मानवी वर्तन-व्यवहाराची सखोल चिकित्सा तसेच त्यातील सकारात्मक बदलांबद्दल चर्चा करणारं मानसशास्त्रज्ञाचं साप्ताहिक सदर..
एखाद्या नटाने भूमिकेत शिरून अभिनय केला तर ते आपल्या मनाला भावते. त्या पात्राकडून अपेक्षित वर्तन दर्शविल्यास नटाने त्या भूमिकेस न्याय दिला असे आपण समजतो. त्याचे कौतुक करतो. त्या पात्राच्या अपेक्षित भावभावना, मागण्या आणि गरजा लक्षात घेऊन, त्यांच्याशी एकरूप होऊन, स्वत:ची ओळख तूर्तास बाजूला सारून तो नट त्या भूमिकेत विलीन होतो आणि ते नाटक/ सिनेमा हिट् होतो. दैनंदिन जीवनातही इतरांच्या भूमिकेत शिरून त्यांची बाजू व जग समजून घेण्याची वेळ आपल्यावर बऱ्याचदा येते. भूमिकेत शिरण्याची ही प्रक्रिया नटापेक्षा किंचित वेगळी असली तरी नाते हिट् होण्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे.
स्वत:ला समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत टाकणे म्हणजे सह-अनुभूती (empathy)! या प्रक्रियेत समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरून तिच्या भावना समजून घेणे व अनुभवणे याचा समावेश होतो. स्वत:ला त्या भूमिकेच्या चौकटीत बांधून घेऊन समोरची व्यक्ती आपला जीवनप्रवास कसा अनुभवते आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे सह-अनुभूती. त्या व्यक्तीच्या अनुभवांचा निश्चित अर्थ लावू पाहणे म्हणजे सह-अनुभूती. थोडक्यात- putting yourself in other person’s shoes आणि नंतर त्यातून आपले पाऊल बाहेर काढून आपल्या स्वत:च्या वास्तव जीवनात टाकणे- तेही आपले स्वत्व व स्वत:ची भूमिका ढळू न देता- म्हणजे सह-अनुभूती. या व्याख्येवरून काही गोष्टी स्पष्ट होतात. सह-अनुभूती वाटावी यासाठी तटस्थ राहणे हे तसे कठीणच समीकरण. एखाद्या व्यक्तीची भूमिका समजून घेण्यासाठी तिच्याबद्दल आपल्याला पुरेशी/ निदान जुजबी माहिती असणे उपयुक्त ठरते. ती व्यक्ती कशी आहे, काय करते आहे व काय करू पाहते आहे, हे ज्ञात असल्यास सह-अनुभूती दर्शवणे सुलभ होऊ शकते.
सह-अनुभूती (एम्पथी) व भावनिक सहानुभूती (सिम्पथी) या काही अंशी भिन्न संकल्पना आहेत. सहानुभूतीमध्ये समोरची व्यक्ती दु:खातून, व्यथेतून मुक्त व्हावी व तिला दिलासा मिळावा, हा निखळ हेतू असतो. सह-अनुभूतीप्रमाणे यात दृष्टिकोन आणि भावविश्व समजून घेऊन, त्याच्याशी एकरूप होऊन भूमिका समजून घेणे असेलच असे नाही. करुणा, माया, सह-अनुभूती या संकल्पना एकमेकांशी निकटता पाळणाऱ्या आहेत असे म्हणता येईल.
मानसशास्त्रज्ञ मार्क डेव्हिस यांनी ‘एम्पथी’चे तीन प्रकार सुचवले आहेत. प्रथम दृष्टिकोन समजून घेण्याकडे कल असणारी सह-अनुभूती (एम्पथी)! दुसरी म्हणजे समोरच्या व्यक्तीचे भावनाविश्व हुबेहूब अनुभवणे ही व तिसरी म्हणजे समोरच्या व्यक्तीची भावना/स्थिती अचूक ओळखणे, त्या स्थितीशी तादात्म्यता वाटणे आणि ती भावना/स्थिती नकारात्मक असल्यास तिच्याप्रती आस्था/ काळजी दर्शविणे.. ही सह-अनुभूतीचे हे तीनही प्रकार थोडय़ाफार फरकाने आपल्या सर्वामध्ये अस्तित्वात असतात. त्यांचा आपण कुठे, कधी, कसा व किती प्रमाणात वापर करतो, हे महत्त्वाचे.
एक उदाहरण पाहूया.. राजीवने आपले मोबाइलचे बिल वेळेवर भरले होते. शेवटच्या तारखेच्या कितीतरी दिवस आधी. तरीसुद्धा त्याला मोबाइल कंपनीकडून बिल न भरल्याचा एसएमएस आला. बिल न भरल्यास सेवा रद्द केली जाईल असाही मजकूर त्यात होता. वेळेवर बिल भरूनही असा मेसेज आला याचा त्याला स्वाभाविकपणेच राग आला. त्याने हेल्पलाइनला फोन लावायचे ठरवले. कंपनीच्या झालेल्या चुकीबद्दल कळवण्यासाठी हेल्पलाइनला फोन लावणे, त्यांनी मागितलेल्या तपशिलांची माहिती देणे, आपली व्यथा मांडणे, याकरता वेळ खर्च करणे आणि मुख्य म्हणजे संतापरहित संवाद साधणे गरजेचे आहे असे त्याने स्वत:ला समजावले. त्याने स्वत:तील ‘सह-अनुभूती’ची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याने प्रथम हेल्पलाइनच्या फोनवर बोलणाऱ्या व आपले प्रश्न सोडवू पाहणाऱ्या प्रतिनिधीच्या नोकरीच्या स्वरूपाचा विचार केला. ‘त्याची नियुक्ती आपले प्रश्न यशस्वीरीत्या सोडवण्यासाठीच झालेली आहे, व तो करतो ते त्याचे कामच आहे, त्यात उपकार ते काय?’ असा विचार न करता त्याने त्या प्रतिनिधीच्या ‘भूमिके’त शिरून आपला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या प्रतिनिधीच्या कार्यक्षेत्राचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. सतत फोन वाजत असलेल्या गजबजलेल्या वातावरणात एका छोटय़ा क्युबिकलमध्ये बसून चिडलेल्या/ नाराज ग्राहकांच्या समस्यांचे व त्यायोगे उद्भवणाऱ्या भावनांचे व शब्दांचे वार सहन करणे किती कठीण आहे, याचे त्याने अवलोकन केले. अपमान सहन करत, नोकरी गमावण्यापासून वाचवण्याकरिता आपले बोलणे आदरपूर्वक ठेवून, ग्राहकांच्या भिन्न, विचित्र प्रश्नांची उत्तरे द्यायची वेळ माझ्यावर आली असती तर मी कसा वागलो असतो? तो ताण, दबाव मी कसा सहन केला असता? हा विचार त्याने त्या भूमिकेत जाऊन केला.. प्रत्यक्षात अनुभवला. त्या प्रतिनिधीचाही दिवस काही कारणाने नाराजीने सुरू झालेला असू शकतो. त्यालाही काही वैयक्तिक समस्या असतील.. या सर्व शक्यतांबाबत राजीवने लक्षपूर्वक विश्लेषण केले. या प्रक्रियेत त्याने आपल्या सह-अनुभूती (एम्पथी) दर्शविण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर वेळ व आपली ऊर्जा गुंतवली आणि नंतर त्या प्रतिनिधीशी फोनवर बोलताना, आपली समस्या त्याने संयमाने मांडली व उत्तर मिळवले. त्याचा आदरपूर्वक व सह-अनुभूतीपूर्ण दृष्टिकोन व संवाद अनुभवून त्या प्रतिनिधीनेही राजीवला कृतज्ञपणे त्वरित मदत केली. त्याच्या मनात हा ‘कॉल’ दिवसभरातील चांगली आठवण म्हणून रुजू झाला. राजीवच्या हे अनुभवास आले की आपली व्यथा सहअनुभूती (एम्पथी) दर्शविल्यास संयमाने, आदरपूर्वकरीत्या व दयाळूपणाने मांडता येते आणि समोरून सकारात्मक प्रतिसादही मिळणे शक्य होते. तो प्रतिनिधीही प्रोत्साहित झाला व आपले काम नेटाने करू लागला आणि पर्यायाने इतर ग्राहकांना त्याचा फायदा झाला. एकाने दर्शवलेली ‘सह-अनुभूती’ ही साखळीस्वरूप पसरून अन्य लोकांनाही दिलासा देऊन गेली.
अंतज्र्ञानाने ‘सह-अनुभूती’ ही भावना उत्कटपणे निर्माण होऊ शकते. प्रत्येक प्रश्नाच्या दोन बाजू असतात व त्या पाहण्याचा प्रयत्न म्हणजे सहअनुभूती. निर्णय घेण्याआधी दुमत होत असल्यास सर्व बाजू पडताळणे, टीका करण्याआधी ‘मी जर समोरच्या व्यक्तीच्या जागी असतो/असते तर मला कसे वाटले असते, याचा विचार विचार म्हणजे सह-अनुभूती. सह-अनुभूती ही सवयीची प्रतिक्रिया व भावना असणाऱ्या व्यक्ती आजूबाजूच्या जगाकडे करुणेच्या नजरेतून पाहतात. सिनेमा-नाटक-कथांमधील एखाद्या व्यक्तीवर झालेल्या आघातांनी अशांच्या भावना हेलावतात, त्या पात्राशी ते आपले व्यक्तित्व जोडून घेताना आढळतात. लोकांच्या समस्या, दु:ख, त्यांच्यावर झालेले वा होत असलेले अन्याय, त्यांचे दारिद्रय़, त्यांचे नैराश्य पाहून ते विचलित होतात, परंतु भान राखून जमेल तेव्हा व शक्य तितकी मदत ते करू पाहतात. ते स्वत:ला व इतर लोकही त्यांना कोमल हृदयाचे मानतात. हे लोक इतरांच्या आनंदात आनंद मानतात. इतरांचे यश, सुख, संपन्नता याने त्यांनाही समाधान वाटते. स्वकेंद्री न राहता इतरांना सामावून घेत एकत्रितपणावर त्यांचा भर असतो. इतरांच्या गरजा, आकांक्षा, भूमिका यांचा विचार त्यांच्या स्मरणात असतो. बहुतांश वेळा आपल्या स्वत:च्या भावनांशी एकरूप असणारी व्यक्ती सह-अनुभूती प्रदर्शित करू शकते.
सह-अनुभूतीची ही भावना काहींमध्ये उपजतच असलेली आढळते. म्हणजेच ती काहीजणांना नैसर्गिक देणगीसारखी लाभते. परंतु निरीक्षण व सरावातून हे कौशल्य शिकण्यास हरकत नसावी. ‘Mirror Neurons’ च्या आधारे ही भावना प्रस्थापित होऊन वृद्धिंगत होत असते असे न्यूरोलॉजिस्टचे मानणे आहे. संशोधनातून हे सिद्धही झालेले आहे. हे ‘Mirror Neurons’ इतरांच्या भावनिक प्रदर्शनाला प्रतिसाद देतात व नंतर त्या स्वरूपाच्याच भावना निर्माणही करतात. सह-अनूभूतीचे हे असेच काहीसे होते असे संशोधक मानतात.
एखाद्या व्यक्तीबद्दल व तिच्या व्यक्तित्वाबद्दल अधिक खोलवर जाणून घेण्यासाठी, आपल्या जवळच्या व्यक्तींशी जुळवून घेण्यास कठीण जात असल्यास, भांडणतंटय़ात समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्यासाठी, आपला राग शांत करण्यासाठी, भावनांवर योग्य ते नियंत्रण आणण्यासाठी सह-अनुभूती घेणे व दर्शवणे हा उत्तम उपाय ठरू शकतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची आत्मिक स्थिती समजून घेण्यास मदत होईल. एखाद्या मनुष्याच्या विशिष्ट प्रकारच्या वागण्यामागील हेतू कळण्यास/ तो शोधून काढण्यास मदत होईल. आणि हे सर्व आपण आपले स्वत:चे भान व भूमिका राखूनच करू शकू. याआधारे आपले आत्मज्ञान मिळवण्याच्या संधी वाढतील आणि आपल्याला आपल्या जगाशी आणि त्यातील व्यक्ती व घटकांशी भावनिकरीत्या जोडले गेल्याची हवीहवीशी भावना निर्माण होईल.
C. S. Lewis यांच्या विधानाप्रमाणे- Everyone feels benovelent if nothing happens to be annoying him at the moment. – ‘सह-अनुभूती’ (एम्पथी).
सर्व काही सुरळीत चालले असताना सह-अनुभूती दर्शवणे/ अनुभवणे सुलभ असू शकेल, परंतु कसोटी असते ती तणावपूर्ण स्थितीत सह-अनुभूतीला आपण आपली साक्षीदार बनवतो तेव्हा!
केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Civil Law in Constitution is equal or same
नागरी कायदा… समान की एकच?
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
congress not responsible for the defeat of babasaheb ambedkar in 1952 election as well by election in 1954
आचारसंहितेचे बंधन तपासयंत्रणांवरही असू शकते…