रीमाच्या कुटुंबीयांच्या मते, रीमा एक हुशार, स्वतंत्र, निडर, आत्मनिर्भर आणि कणखर मुलगी आहे. सासरच्यांच्या मते, ती कर्तव्यदक्ष आणि मनमिळाऊ सून आहे. सहकाऱ्यांच्या मते, ती एक कर्तबगार, प्रामाणिक कर्मचारी आहे. तिच्या मुलांच्या मते, ती एक सुपरमॉम आहे. तिच्या नवऱ्याच्या मते, ती एक अतिशय प्रेमळ, समंजस, सुंदर आणि सुशील पत्नी आहे. फॅमिली डॉक्टरांच्या मते, रीमा एक आजारी, अशक्त पेशंट आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, रीमा मानसिकरीत्या थकलेली, आपल्या इच्छांना मुरड घालणारी, इतरांसाठी झटणारी, त्यांच्या आनंदासाठी स्वत:शी कायम तडजोड करणारी, प्रसंगानुरूप सद्हेतूने मुखवटे बदलणारी ‘बिचारी’ व्यक्ती आहे. रीमाच्या मते, डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ बरोबर बोलत आहेत! सर्वाप्रती नेहमी चांगुलपणाचे मुखवटे लावून रीमा थकली आहे. कंटाळली आहे. पण मुखवटय़ांचे सत्र सुरूच आहे.
आपल्यापैकी बरेचजण मुखवटा लावून जगासमोर वावरत असतात. प्रत्यक्ष न दिसणारा, पण अवश्य अस्तित्वात असणारा, आपल्या मनातले विचार व भावना दडवून ठेवून जगाला ‘अपेक्षित’ आणि ‘मान्य’ असणाऱ्या चेहऱ्यालाच समोर आणणारा हा मुखवटा!
लहान मुलांना मुखवटय़ांचं आकर्षण असतं. वेगवेगळ्या कार्टुन्स, सुपरहीरोज्, अ‍ॅक्टर्स, क्रिकेटर्सचे मुखवटे लावले की त्यांची देहबोली, त्यांचा आवाज.. सर्व काही त्या मुखवटय़ाच्या चरित्राप्रमाणे होताना दिसतं. आपण तो मुखवटा लावलेले मूळ पात्रच आहोत असा आविर्भाव त्यांच्यात संचारतो. आपल्या आजूबाजूलाही असे मुखवटे लावलेले प्रौढ दिसतात. अर्थात् आपल्याला ते अचूक ओळखता आले तर! मुखवटे- आनंदात असल्याचे, श्रीमंत असल्याचे, जबाबदार असल्याचे. मुखवटे- कधी सत्य जगासमोर आणण्यासाठी, तर कधी ते दडवून ठेवण्यासाठी. मुखवटे- भांडणतंटा टाळण्यासाठी, तर कधी घडवून आणण्यासाठी. कधी दुसऱ्याचा बचाव करण्यासाठी, तर कधी दुसऱ्याची फसवणूक करण्यासाठी. कधी इतरांना शिकवण मिळावी म्हणून, स्वत:ला/ इतरांना लाभ व्हावा म्हणून, तर कधी प्रेरणा मिळावी म्हणून. कधी नाते जोडावे म्हणून, तर कधी तुटावे म्हणून. कधी छळ करण्यासाठी, तर कधी छळ सोसण्यासाठी/ लपवण्यासाठी. कधी दडपण वा दबाव म्हणून, तर कधी तात्पुरती सोय/ सवय म्हणून! एकामागून एक चढवलेले मुखवटे आणि त्याजोगे येणारे आविर्भाव आणि उमटणारे पडसाद! आजूबाजूची परिस्थिती आणि स्वत:ची मानसिकता नियंत्रणात ठेवण्याचा एक प्रयत्न म्हणजे हा मुखवटा!
दैनंदिन जीवनात वावरताना वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्यांना मानसोपचारतज्ज्ञ फार बारकाईने अभ्यासतात. काही वेळा एकाच व्यक्तीमध्ये भिन्न नावं, ओळख, इतिहास घेऊन जगणारी भिन्न, एकाहून अधिक व्यक्तिमत्त्वे प्रत्ययास येतात.. बऱ्याचदा आपापसात ताळमेळ नसणारी. एकाचे स्मरण दुसऱ्यास क्वचित असणारी ही भिन्न व्यक्तित्वं! बहुतांश वेळा मूळ व्यक्तीला या सगळ्याची जाणीवच नसते. त्यामुळे क्षणात एक व्यक्तित्व साकारलं जातं, तर दुसऱ्या क्षणाला दुसरं. मूळ व्यक्तीच्या स्मरणात आणि जाणिवेत ती व्यक्तिरेखा राहतेच असे नाही. हा मनोविकार म्हणजे ‘डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर’! ज्या विकाराला आधी ‘मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ म्हटले जायचे. किंबहुना, हेच नाव प्रचलित आहे. या मनोविकाराचे आणखीन अनेक कंगोरे आहेत. याचे निदान फक्त प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञच करू शकतात. हा विकार व त्याचे स्वरूप आपण इथे चर्चा करीत असलेल्या मुखवटय़ांपेक्षा भिन्न आहे.
आई, वडील, मूल, पती, पत्नी, आजी, आजोबा, मामा, काका, कर्मचारी, उद्योजक इत्यादी भूमिका वय, समाजव्यवस्था, कुटुंब, व्यवसाय आणि वैयक्तिक बाबींतून व्यक्तीच्या जीवनात प्रवेश करतात आणि ती व्यक्ती साधारणत: त्या भूमिकांना अपेक्षित वर्तन करण्याचा प्रयत्न करते. आपण इथे या भूमिका पार पाडत असताना जाणिवपूर्वक, जाणूनबुजून चढवलेल्या मुखवटय़ांबद्दल चर्चा करतो आहोत; मनोविकाराची नव्हे. आपण चर्चा करत असलेले हे मुखवटे म्हणजे जीवनाचं रहाटगाडं पुढे ढकलण्यासाठी अवलंबलेली कार्यपद्धती म्हणायला हरकत नाही.
आपले मूळ स्वरूप सतत सर्वाना समान प्रमाणात दर्शवावे अशी काही सक्ती नाही. ते कदाचित अपेक्षितही नाही. कारण सामाजिक नियम, व्यवस्था, शिष्टाचारही काही मायने राखतात. आपण चर्चा करतो आहोत ती- आपण आपल्या स्वत:ला वा इतरांनी आपल्याला एखाद्या स्वरूपात न स्वीकारल्यास निर्माण होणाऱ्या भीती, राग, अस्थिरतेसारख्या भावनांना सामोरे जाण्याऐवजी साजेसे दिसतील आणि सर्वमान्य होईल अशी छबी प्रत्ययास आणणाऱ्या मुखवटय़ांची.
असे मुखवटे लावून वागणे योग्य की अयोग्य, हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. मुखवटा चढवण्याचे प्रयोजन काय, यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. परंतु काही लोकांना कोणत्याही प्रकारचा मुखवटा (कोणत्याही प्रयोजनावर आधारीत) हा खोटेपणाचा, बेगडीपणाचा आणि फसवणुकीचा सोपा मार्ग वाटतो. ते त्यास पळवाट मानतात. आपले व्यक्तित्व जसे आहे तसे इतरांनी स्वीकारावे अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. परंतु आपल्या व्यक्तित्वाचे मूल्यमापन करून त्यात काही त्रुटी आढळल्यास इतर लोक आपला स्वीकार टाळतील ही भीती अधिक असते. त्यामुळे या त्रुटींचे प्रयत्नपूर्वक गुणांत, सामर्थ्यांत परिवर्तन करून आपले व्यक्तिमत्त्व सशक्त करण्याऐवजी तात्पुरता मुखवटा चढवला की वेळ मारून नेता येते असे आपल्याला वाटते. म्हणून मग मुखवटा आपलासा केला जातो आणि व्यक्तित्वाशी जोडला जातो. इतका, की आपले मूळ स्वरूपच कुठेतरी हरवून जाते. आणि आयुष्याच्या एका मौलिक वेळी जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो, किंवा परिस्थिती आपल्याला ते करण्यास भाग पाडते, तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. आणि मूळ स्वरूप जपण्याची संधीसुद्धा! सद्य:स्थितीत असते ती केवळ तुकडय़ा-तुकडय़ांनी जोडून तयार केली गेलेली एक ‘ओळख’! हे मुखवटे प्रसंगी लाभदायी ठरतीलही, किंवा ते त्या- त्या परिस्थितीत गरजेचे असतीलही; परंतु मुखवटेच आपली ओळख बनले आणि ते आपल्या मूळ स्वरूपापेक्षा भिन्न असले तर त्या विसंगतीशी जमवून घेता घेता कदाचित आपलीच दमछाक होईल. मग काय करावे अशावेळी?
माझा मुखवटा म्हणजे परिपूर्ण ‘मी’ नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. माझा हा ‘मी’ कोणत्या गुण-अवगुणांनी बनलेला आहे याचे नियमित आत्मपरीक्षण त्याकरता महत्त्वाचे आहे.
मुखवटेही वेगवेगळ्या स्तरांवर कार्यरत असतात. बहुतांश वेळा बहुतांश लोकांचा नित्यनेमाचा मुखवटा ‘क ंे ‘. सगळं काही ठीक आहे..’चा- म्हणजे सारं कसं सुरळीत चाललं आहे, हे भासवण्याचा असतो. यालगतचा मुखवटा म्हणजे ‘मी जो नाही, पण जसा असणे अपेक्षित आहे’ हा! म्हणजे मूळ स्वरूपातील काहीतरी दडवून ठेवण्याचा प्रयत्न. यानंतरचा स्तर मूळ स्वरूपाचा. मी खऱ्या अर्थाने कोण आहे, याचा माझ्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षा, सिद्धान्त आणि आत्मिक कथांवर आधारलेला!
ही मुखवटे निवडण्याची, ते परिधान करण्याची, झिडकारण्याची, बाळगण्याची, अवलंबण्याची प्रक्रिया क्षणिक, काही तासांची, काही दिवसांची, काही वर्षांची, तर कधी कधी आयुष्यभराचीही असू शकते. मुखवटय़ाआड राहून खऱ्या ‘मी’पासून दूर जावं, की मुखवटा हळूहळू बाजूला सारून खऱ्या ‘मी’चा शोध घ्यावा, त्याच्याशी प्रामाणिक राहावं, या निर्णयावर आपली वाटचाल निश्चित होते. त्यामुळे नात्याच्या ओघाने चालून आलेली ‘भूमिका’ पार पाडणं हे आपलं कर्तव्य आहे, हे जरी खरं असलं तरी ती भूमिका पार पाडत असताना विसंगत हेतूने चढवलेले मुखवटे किती उपयोगी आणि कितपत योग्य, याचा विचार होणे गरजेचं आहे. म्हणजे ‘भूमिका’ आणि ‘मुखवटे’ म्हणजे एकच संकल्पना आहे असं वाटेल कदाचित; परंतु त्या सारख्या नक्कीच नाहीत. आत्मपरीक्षणाचा प्रवास हा बाह्य़ रूपाकडून आत्मिक रूपाच्या दिशेने योजलेला असावा आणि आत्मिक रूपाशी समरस झाल्यावर बाह्य़ रूप नव्याने जगण्याकडे पुन्हा वळावा. या प्रक्रियेत आपले मुखवटे काटे बनून पायात खूपत असतील, अडचण बनून गती मंदावत असतील, विघ्न बनून आपल्या प्रेरणेत बाधा आणत असतील तर त्यांचे प्रयोजन काय?! त्यामुळे आपण ‘असे’ आहोत, ‘अमुक’ आहोत, हा स्वीकारच जर आपला एकमेव मुखवटा बनला तर व्यक्ती म्हणून आपल्याला कोणत्या सकारात्मक ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे ते ठरेल. हीच वाटचाल मग फुलेल.. फळेल!
डॉ. केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?