भौतिकाची  न  संपणारी भूक आणि दुसऱ्याची भौतिक प्राप्ती पाहून नकारात्मक विचारांची ओझी लादणारा मत्सर, या दोहोंशी सामना करायला समर्थ सांगतात. याचं कारण या ‘भूक आणि मत्सरा’त सर्व हवं-नकोपण एकवटलं आहे. जोवर ‘अमुक व्हावं’, ‘अमुक मिळावं’ ही भूक भागतच नाही तोवर हाव आणि धाव संपणार नाही. आपल्याला हवं ते मिळत नाही, ही तळमळ जोवर आहे तोवर दुसऱ्याला मात्र हवं ते मिळत आहे, ही खदखदसुद्धा आहे. यावर संत-सत्पुरुषांनी एकच उपाय सांगितला तो म्हणजे, ‘आहे त्यात समाधान माना’! म्हणजे तरी काय? कुणी कितीही सांगितलं तरी भौतिकाच्या किमान प्राप्तीसाठी माणूस काही प्रयत्न केल्याशिवाय राहात नाही. संतांचाही प्रयत्नांना विरोध नाही; पण त्या प्रयत्नांतूनही जे लाभतं त्याचंही खरं समाधान माणसाला भोगता येत नाही, हे वास्तव आहे! प्रयत्न जरूर करावेत, पण त्याचा पाया असमाधान का असावा? काही जण म्हणतील की, असमाधानामुळेच तर माणूस प्रयत्न करतो, माणसाला प्रयत्नांसाठी चालना देणारं बळ ‘असमाधान’च तर आहे! पण तसं नाही. असमाधान हे प्रयत्नांना जसं बळ पुरवतं तसंच ते माणसाला सदोदित निराश करीत खच्चीही करू शकतं, सदोदित नकारात्मकतेकडे वळवू शकतं. त्यामुळे जे मिळालं आहे त्याचंही मोल माणसाला जाणता आलं पाहिजे. आहे त्यात समाधान नसेल, तर जे नाही त्याची यादी कधी संपतच नाही. कितीही आलं तरी न आलेलं आणखी उरतंच. त्यामुळे मनाची भूक कधी संपतच नाही. त्यामुळे गरजाच कमी करणं आणि मग गरजेपुरतं मिळवणं, हेच भौतिकातलं लक्ष्य हवं. अधिक मिळालं तरी हरकत नाही, पण अधिकाची हाव असू नये. असं घडलं तरच मनाचा जो भवसागर आहे त्याच्या लाटांचं तांडव कमी होऊ  लागेल; पण हा सागर जर ओलांडून जायचं असेल तर समर्थ म्हणतात.. ‘‘धरा श्रीवरा त्या हराअंतरातें। तरा दुस्तरा त्या परा सागराते।।’’  यातल्या पहिल्या चरणाचा अर्थ भगवान शंकरांप्रमाणे आपलंही अंत:करण राममय करा, असा प्रचलित आहे. इथं आणखी एक अर्थछटा जाणवते. ‘श्री’ म्हणजे भौतिक संपदा. तिचा वर म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याला धरा म्हणजे त्या परमात्म्याची धारणा करा आणि ‘हराअंतराते’ म्हणजे या धारणेनं त्याच्यात आणि तुमच्यात जे अंतर आहे, जो दुरावा आहे, जो वियोग आहे तो दूर करा!  हे अंतर आहे म्हणून मन संकुचित होऊन आपल्याच जाळ्यात अडकून आहे. आता ही धारणा होईल कशानं, या धारणेसाठीचा उपाय काय? तर तो आहे नामस्मरण! याच उपायाचं विवेचन समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या ८१ ते १०२ या बावीस श्लोकांत करतात. त्या श्लोकांकडे आपण आता वळणार आहोत. त्याआधी ‘नामच का?’ या प्रश्नाचं अगदी थोडक्यात उत्तर.. आपण रस्त्यानं जात आहोत आणि दूरवर एक जण चालत आहे तर त्याला थांबवायला आपण त्याचं नावच पुकारतो, नाही का? तेव्हा भगवंत आणि आपल्यातलं अंतर कमी करण्यासाठी नामाचा दोर आहे! आपलं जीवन शब्दमय आहे आणि त्या नि:सार शब्दांना विरून टाकणारं नाम आहे! स्वनामाशी सहज एकरूप असलेल्या आणि स्वनामाच्या प्रेमात आकंठ बुडून संकुचित झालेल्या मला व्यापक करण्यासाठी नाम आहे! आपल्याला जे नाव चिकटलं आहे ते आई-बाबांनी ठेवलेलं आहे. आपण निवडलेलं किंवा जन्मत:च आपण घेऊन आलेलं नाव नव्हे ते! तरीही त्या नावाचा जप न करताही त्या नावाशी आपण किती एकरूप असतो! रस्त्यानं जाताना आपल्या नावाची हाक ऐकू आली तर याच नावाचा दुसरा कुणी असेल, असं आपल्याला वाटतही नाही. आपण लगेच वळून पाहतो. मग ज्याचं नाम आणि तो एकरूपच आहे तो आपल्या नामस्मरणरूपी हाकेला प्रतिसाद देणार नाही का? त्यासाठीच नाम आहे!

-चैतन्य प्रेम

Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब