निरीक्षण, निर्णय, निश्चय, निग्रह आणि नीटनेटका निभाव, ही प्रक्रिया आपण कळत-नकळतपणे छोटय़ा-मोठय़ा गोष्टींसंबंधी राबवत असतो. प्रत्येक क्षण आपल्याला निर्णय घेण्यास प्रोत्साहित-प्रवृत्त करत असतो. काय खावं, कसा पेहराव असावा, कोणाची संगत धरावी, कोणते करिअर निवडावे, नजीकच्या आणि लांबच्या काळात आयुष्य कसे आखावे, हे व असे असंख्य निर्णय आपण घेत असतो. काही निर्णय चटकन घेतले जातात किंवा घ्यावे लागतात (उदा. एखादी बस, गर्दी असल्यास, घ्यावी का सोडून द्यावी आणि पुढच्या बसची प्रतीक्षा करावी) तर काही लांबणीवर टाकून चालतात. आपले निर्णय घेताना, म्हणजेच आपली कृती आखताना बऱ्याच गोष्टी दृश्य-अदृश्यप्रकारे कार्यरत असतात. आपली ठोक मतं आणि विचार, भावना, स्मृती, अनुभव, वस्तुस्थितीचे आकलन-अवलोकन-अंदाज, इतरांचा दृष्टिकोन, संस्कृती- समाज यांचे स्वरूप आणि ढाचा, आपले तर्क आणि तिरक्या प्रवृत्तीही! काही लोकांच्या मते ‘निर्णय घेणे’ हे नेहमी आपल्या बुद्धी आणि वर्तनाच्या नियंत्रणात असते, तर काहींच्या मते फार कमी वेळा आपल्याला हे नियंत्रण उपभोगायची मुभा असते. या दोन्हींपैकी परिस्थिती काहीही असो, निर्णय हे आपल्याला घ्यावेच लागतात. निर्णय घेणे ही एक महत्त्वाची बाब आहे आणि बरेच टप्पे असणारी प्रक्रिया. या प्रक्रियेचा वेग निरनिराळ्या वेळी भिन्न असेल, परंतु तिचे अस्तित्व निश्चितच जाणवते. आपण ही प्रक्रिया कशी राबवतो, कितपत नियंत्रण प्रस्थापित करता येते, कोणकोणत्या बाबींचा/ पैलूंचा, व्यक्तींचा समावेश त्यात होता, या व यांसारख्या गोष्टींवर त्या निर्णयाचे परिणाम, पडसाद अवलंबून असतात, असे म्हणायला काही हरकत नसावी.

कशी आखावी ही निर्णयप्रक्रिया, कोणकोणत्या पैलूंचा विचार अपेक्षित असावा, निर्णय योग्य की अयोग्य कसे ठरवावे, दबाव आणि मुभा यांचे आविष्कार कसे ओळखावे-योजावे, निर्णय चुकल्यास काय करावे, का व कसे स्वीकारावे यावर थोडंसं..

maratha reservation
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान
land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
right to public services act in Maharashtra,
 ‘आरोग्य सेवा हक्क’ यंदा निवडणुकीचा मुद्दा
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

काही बाबतीतील निर्णय हे मूलत: महत्त्वाचे वाटतात. नातेसंबंध, कुटुंब, शिक्षण, करिअर, मुलं-बाळं, पालक, शारीरिक-मानसिक-आर्थिक स्थिती व स्वास्थ्य, राहणीमान, आहार-विहार, मित्रपरिवार आणि आपल्या धारणा इत्यादी. या उलट टीव्हीवर कोणती मालिका पाहावी, नाश्त्याला पोहे करावे की उपमा या स्वरूपाचे निर्णय त्या तुलनेत कमी बौद्धिक ऊर्जा उपयोगात आणतात. पातळी, तीव्रता, स्वरूप कसेही असो, बऱ्याच वेळा आपले निर्णय वस्तुस्थितीचे संपूर्ण स्वरूप हुबेहूब लक्षात घेऊन, केवळ त्यावर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आधारलेले असण्याऐवजी, वस्तुस्थितीचा, आपण लावलेल्या अर्थावर आधारलेले असतात. एखादी नवी नोकरी स्वीकारावी का सद्य नोकरीतच बढतीसाठी प्रयत्न  करावे? लग्न झाल्यावर आई-वडिलांबरोबर एकत्र कुटुंबात राहावे की विभक्त व्हावे? मुलांसाठी कोणती शाळा निवडावी? जमलेल्या पैशातून पर्यटन करावे की भविष्यकाळाची तरतूद म्हणून सगळेच राखून ठेवावे? असे असंख्य प्रश्न मनात घर करून असतात. या प्रश्नांची उत्तरे शोधताना, हा निर्णय योग्य आहे/ ठरेल का?, निर्णय चुकला तर? लोक एखादा निर्णय घेतला तर काय म्हणतील? अशा स्वरूपाची अशाश्वततेची भीती मनात दाटून येते, परंतु ही भीती वाटणं स्वाभाविक आहे आणि एखाद्या निर्णयाचे परिणाम काय होतील, या सदरातच ती मोडते, असे म्हणण्यास हरकत नसावी. ही भीती प्रमाणात असली तर फारसे वावगे ठरणार नाही, कारण आपल्या सर्वाच्या मनात सुप्तपणे, अशाश्वततेबद्दलची-अस्थिरतेची भय आपली जागा राखून असते. परंतु हे भय आपल्या शाखा पसरवणार नाही ना, यासाठी निर्णय घेताना (जो जास्तीतजास्त ‘जाणता’ व्हावा यासाठी) काही गोष्टी निक्षून मनात बाळगाव्यात. प्रथम कोणत्या ध्येय, गोष्टीबद्दल निर्णय घ्यायचा आहे, काय स्वरूपाची गरज आहे, अपेक्षा याचा विचार करावा. त्याचबरोबर आधी म्हटल्याप्रमाणे तो निर्णय अतीव महत्त्वाचा-मोठा आहे की किरकोळ स्वरूपाचा हे प्रामाणिकपणे आणि विचारांती ठरवावे. ही पहिली पायरी महत्त्वाची ठरते. कारण या अनुषंगाने आपण आपली बौद्धिक-भावनिक ऊर्जा कितपत वापरणार आहोत हे ठरते. पुढची पायरी म्हणजे या निर्णयासंबंधीची माहिती गोळा करणे. प्रस्तुत माहितीचा स्रोत सुयोग्य, नि:ष्पक्ष आहे ना, एककल्ली नाही ना, निराधार नाही ना, याचाही विचार करावा. ही माहिती वा दृष्टिकोन कधी आत्मचिंतनातून मिळवावी लागेल तर कधी बाह्य़ स्वरूपाच्या स्रोतांकडून. इतर लोक, त्यांचे अनुभव-दृष्टिकोन- मतं यांमधून, पुस्तकांतून इत्यादी. ही (प्रथमदर्शी तरी) पूरक वाटणारी माहिती मिळवल्यानंतर, किंबहुना मिळवता-मिळवताच बरेच पर्याय, संभाव्य निवडी समोर येऊ शकतील. या व्यतिरिक्त, समोर आलेल्या पर्यायांबरोबरीने आपली कल्पनाशक्ती, अनुभव, तर्क या आधारे इतर संभाव्य कृती-पर्यायही तयार ठेवावेत. यानंतर प्रत्येक पर्याय तपासून पाहावा. कल्पनेने – उपलब्ध व गोळा केलेल्या माहितीच्या व पर्यायांच्या आधारे एखादी कृती केल्यास तिचा शेवट तो काय होईल, ही सर्व वाटचाल बौद्धिक स्तरावर करून पाहावी. पहिल्या पायरीवर विचार पक्का करून अवलोकन केलेल्या गरजेची, अपेक्षेची, ध्येयाची कितपत पूर्तता, प्रत्येक पर्याय/ निवड करू शकत आहे, याचा अभ्यास करावा. आपल्या नैतिक सिद्धांतांना बगल दिली जात नाही ना, स्वत:चा स्वार्थ जोपासताना इतरांच्या गरजांवर गदा येत नाही ना. थोडक्यात, निवडलेल्या संभाव्य पर्यायांचे परिणाम स्वत:वर व आजूबाजूच्या परिस्थितीवर आणि व्यक्तींवर काय होऊ शकतात, याचा विचार आवर्जून करावा.

निर्णय पक्का झाला, तो घेतला गेला की पुन्हा या प्रक्रियेतल्या बाबींकडे निरीक्षणात्मकदृष्टय़ा पाहावे. ज्यासाठी हा सगळा खटाटोप केला, ते ध्येय गाठले गेले का, काय योग्य केले गेले, कोठे चुकले याचा आढावा घ्यावा. कधी  निर्णय योग्य वाटेल, आनंद होईल, लाभही होताना दिसेल, समाधान वाटेल; तर कधी ही प्रक्रिया काटेकोर पद्धतीने, बुद्धीचा कस लावून जागरूकतेने जरी केली, तरी निर्णयाचा बाण चुकीच्या निशाण्यावर लागेल. तेव्हा दु:ख होईल. निराशा-निरुत्साह वाटेल, अपराधीपणाची भावना सतावेल, राग येईल, अस्वस्थ वाटेल. एखाद्या ‘डेड एन्ड’वर येऊन पोहोचल्यासारखे वाटेल. कधी निर्णयात फेरविचार करण्याची सवलत  मिळेल तर कधी हे शक्य होणारही नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रिया सुरू करताना या संभाव्य यश-अपयशाचा विचार एका कोपऱ्यात ठेवून द्यावा, निर्णयात बदल करण्याची संधी मिळाली, तर आपला वृथा अहंकार, आलस्य बाजूला सारून तिचा स्वीकार करावा. कष्ट घ्यावे, पायऱ्या आशावादीदृष्टीने परत चढाव्या. परंतु ही संधी उपलब्ध न झाल्यास त्यासोबत येणाऱ्या अप्रिय मन:स्थितीसाठी स्वतंत्र आणि सक्रिय तयारी करावी लागू शकते. बऱ्याचदा भावनांच्या आग्रहामुळे अट्टाहासामुळे, वर्चस्वामुळे बरेच निर्णय फसतात. त्यामुळे आपल्या भावनांचे स्वरूप ओळखण्याकडे आणि समदून घेण्याकडे त्यांची वेळोवेळी डागडुजी करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्यामुळे अति उत्तेजित असल्यास, निराश- अस्वस्थ असल्यास, रागात असताना निर्णय घेण्यास टाळावे.

चुकलेल्या निर्णयाच्या ‘डेड एन्ड’वर पोहोचलो तर मागे वळून पाहावे, कारण कोठेही पोहोचण्याइतकेच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचे असते ते सुरुवात केलेल्या स्थानापासून गाठलेले अंतर, तेही आव्हान झेलत, मानसिक संतुलन राखत! त्यासाठी स्वत:च्या प्रयत्नाचा आनंद मानावा. गाठीला एक अनुभव जोडला गेला, असे मानण्याचा प्रयत्न करावा.

निर्णय योग्य असल्यास उत्तम, आणि अयोग्य भासल्यास, शिकायला-सुधार करायला-स्वीकारायला वाव देतो. म्हणजेच निर्णय योग्य ठरो वा न ठरो, तो घेणं महत्त्वाचं आहे; कारण निश्चयीपणाचा अभाव आणि त्यामुळे निर्माण होणारी निष्क्रियता याची बाधा अधिक असते कारण त्यात योग्य निर्णय घेतल्यामुळे मिळणारा आनंद आणि होणारा लाभही नाही व अयोग्य निर्णयामुळे शिकवण घेण्याची संधीही नाही. कृतीशिवाय प्रगती कठीण आणि त्याबरोबरीने ही कृती व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या हिताच्या दिशेने केलेली असणं फार गरजेचं आहे. भरपूर पर्याय म्हणजे निवड/ निर्णय सोपा हे समीकरण संशोधनाने खोडून काढून, बरोबर याच्या उलट निष्कर्ष काढला आहे. बऱ्याचदा जास्त पर्याय प्रलोभनात्मक वाटतात, परंतु ऐन निवड करण्याच्या वेळी ‘अ’ निवडावं का ‘ब’ हा प्रश्न उभा राहतो, गोंधळ होतो आणि काहीही निवडले तरीही ते दुसरे का नाही निवडले, याबद्दल अस्थिरता वाटत राहते.

त्यामुळे निर्णय घेताना, आपल्या भावनांचा ‘ग्राफ’ नीटनेटका आहे ना, याची प्रथम खात्री करून घ्यावी. आधी चर्चिलेल्या तर्कशुद्ध पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करावा. थोडक्यात भावना आणि तर्क याचा अचूक मेळ घालण्याचा प्रयत्न करावा. एकदा ठरवले म्हणजे ती काळ्या दगडावरची रेघ मानत बसून वैचारिक संकुचितता अंगी बाळगण्यापेक्षा वस्तुस्थितीनिष्ठ निर्णय घेण्याकडे, वेळप्रसंगी निर्णयात मोकळ्या मनाने बदल करण्यासाठी या सत्याचा स्वीकार करावा. आयुष्य प्रत्येकालाच स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुभा व संधी प्रत्येक वेळी देतेच, असे गृहीत धरणे कठीण आहे. त्यामुळे आपल्या पारडय़ात जर ही सुसंधी येऊन पडली, तर तिचा मान राखावा आणि प्रगतीच्या दिशेने जाणारा मार्ग निवडावा. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे एखाद्या  निर्णयाचे खासकरून अयोग्य ठरलेल्या निर्णयाचे स्वरूपही बदलेल, हे नाकारता येत नाही. कोणत्याही निर्णयाकडे अंतिम सत्य म्हणून पाहून आपले वैचारिक, तात्त्विक दरवाजे घट्ट बंद करून घेण्यापेक्षा ते अशा संभाव्य बदलसापेक्ष परिस्थितींसाठी खुले ठेवावेत. निर्णय-बांधणी हे एक आत्मसात करता येण्यासारखं कौशल्य आहे. सुयोग्य हेतू, विचारपूर्वक प्रयत्न, परिणामांचा प्रगल्भ विचार व स्वीकार आपल्याला हे कौशल्य आत्मसात करण्यास साहाय्य करतील. आता आपली मानसिकता या दिशेने वळवावी का, याचा निर्णय आपला आपल्यालाच घ्यायचा आहे!

डॉ. केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com

(लेखिका  मानसशास्त्रज्ञ आहे.)