जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे, जनीं वंद्य ते सर्व भावे करावे! या चरणात सर्व हा शब्द दोनदा आला आहे आणि दोन्ही वेळा तो अत्यंत अर्थगर्भ आहे. प्रथम संतजनांनी ज्या ज्या गोष्टींची निंदा केली आहे त्या सर्वच सोडून द्यायच्या आहेत. जमतील तेवढय़ा सोडायच्या नाहीत! त्याचवेळी संतजनांनी ज्या ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या आहेत, त्या सर्व भावाने आचरणात आणायच्या आहेत.. कशातरी नव्हेत! म्हणजेच जगात विखुरलेल्या भावना गोळा करून त्या सर्व भावना याच आचरणात एकवटून टाकायच्या आहेत. आता या त्याज्य आणि स्वीकारार्ह गोष्टी कोणत्या हे ओघानं पाहूच, पण या टप्प्यावर या ‘सर्व’ शब्दाच्या अनुषंगानं थोडा विचार करू. संतांना जे त्याज्य वाटतं त्या सर्व गोष्टींचा त्याग आणि संतांना जे स्वीकारार्ह वाटतं त्या गोष्टींचा सर्वभावानं स्वीकार आपल्याला कधी साधेल? हा त्याग आणि हा स्वीकार आपल्याला या घडीला सोपा का वाटत नाही? या त्यागासाठी आणि स्वीकारासाठी आपण कधी तयार होऊ? बघा हं.. अजून मार्गावर पाऊलच टाकलंय तोवर माघारी फिरणं शक्य आहे! बरीच वाट तुडविली की कठीण.. तेव्हा इथंच क्षणभर थांबून जाणून घेऊ की या त्यागाला आणि स्वीकाराला आपण तयार आहोत का नाही? ही तयारी म्हणजे तरी कशाची आहे? खोलवर विचार करायची गरज नाही.. थोडा विचार केला तरी जाणवेल की हा त्याग आणि हा स्वीकार केवळ एका गोष्टीवरच अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजे मनाची तयारी, मनाची धारणा! सारं काही मनावरच अवलंबून आहे. मनाची तयारी असेल तर याच क्षणी संतांना जे त्याज्य वाटतं त्या सर्व गोष्टींचा त्याग आणि संतांना जे स्वीकारार्ह वाटतं त्या गोष्टींचा सर्वभावानं स्वीकार साधेल! मनाची ही तयारी करून घेण्यासाठीच तर मनोबोधाचे हे श्लोक आहेत!! पण या टप्प्यावर विचार करू की मनाची या त्यागासाठी आणि स्वीकारासाठी या घडीला पूर्ण तयारी का नाही? याचं कारण मूल्यांकनाचा गोंधळ हेच आहे. जग अशाश्वत आहे, असं सद्ग्रंथांतून जाणलं, पण जगच खरं वाटतं. परमात्माच शाश्वत सत्य आहे, हेदेखील सद्ग्रंथांतून जाणलं तरी परमात्मा काल्पनिक वाटतो.. अशाश्वत जग हेच शाश्वत सुखाचा आधार वाटतं आणि शाश्वत परमात्मा हा जगातलं सुख टिकवण्याचा एक आधार मात्र वाटतो! तेव्हा खरी किंमत, खरं मोल, खरं सत्यत्व, खरं महत्त्व जगाला आहे, परमात्म्याला नाही! मग त्या परमात्म्याशी एकरूप झालेल्या संतांना जे आवडतं ते आपल्याला कसं आवडणार? त्यांना जे आवडत नाही ते आपल्याला कसं नावडतं होणार? कारण शाश्वत परमात्म्याशी एकरूप झालेल्या संतांना जे आवडतं ते अशाश्वत जगाशी एकरूप झालेल्या आपल्याला नावडतं असतं आणि शाश्वत परमात्म्याशी एकरूप झालेल्या संतांना जे नावडतं ते अशाश्वत जगाशी एकरूप झालेल्या आपल्याला आवडत असतं. त्यामुळे श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे प्रपंचाला आपण पोटच्या पोराप्रमाणे जपतो आणि परमार्थाला सावत्र मुलाप्रमाणे वागवतो! मुखी रामनाम आहे आणि काखेत द्वैताची सुरी आहे.. मग संतांशी एकरूपता साधावी कशी? अशा द्वैताच्या द्वंद्वात सापडलेल्या आपल्या मनाला समर्थानी मोठय़ा प्रेमानं जवळ केलं आहे आणि आपल्याला ते हे सारं समजावत आहेत. तेव्हा या मार्गावर चालायचं आहे ना तर त्याचं मोल, महत्त्व कधीच नजरेआड होऊ देऊ नये.. जर ते महत्त्व लक्षात आलं तर त्यागासाठी आणि स्वीकारासाठी सर्व भावबळानिशी प्रयत्न सुरू होतील. मगच संतांना जे त्याज्य वाटतं त्याचा त्याग आणि त्यांना जे स्वीकारार्ह वाटतं त्याचा स्वीकार साधू लागेल. जेव्हा आंतरिक धारणा आणि बाह्य़ आचरण असं साधेल तेव्हाच खरा थोर सदाचार साधेल!

-चैतन्य प्रेम

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा