मनुष्यजन्माचं बीज जिच्यात आहे, तिच्यापासूनच मनोबोध आता सुरू झाला आहे. ते बीज म्हणजे वासना! श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत ना? की, वासना मारणं कठीण आहे कारण तिच्यातच आपला जन्म आहे! नीट वाचा हं, कठीण म्हणालेत, अशक्य नाही.. तर वासनेच्या पकडीतच आपला जन्म झाला, जगताना अनंत वासनांच्या गुंत्यात आपण गुरफटत राहिलो आणि आपली अखेरही वासनेच्या अपूर्तीच्या दु:खातच झाली, ज्यायोगे वासनेच्या पूर्तीसाठी पुन्हा जन्म झाला.. आता जन्म जरी वासनाबीजातून होत असला तरी मनुष्यजन्म हा केवळ सद्गुरू इच्छेनं कसा प्राप्त होतो ते ‘पूर्ण अपूर्ण’ या गुरूगीतेवरील सदरात आपण विस्तारानं पाहिलं आहे. इथे या जन्मातल्या वासनापेचाचा विचार करू. समर्थ काय सांगतात? मना वासना दुष्ट कामा नये रे। आता इथे दुष्ट आणि सुष्ट असे वासनेचे दोन प्रकार अभिप्रेत नाहीत, तर वासना ही दुष्टच असते, हेच सांगितलं आहे! आता वासना दुष्ट का असेल? तर वासना म्हटलं की आपल्या मनात प्रथम कामवासनाच येते कारण कामवासनेची शक्ती आणि आवाका, पगडा व्यापक आहे. पण वासना म्हणजे केवळ कामवासना नव्हे तर देहबुद्धीशी जखडलेल्या अनंत इच्छा, कामना या सर्वच. मग या वासना इतक्या दुष्ट का? श्रीगोंदवलेकर महाराज यांचं एक फार मनोज्ञ वचन आहे. ते म्हणतात, ‘‘काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपलं आयुष्य संपवतो.’’ थोडक्यात वासनापूर्तीच्या आशेत आपण गुंतून राहातो आणि वासनाअपूर्तीच्या दु:खातच शेवटचा श्वास सोडतो! श्रीमहाराज म्हणतात, ‘‘वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. खरं म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते!’’ कामनांचा, इच्छांचा खेळ कसा जन्मभर चालत असतो, हे या वाक्यांतून कळावं. मग ज्या सदोदित आशेत गुंतवून ठेवतात आणि मानवी जन्माच्या खऱ्या लाभापासून वंचित ठेवून मला अडकवत राहातात त्या वासना दुष्टच नाहीत का? म्हणून समर्थ म्हणतात, मना वासना दुष्ट कामा नये रे। हे मना, या दुष्ट वासनांनी मानवी जन्माचा खरा हेतू साधला जात नाही. त्या कामी त्या येत नाहीत, उलट त्यात अडसर बनतात.. परमात्मा जसा सदोदित आहे, तशीच ही वासनादेखील सदोदित आहे! या दोन्हींतील कशाशी चिकटायचं, हे ठरवण्याचं आणि त्याप्रमाणे प्रयत्न सुरू करण्याचं स्वातंत्र्य माणसाला आहे! त्या वासनेच्या झंझावातानं जीवन कसं दिशाहीन होतं, हेदेखील आपल्याला अनुभवांतून कळतं. तरी जे कळतं ते वासनेच्या जोरापायी वळत नाही! जे कळलं होतं त्याचा विसर पडतो. या पेचातून सुटायचं तर त्यासाठी सत्संग हवा. भांबावलेला माणूस या झंझावातातून सुटण्याच्या प्रामाणिक इच्छेनं म्हणून देवाधर्माचं जे सुचेल ते जमेल तसं करायचा प्रयत्नही करतो. पण गंमत अशी की सद्वासनेचं रूप घेत वासना हळूच तिथंही शिरकाव करते! श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात, ‘‘वासना ही लाडावलेल्या कुत्र्यासारखी आहे. तिला नुसते हड् हड् करून ती बाजूला जात नाही. तेही बरोबर आहे, कारण आपणच तिला लाडावून ठेवली आहे. म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते. बरे चांगली वासना तेवढी आत येऊ द्यावी असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट वासना पण हळूंच आत येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे; कारण आपण स्वत: वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत!’’ तेव्हा निर्वासन होण्यासाठी म्हणून जो जप करायचा, जी उपासना करायची, जी पूजाअर्चा करायची तो जपच, ती उपासनाच, ती पूजाअर्चाच भक्तपणाचा अहंकार निर्माण करीत नवा खेळ खेळू लागते. वासनेचं जाळ असं बळकट असतं.

-चैतन्य प्रेम

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यापासून ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?