श्रीसद्गुरूंचं वर्णन समर्थ रामदास करीत आहेत- ‘‘सदा बोलण्यासारिखें चालताहें। अनेकीं सदा येक देवासि पाहे।’’ हा सद्गुरू मायेनं लिप्त अशा जगात वावरत असतानाही सदोदित शाश्वताशीच जोडलेला असतो. त्याच्या उच्चार आणि आचारात शाश्वत तत्त्वच प्रतिबिंबित होत असतं. एकाचंच असलेलं हे जग अनेक रूपांनी पसरलं आहे. सर्वसामान्य जीव या अनेक रूपांत गुरफटून त्या एकाला विसरत असतात. श्रीसद्गुरू मात्र या अनेकांत एकाच परमात्म्याला कसं पाहावं, हे बिंबवत असतात. ‘‘मी शिष्यांमध्येही रामरूपच पाहतो,’’ असं श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत ना?

साधी स्थूलाचीच गोष्ट घ्या. या पृथ्वीवर जेवढे जीवमात्र आहेत, जितक्या म्हणून वस्तू आहेत त्या खरं तर पृथ्वीच्याच आधारावर टिकून आहेत ना? इतकंच नव्हे तर पृथ्वीचीच ती रूपं नाहीत का? लाकडाच्या जेवढय़ा म्हणून वस्तू आहेत त्या झाडांपासून बनल्या आणि ही झाडं मातीतूनच उगवली, या मातीतूनच त्यांनी जीवनरस शोषला आणि या धरणीच्या वातावरणातूनच त्यांनी प्राणवायू शोषला ना? मनुष्यासकट अनंत जीव या पृथ्वीच्याच आधारावर उपजतात, जगतात, वावरतात आणि नष्ट पावत असतात. तरी जगताना या स्थूल आधाराची जाणीव तरी आपल्याला होते का? समस्त वस्तुमात्रांचा आधार आणि उगम या धरतीच्याच आधारे आहे, ही जाणीव होते का? आपण प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्राणी, प्रत्येक माणसाला त्याच्या बाह्य़रूपानुसार आणि गुणप्रधान रूपानुसार भिन्नत्वानं पाहतो आणि जाणतो. आपल्यातीलच परमतत्त्वाची ओळख जिथं आपल्याला होत नाही तिथं दुसऱ्यातील परमतत्त्वाची ओळख होणं शक्य नाही, हेही खरं. तेव्हा जिथं स्थूल आधाराबाबत एवढी अनभिज्ञता आहे, तर या स्थूलामागील जे सूक्ष्म तत्त्व आहे, त्याबाबत किती अनभिज्ञता असेल! एकच नव्हे, अनंत पृथ्वी, अनंत ग्रह, अनंत तारे असलेल्या अनंत आकाशगंगा सामावूनही त्यापलीकडे जी विराट सृष्टी आहे आणि त्यापलीकडेही जे अस्तित्वाचं स्फुरण आहे आणि त्यापलीकडेही जे एकमेव केवल अनादि-अनंत तत्त्व आहे, त्या एका सद्गुरू तत्त्वाला खऱ्या अर्थानं जाणणंही शक्य नाही तिथं त्या एकातच लय पावून समरसतेनं राहाणं सोपं का आहे? तेव्हा अनेकांतील एका तत्त्वाची सद्गुरूंना असलेली जाण आपल्याला उमगावी तरी कशी? पण सद्गुरूच जेव्हा जेव्हा या जगात देहरूपात अवतरतात तेव्हा तेव्हा त्या एका परम तत्त्वाचाच प्रसार करीत त्या एका परम तत्त्वाशी जोडणाऱ्या ईश्वर रूपाचे दास म्हणूनच वावरतात. त्या परमात्म्याची भक्ती, त्या परमात्म्याचं दास्य शिकवतात आणि इथंच एक धोक्याचं वळण लागतं.  ज्या परम स्वरूपाच्या आधारावर सर्व भ्रम मावळायचे आहेत त्यांच्याच आधारावर माणून नवे भ्रम पोसू लागतो! अनेकांतील एकत्व न जाणता तो अमकाच पंथ श्रेष्ठ, अमकंच दैवत श्रेष्ठ असा भ्रमभाव पोसू लागतो आणि त्यातच अडकतो. बरं हे श्रेष्ठत्व जाणून ज्याला आपण श्रेष्ठ मानतो त्याच्यात बुडून जाण्याची साधना न करता दुसऱ्याचा पंथ, दुसऱ्याची भक्ती, दुसऱ्याचं दैवतं  कशी हीन आहे, हे पटविण्याच्या धडपडीतच त्याला अधिक रस असतो.  ज्यानं-त्यानं त्याच्या आवडीनुसारच्या रंगाची, बांधणीची गाडी घेतली, पण त्या वाहनात तो नुसता बसून राहिला, तर काय उपयोग? गाडीच्या आधारावर रस्ता पार करून मुक्काम गाठता येण्यालाच खरं महत्त्व आहे! उत्तम गाडी लाभूनही एखादा आहे त्याच जागी राहील आणि सामान्य गाडी लाभूनही एखादा सदोदित मार्गक्रमण करीत गेल्यानं मुक्काम गाठेल! जन्मोजन्मी प्रपंच करा की जन्मोजन्मी आवडीनुसार, मर्जीनुसार ‘तप’ करा; जोवर त्या एकाला जाणत नाही, त्या एकाची खरी ओळख नाही, त्या एकाचं सदैव भान नाही तोवर  गुंतणं, फसणं आणि घसरणं काही थांबणार नाही!

– चैतन्य प्रेम