देहाच्याच आधारावर देहबुद्धी निर्माण होते आणि हाच देह योग्य साधनेला आणि योग्य स्वाध्यायाला जुंपूनच देहबुद्धीचा निचरा करता येतो. या घडीला मात्र हा देह हवेपणा आणि नकोपणाच्या गुंत्यात अडकला आहे. या देहाशिवाय माणूस जगूही शकत नाही आणि त्यामुळेच जगण्याचा एकमात्र आधार तो या देहालाच मानतो. त्यामुळे देह सुखी करणं हेच जीवनाचं एकमेव ध्येय तो मानतो. या देहाला जन्मापासूनच रंगरूपादि तसेच आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक पाश्र्वभूमीनुसारची विशिष्ट ओळख, विशिष्ट नातीगोती, विशिष्ट ओळखी पाळखी चिकटल्या आहेत. या सर्वामुळे या देहाला ‘मी’चा आकार आला आहे. या ‘मी’पाठोपाठ ‘माझे’चा जन्म आणि विस्तारही सहज स्वाभाविकपणे झाला आहे. माझे आप्त, माझे परिचित, माझे स्नेही, माझी मुले, माझी नातवंडे, माझे मित्र, माझे शत्रू, माझे विरोधक, माझं घर, माझी संपत्ती, माझी मालमत्ता, माझी नोकरी, माझा गाव, माझा प्रांत, माझा देश हे सर्व ‘माझे’पण एकटय़ा माझ्या देहासोबतच जन्मलं आहे आणि माझ्या देहासोबतच मावळणार आहे. या जन्म ते मावळणं, या मधल्या काळात मात्र हे ‘मी’ आणि ‘माझे’पण अगदी वज्रलेपासारखं माझ्या भावविश्वाला चिकटून आहे. माझे विचार, माझ्या भावना, माझ्या कल्पना, माझ्या इच्छा, माझ्या अपेक्षा या सर्वाना ते व्यापून आहे. या सर्वातून हवे-नकोपणा जोपासत देहबुद्धी फोफावत आहे. या सर्वात माझ्या मनाविरुद्ध बदल झाला, घट झाली किंवा वियोग झाला तर मला दु:ख होतं. जे दु:ख काळ सरूनही ओसरत नाही आणि माझ्या मनात रूतून राहातं त्या दु:खाचं रूपांतर शोकात होतं. आणि या दु:ख आणि शोकाच्या अनुभवांच्या आधारे भविष्यातल्या संभाव्य मनाविरुद्धच्या बदलांची, हानीची किंवा वियोगाची भीती वाटून जे दु:खं मी भोगू लागतो त्याला चिंता म्हणतात. थोडक्यात भूतकाळाशी जखडलेला आणि वर्तमानकाळालाही ग्रासून टाकणारा शोक, वर्तमानकाळाशी जखडलेलं आणि वर्तमानकाळाला ग्रासून टाकणारं दु:ख आणि भविष्यकाळाला जखडलेली आणि वर्तमानकाळालाही ग्रासून टाकणारी चिंता या तिन्हींच्या पकडीत देहबुद्धीच्या आधारावरच माणूस हवं ते मिळवण्याची आणि नको ते टाळण्याची धडपड करीत आहे. म्हणून समर्थ प्रथम सांगतात, ‘‘मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे।।’’ दृश्यापासूनच्या स्वाध्यायाचा हा प्रारंभ आहे! आंतरिक उत्खननाचा हा प्रारंभ आहे. ही सुरुवात कशानं आहे? तर ‘‘मना मानसीं दु:ख आणूं नको रे।’’  हे मना, दु:खाची जाणीव अंतर्मनाला करून देत राहू नकोस. त्याचजोडीला काय सांगतात? तर ‘‘मना सर्वथा शोक चिंता नको रे।।’’  हे मना जे घडून गेलं त्याचा शोक करीत बसू नकोस आणि जे घडणार आहे त्याबद्दल अवास्तव कल्पना करीत राहून त्याचं अंतर्मनावरचं ओझं वाढवणारी चिंता करीत जाऊ नकोस. थोडक्यात या घडीला स्पष्ट जाणवणारं जे दु:खं आहे, जो शोक आहे आणि जी चिंता आहे त्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आता जे दु:खं आपण धडधडीतपणे भोगत आहोत, त्याची जाणीव कशी थांबवता येईल? इतकं सोपं का आहे ते? पण तरीही कितीही दु:खात बुडालो तरी परमेश्वराच्या कृपेनं उशीरा का होईना, अतिशय वेदनांनिशी का होईना, आपल्याला झोप लागते. त्या झोपेनं मनाची किती शक्ती वाढते! दु:ख संपत नाही, पण ते सोसण्यासाठीचं बळ पुन्हा एकवटतं. त्याचं ओझं किंचित का होईना हलकं होतं. झोप म्हणजे तरी काय? झोपेत काही क्षण असे येतात जेव्हा देहभान पूर्णपणे मावळतं. देहभान मावळतं म्हणजेच देहबुद्धीच्या ओझ्याचीच जाणीव मावळते.   मग जागं असूनही देहबुद्धीच्या त्या ओझ्याची जाणीव मावळू शकली तर?

-चैतन्य प्रेम

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….