मनोबोधाच्या ४८व्या श्कोकात श्रीसद्गुरूंचं लक्षण सांगताना आपल्या जगण्यातही ज्या तीन गोष्टींमध्ये एकसूत्रता असावी, त्याचंही सूचन आहे. या तीन गोष्टी म्हणजे आचार (सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।), उच्चार (सदा रामनामें वदे नित्य वाचा।) आणि धारणा (स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।)! श्रीसद्गुरूंच्या जीवनात या आचार, उच्चार आणि धारणेचा त्रिवेणी संगम दिसून येतो. मुख्य असते ती धारणा. त्या धारणेनुसारचं जे आचरण आहे तेच  खरं धर्माचरण! आणि स्वरूपी राहणे, हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असं समर्थही सांगतात. तेव्हा स्वरूप-स्थ सद्गुरूंची धारणा ही शाश्वताशीच अभिन्न जोडली असते. आपली धारणा अशाश्वतात गुंतलेली असते. त्यामुळे आपल्या जगण्यात अशाश्वताच्या ओढींनुसार होणाऱ्या कर्माचीच गर्दी असते. श्रीसद्गुरूंची धारणा एकाच परमतत्त्वाशी जोडली असल्यानं त्यांच्या जीवनात पूर्ण एकरसता नांदत असते. आपली धआरणा तशी घडावी, हीच त्यांची कळकळ असते. त्यासाठी आपल्या मनातील अनंत भ्रामक धारणा सोडून त्यांच्याच धारणेचा आधार घेणं अनिवार्य असतं. माझे मोहजन्य, भ्रामक मनोधर्म कायम राखून मी त्यांची धारणा आत्मसात करू शकत नाही. सर्व मनोधर्म सोडूनच त्या एकाचं ग्रहण होऊ शकतं. म्हणून भगवंतही म्हणतात ना? सर्वधर्मान् परित्यज्ज माम एकम् शरणं व्रज! धुळ्याजवळ सोनगीर म्हणून एक गाव आहे. तिथे श्रीगुरुगोविंद महाराज यांची संजीवन समाधी आहे. १८६०च्या सुमारास ते इथं आले. ते कुठून आले, कोण आहेत, याची काहीच माहिती लोकांना नव्हती. तेही २० वर्षे मौनात होते. त्यानंतर ते बोलू लागले. एकदा आध्यात्मिक उन्नतीच्या इच्छेनं एकजण त्यांच्या दर्शनासाठी निघाला होता. प्रवासात मात्र विविध प्रापंचिक इच्छा आणि चिंतांचा खेळ मनात थैमान घालू लागला. महाराजांच्या दर्शनास आला तेव्हा महाराज काय म्हणाले?.. महाराजांचं बोलणं हिंदीमिश्रित गावठी मराठी होतं.. साईबाबाही असंच बोलत.. ते बोलणं हृदयाच्या कानांना वर्णनातीत गोड वाटे.. तर महाराज काय म्हणाले? ‘‘तू आया लेकिन काई म्हैशी लेकर क्यूं आया? हकाल!’’ एका गायीगुरं राखणाऱ्याला वाटलं की सत्पुरुषाचं दर्शन घ्यावं, त्याचं सांगणं ऐकावं म्हणून तो निघाला. पण गायीगुरांचं काय करायचं, या चिंतेनं त्यांनाही घेऊन गेला. आता इकडे तो सत्पुरुष जे सांगत आहे त्याकडे लक्ष राहील की गायीगुरांत घुटमळत राहील? तेव्हा अनंत प्रापंचिक इच्छांच्या गायी-म्हशी सोबत घेऊन स्वरूप-स्थ सद्गुरूंचं खरं दर्शन आणि खरं बोधग्रहण होऊच शकत नाही. आणि प्रापंचिक इच्छांकडे जो ढुंकूनही पाहात नाही त्याच्या प्रापंचिक गरजांची हेळसांड सद्गुरू होऊही देत नाहीत. ‘आंधळ्याच्या गायी देव राखतो’, म्हणतातच ना? तर जोवर अनंत मनोधर्म मनात उसळत आहेत तोवर स्वरूपस्थ होणं अशक्यच. स्वरूपस्थ राहून जगात वावरण्याचा स्वधर्म केवळ सद्गुरूच उत्तम प्रकारे आचरत असतात आणि त्याचेच संस्कार साधकावर करीत असतात. साधकानंही याच स्वधर्मानुसार जगात रहावं, हीच त्यांची इच्छा असते. आता प्रश्न असा की साधनपथावर आल्यानं लगेच काही साधकाला खऱ्या स्वरूपाची ओळख होत नाही. मग जोवर खरं स्वरूपभानही आलेलं नसताना स्वरूपस्थ राहणं त्याला कसं साधेल? तर उत्तर सोपं आहे. जो स्वरूपस्थ आहे अशा सद्गुरूंच्याच बोधात स्थित होण्याचा प्रयत्न करायचा! कारण आपण आधीच पाहिल्याप्रमाणे सद्गुरूंची धारणा आणि त्यांचं सांगणं, यात अंतर नसतं. त्यामुळे जर त्यांच्या सांगण्यानुसार वागण्याचा अभ्यास, हेच जीवन झालं तर मग आपोआप स्वरूपाशी सुसंगत असंच जीवन उमलू लागेल. सद्गुरू तसं जीवन जगून दाखवत असतातच!

– चैतन्य प्रेम

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !