मिठा हो जाये’( शिरीष लाटकर, गणेश पंडित, आशिष पाथरे, अभिजीत गुरु)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश देशपांडे (श्री बाई समर्थ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिद्धार्थ जाधव (गेला उडत)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – निर्मिती सावंत (श्री बाई समर्थ)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अभिजीत चव्हाण (कुछ मिठा हो जाये )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- वनिता खरात (श्री बाई समर्थ
सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटक – संशयकल्लोळ
सर्वोत्कृष्ट अभिनेता – प्रशांत दामले (संशयकल्लोळ)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – हेमांगी कवी ( ती फुलराणी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संतोष पवार (तुम्हीच माझे बाजीराव)