समर्थ रामदासांनी मनोबोधाच्या चौथ्या श्लोकापासून मनाला हाताशी धरून मनाला वळण लावणारा बोध सांगायला सुरुवात केली आहे. आता मनालाच बोध का, याचा विचार आपण सुरुवातीलाही केला आहे. माणसाच्या जीवनाच्या सर्व नाडय़ा या जणू मनाच्याच ताब्यात आहेत. मनाच्या तालावरच माणूस जगत आहे. या मनाची शक्ती अत्यंत व्यापक आहे, पण तिचा क्षुद्र, संकुचित स्वार्थपूर्तीसाठी अहोरात्र वापर सुरू आहे. त्यामुळे ज्या मनाच्या योगानं आत्मसाक्षात्काराची वाटचाल सुरू करता येते तेच मन त्या मार्गातला मोठा अडसर बनलं आहे. इतकंच नाही तर जीवनातले बहुतेक सर्वच प्रश्नसुद्धा खरं तर मनामुळे निर्माण झाले आहेत. म्हणजेच मनाची घडणच बहुतेक समस्यांच्या मुळाशी आहे. दोन माणसांचं, दोन कुटुंबांचं, दोन प्रांतांचं आणि अगदी दोन देशांचंही एकमेकांशी पटत नाही याचं मूळ त्यांची मनं न जुळण्यातच असतं. मनं न जुळण्याचं कारण मानसिक धारणा, मानसिक दृष्टीकोनातील टोकाच्या भिन्नतेतच असतं. आता एवढा मोठा परीघ सोडून देऊ, आपल्यापुरता विचार करायचा तर आपल्या जीवनात जी सुखं-दु:खं आहेत त्यांचा उगम कशात आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रतिकूलतेतून वाटय़ाला येणारी दु:खं इथं अभिप्रेत नाहीत. तर व्यक्तिगत अशी जी सुखं-दु:खं आपल्याला जाणवतात, त्यांच्याकडे थोडं बारकाईनं पाहू. थोडं अलिप्तपणे पाहिलं तरी जाणवू लागेल की मनाला अनुकूल असं जे काही आहे ते सारं आपल्या सुखाचं कारण आहे आणि मनाला प्रतिकूल असं जे काही आहे ते सारं आपल्या दु:खाचं कारण आहे. थोडक्यात दु:खाचा अभाव अर्थात प्रतिकूलतेचा अभाव, हेच आपलं ‘सुख’ आहे. बरं आपल्याला या घडीला जे अनुकूल आणि प्रतिकूल वाटतं ते खरंच अनुकूल आणि प्रतिकूलच असतं का, हेसुद्धा आपल्याला नीटसं समजत नसतं. तरीही जे या घडीला अनुकूल म्हणजेच सुखाचं भासतं ते मिळवण्यासाठी आणि जे प्रतिकूल म्हणजेच दु:खाचं वाटतं ते टाळण्यासाठी आपली अहोरात्र धडपड सुरू असते. त्यासाठी देहभानदेखील हरपून प्रयत्न करताना आपल्या आचरणाच्या योग्य-अयोग्यतेकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं. मनाची हीच रीत आहे. हीच घडण आहे. हीच सवय आहे. सद्गुरूंच्या पंथावर चालायला सुरुवात करायची आहे ना? मग ही रीत, ही सवय बदलावीच लागेल.. ती माझ्या ताकदीनं मला बदलता येणार नाही, त्यासाठी सद्गुरू बोधाचाच आधार घ्यावा लागेल, हे खरं. म्हणूनच तर हा बोध समर्थ करीत आहेत. मन आज ज्या चक्रात अडकलं आहे त्या चक्राचं भेदन समर्थानी या चौथ्या श्लोकापासून सुरू केलं आहे. या चौथ्या आणि पाचव्या श्लोकात अनेक संकल्पना आपल्या समोर उभ्या ठाकतात. पाप आणि पुण्य, सत्य आणि असत्य, नीती आणि अनीती, सार आणि असार.. या दोन टोकांपैकी भ्रम आणि अज्ञानाशी जखडलेलं जे टोक आहे तिथंच आपण रमत असतो. अर्थात पापाचरण, असत्याचरण, अनीतीयुक्त आचरण आणि असार तेच सारभूत मानणं; हीच आपली सवय असते. अशा सवयीच्या जाळ्यात अडकलेल्या मनाला समर्थ समजावत आहेत आणि हे जे समजावणं आहे त्यात नवं ते काय, असा फसवा प्रश्न मनच उत्पन्न करतं. किंबहुना हे जे सांगितलं जात आहे ते दुसऱ्याला आहे, माझ्या वागण्यात काहीच चूक नाही. तसंही जगात वावरायचं तर सत्यानं वागताच येत नाही आणि जितपत शक्य आहे तितपत मी सत्याचरणानं वागतोच, असा पवित्राही मन घेतं. संतांचं जे सांगणं आहे ते ऐकून न ऐकल्यासारखं करण्याचा मनाचा तो एक डावच असतो! म्हणूनच जे सांगितलं जात आहे ते केवळ माझ्यासाठीच आहे, या भावनेनं एकाग्रतेनं ते ऐकलं पाहिजे. या एकाग्रतेनंच या ओव्यांकडे आता पाहू.
चैतन्य प्रेम

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Gold Silver Price
Gold-Silver Price on 28 February 2024: सोन्याच्या दरात आज कोणताही बदल नाही, पाहा काय आहे १० ग्रॅम सोन्याचा भाव