जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक सजग झाली की, ज्या गोष्टींची मनाला पूर्वी चिंता वाटायची ती वाटेनाशी होते. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? ‘काळजी घ्या, काळजी करू नका!’ त्याचा अर्थ अनुभवास येऊ लागेल. प्रत्यक्षात साधनपथावर वाटचाल सुरू केल्यावरही हे काही लगेच साधत नाही! उलट श्रीमहाराज म्हणतात त्याप्रमाणे, देवाला साक्षी ठेवून काळजी केली जाते! मग अनपेक्षित ते घडलं की सद्गुरूंनी असं कसं घडू दिलं इथपासून मी जी साधना करत आहे, जो जप करीत आहे, जी पूजाअर्चा करीत आहे, तिला काय अर्थ इथपर्यंत विचारांच्या भोवऱ्यांत साधक गटांगळ्या खाऊ शकतो. जे काही घडतं, जे काही भोगावं लागतं ते आपल्याच कर्माचं फळ आहे, हे मानायला मन तयार होत नाही. मागेच म्हटल्याप्रमाणे योग्यता नसताना यश मिळालं तर मनाची तक्रार नसते! पण यशानं हुलकावणी दिली किंवा वारंवार मनाविरुद्धच गोष्टी घडू लागल्या की असं माझं प्रारब्ध इतकं वाईट का आहे की हे माझ्या वाटय़ाला यावं, असा प्रश्न मन पोखरू लागतो. समर्थ म्हणतात, ‘‘घडे भोगणें सर्वही कर्मयोगें मतीमंद तें खेद मानी वियोगें।।’’  आता इथं जो वियोग शब्द आला आहे तो कोणत्या अर्थानं? एक खरं की कर्मप्रारब्धानुसार माणसं एकत्र येतात किंवा दुरावतातही. पण इथं एवढय़ा सीमित अर्थानं हा शब्द आलेला नाही. तर हा सुखाचा वियोग आहे, हा यशाचा वियोग आहे, हा लाभाचा वियोग आहे! आलेलं अपयश, वाटय़ाला आलेलं दु:ख, वाटय़ाला आलेली हानी हे माझ्याच कोणत्या ना कोणत्या कर्माचं फळ आहे.. सुखाचा, लाभाचा, यशाचा झालेला वियोग हा माझ्याच कोणत्या ना कोणत्या कर्मापायी माझ्या वाटय़ाला आला आहे, हे मानायला मन तयार होत नाही. उलट साधना करू लागलो की सुखच सुख वाटय़ाला यावं, दु:ख कधी येऊच नये, यशच यश वाटय़ाला यावं, अपयश कधी येऊच नये, मानच मान वाटय़ाला यावा, अपमान कधी येऊ नये, लाभच लाभ वाटय़ाला यावा, हानी कधीच होऊ नये, अशी मनाची सुप्त धारणा बनते. मग थोडंही  दु:ख, थोडंही अपयश, थोडीही हानी, थोडाही अपमान वाटय़ाला आला की साधकाचं मन खेदानं भरून जातं. साधनेवरच्या आणि त्यापेक्षाही गंभीर म्हणजे सद्गुरूंवरच्या त्याच्या विश्वासाला लगेच हादरे बसू लागतात. अशा मनाला समर्थ बुद्धीमंद म्हणतात. अशा साधकाची बुद्धी ही स्थूल, जड अशा देहाशीच जखडली आहे, असंच ते सूचित करतात. मग अशा साधकाच्या मनातला जगाचा प्रभाव पुन्हा उसळून येतो. जगाचा आधारच खरा, जगच सुखाचा एकमेव आधार आहे, जगाशिवाय दुसरा तारणहार कुणी नाही, हा खोलवर दबलेला विचार पुन्हा उसळी मारून वर येतो. साधनेच्या प्रारंभिक टप्प्यावरच्या या आंतरिक आव्हानानं गांगरून साधकानं ध्येयविन्मुख होऊ नये म्हणून मनोबोधाचा पुढचा अठरावा श्लोक सांगतो-

मना राघवेंवीण आशा नको रे

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..

मना मानवाची नको कीर्ति तूं रे।

जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें

तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणें।।१८।।

या श्लोकाचा प्रचलित अर्थ सांगतो की, हे मना, तू एका राघवावाचून कोणाचीही आशा धरू नकोस. मनुष्याची स्तुती करीत राहू नकोस. ज्या राघवाची कीर्ती वेद, शास्त्रे आणि पुराणांनी गायली त्याचे गुण वर्णन करण्यात या मनुष्यजन्माचा वापर करशील तर सारं काही सुंदर होईल, गोड होईल..

साधनपथावर थोडंसं चालल्यावरच ज्याचं मन जीवनातल्या प्रतिकूलतेनं भांबावतं आणि साधनेवरचा विश्वासच डगमगू लागतो त्याला खरं तर, केवळ एका राघवाशिवाय दुसऱ्या कोणाचीही आशा धरू नकोस,  हा बोध रुचतही नाही, मग तो रुजणं तर दूरच!

-चैतन्य प्रेम