एका राजाच्या नजरेला एक तपस्वी साधू पडला. त्याच्या चेहऱ्यावरील तेज पाहून हरखलेल्या राजाला वाटलं की या संन्याशाला काय हवं असेल ते द्यावं. त्यानं मोठय़ा आढय़तेनं संन्याशाला तसं सुचवलं. संन्यासी हसला आणि म्हणाला, ‘‘तू मला काय आणि कितीसं देणार?’’ राजाचा अहंकार दुखावला गेला. तो म्हणाला, ‘‘मागून तर पाहा.’’ संन्याशानं एक लहानसा कटोरा समोर केला. राजा हसला आणि त्यानं सोन्याच्या मोहरांनी तो भरण्याची आज्ञा केली. कटोरा भरला गेला आणि क्षणार्धात रिकामा झाला! राजानं पुन्हा तो भरण्यास सांगितलं. पुन्हा तसंच झालं. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा.. सतत तेच होऊ लागलं. अखेर खजिना रिकामा झाला, पण कटोरा भरला नाही! राजानं संन्याशाचे पाय धरले आणि क्षमा मागितली. संन्यासी हसून म्हणाला, ‘‘राजा माझ्याकडे कोणतीही जादू नाही.. हा कटोरा मात्र कधीच भरणार नाही.. कारण हा माणसाच्या हृदयापासून तयार झाला आहे! कितीही मिळालं तरी तो कधीच भरणार नाही!’’ माणसाचं मन कसं दुर्भर आहे, ते अत्यंत मार्मिकपणे सांगणारी ही गोष्ट आहे. मग यावर उपाय काय? समर्थ सांगतात.. सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें! अरे मना.. या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यामागे लागलास ना, तर जन्म सरेल, पण इच्छा सरणार नाहीत! मनाला तृप्त करण्याचा कितीही प्रयत्न केलास, तरी जन्म सरेल, पण मन तृप्त होणार नाही! मग काय करावं लागेल? तर विसर पडावा लागेल त्या मनाच्या इच्छांचा! मनानं कितीही आकांडतांडव करो, लालूच दाखवो, निराशेचा बागूलबुवा उभा करो, तरीही त्याच्या इच्छांना अग्रक्रम देणार नाही! पाहू तरी, काय होतं ते! अशा वृत्तीनं मनाच्या इच्छांकडे पाहात जावं लागेल. रस्तानं चालताना मूल नाही, प्रत्येक दुकानाकडे बोट दाखवत, हे हवं, ते हवं म्हणतो? तसंच तर मन आहे. त्याला सुखाची वाटणारी प्रत्येक गोष्ट हवीशी वाटते. पण आई जशी त्याचा प्रत्येक हट्ट पुरवत नाही, त्याचं प्रत्येक मागणं पूर्ण करीत नाही त्याप्रमाणे मनाच्या हट्टाकडे पाहाण्याचा प्रयत्न करावा. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? की बोलण्याआधी ‘हे बोलणं गरजेचं आहे का?’ असा विचार करावा म्हणजे निम्मं बोलणं आपोआप कमी होईल! अगदी त्याचप्रमाणे मनाच्या प्रत्येक इच्छेची छाननी करावी की ही इच्छा पुरवणं खरंच गरजेचं आहे का? इथपासून सुरुवात केली तरी अनेक इच्छांचा फोलपणा पहिल्याच चाळणीत स्पष्ट होईल. निव्वळ इच्छांमुळे, मनाच्या हट्टामुळे गरज नसलेल्या गोष्टींमागेही आपण धावत राहातो. गरज नसलेल्या गोष्टी मिळवण्याची आणि टिकवण्याची धडपड करीत राहातो. संग्रहाची ही भूक कधीच भागणार नाही, गरजा मर्यादित केल्या तरच संग्रहावर नियंत्रण येईल. त्यामुळे इच्छापूर्तीची गरज किती, हे वारंवार तपासत गेलं तरी अनेक इच्छांचा जोर कमी होऊ लागेल. बरं मनाचा खेळ असा की ते अनंत इच्छा निर्माण करतंच, पण दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त मिळालंय, या भावनेनंही ते माणसाला मत्सराच्या वणव्यात पोळू लागतं. समर्थ म्हणतात.. करा नीकरा त्या खरा मत्सरातें।।  या मत्सररूपी गाढवाचा निकरानं सामना करा. आता मत्सराला गाढव का म्हटलं आहे? तर गाढव जसं कितीही ओझं पाठीवर लादा ते वाहून नेतं.. तसं मत्सररूपी गाढवाचं आहे.. एकदा का मत्सर मनात शिरला की तो किती नकारात्मक, विसंगत, अनीष्ट, विपरीत विचारांचं ओझं लादून घेईल आणि वाहू लागेल, याचा काही नेम नाही! या ओझ्यानं मनाची सकारात्मकता, मनाची शक्ती क्षीण होत जाईल. मग असं भूक आणि मत्सरानं सदोदित अतृप्त असलेलं मन परम अशा भक्तीकडे वळणंच कठीण. त्यामुळे जर खरी भक्ती साधायची असेल तर या भुकेचा आणि मत्सराचा निकरानं सामना करावाच लागेल.

चैतन्य प्रेम

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?