हे जग स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन गोष्टींनी बनलं आहे. या जगात आपल्याला आपल्या देहाइतका स्थूलाचा दुसरा अनुभव नाही आणि या जगात आपल्याला आपल्या मनाइतका सूक्ष्माचा दुसरा अनुभव नाही. माणूस हा पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियांनी घडला आहे. या पाचांची आसक्तीयुक्त धाव जगातल्या ज्या स्थूल तत्त्वाकडे आहे तोच प्रपंच आहे. जगाकडची ही जी ओढ आहे ती आंतरिक आहे, पण या ओढीपायी जगाकडे धावत राहूनही अंतरंगाला शाश्वत समाधान लाभत नाही, असाही आपला अनुभव आहे. मग या अंतरंगाला ज्या शाश्वताशी एकरूप झाल्यानं समाधान लाभतं, असं संत सांगतात त्या एकरूपतेसाठीचा अभ्यास हाच परमार्थ आहे. थोडक्यात जीवनात प्रपंचही आहे आणि परमार्थही आहे. या दोन्हीचं यथार्थ मूल्यांकन साधलं की मगच प्रपंच अप्रमाण होणार नाही. प्रपंचही योग्य तऱ्हेनं होईल आणि परमार्थही साधेल. हाच अभ्यास समर्थानी मनोबोधाच्या या एकोणिसाव्या श्लोकात सांगितला आहे – ‘‘मना सर्वथा सत्य सोडूं नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे। मना सत्य तें सत्य वाचे वदावें, मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें।।’’ यात पहिल्या चरणाचा पाठभेद ‘मना सर्वथा सत्य सांडू नको रे’, असाही आहे. अर्थात इथं काय सांडू नये आणि काय मांडू नये, हेच समर्थानी सांगितलं आहे. काय सांडायचं नाही? तर सत्य सांडायचं नाही, सत्य सोडायचं नाही. आणि काय मांडायचं नाही? तर मिथ्या मांडायचं नाही. अर्थात जगताना वास्तवाचं, शाश्वताचं, सत्याचं भान सुटू द्यायचं नाही आणि जे अवास्तव, मिथ्या, अशाश्वत आहे त्याचा पसारा मांडण्यात गुंतायचं नाही! हे जे सोडणं आहे ते मनानंच आहे. प्रत्यक्षातलं नव्हे. घरदार सोडायचं नाही, घरादारातली आसक्ती सोडायची आहे. नातीगोती सोडायची नाहीत, त्यांच्यातली आसक्ती सोडायची आहे. पैसा सोडायचा नाही, त्यातली आसक्ती सोडायची आहे. आता दृश्यात जो पसारा मांडला जातो त्यापेक्षा अंतरंगातला सूक्ष्म पसारा फार मोठा असतो. आपण एखादं घर घेतो तेव्हा ते घेण्याआधीच घर कसं असावं, या कल्पनांचा मनातला पसारा त्या प्रत्यक्षातल्या घरापेक्षा फार मोठा असतो. अगदी त्याचप्रमाणे नात्यागोत्यांशी आपला प्रत्यक्ष संबंध मर्यादित असतो. म्हणजेच काळ, वेळ आणि परिस्थिती याच्या मर्यादेत आपण असल्यानं आप्तस्वकीयांशी भेटीचे, व्यवहाराचे संबंध प्रत्यक्षात कमी असतात. तरी प्रत्येक आप्ताबद्दल आपल्या मनातल्या अनुकूल-प्रतिकूल विचारांचा पसारा फार मोठा असतो. त्यानुसारचं त्यांच्यासोबत गुंतणं किंवा त्यांना टाळणंही असतं. अंतरंगातली जगाकडची ही ओढ कमी करीत न्यायची आहे. जगण्यातलं जे असार आहे, बदलणारं म्हणूनच जे मिथ्या आहे, अशाश्वत आहे त्याचंच मनन, चिंतन, विचार, कल्पना आपल्या मनात सातत्यानं सुरू असतात. ती सवय आता बदलायची आहे. त्या असत्याच्या ओढीत सत्याकडे होणारं दुर्लक्ष थांबवायचं आहे. हे कधी होईल? जेव्हा आपल्याच अंतर्मनाकडे आपण लक्ष द्यायला लागू तेव्हा. जो प्रवाहाबरोबर वाहात जात असतो त्याला प्रवाहाची दिशा योग्य की अयोग्य ते उमगत नाही. जो तटावर असतो अर्थात तटस्थ असतो तोच प्रवाहाला जाणू शकतो. तेव्हा आजवर मनाच्या ओढीनुरूप आपण प्रपंचप्रवाहात वाहात होतो, आता तटस्थपणे प्रपंचाचा तो प्रवाह पाहायचा आहे. तो पाहायला लागू तेव्हाच त्यातले भ्रम आणि त्यापायी मनात होणारे विभ्रम उमगू लागतील. प्रवाहपतीत होत वाहात जाणं थोपवता येईल. पसाऱ्याचा व्याप दिसू लागेल. तो व्याप सांभाळण्याच्या प्राणांतिक धडपडीतून होणारा ताप दिसू लागेल. तेव्हाच, ‘मना सर्वथा सत्य सोडूं नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे।’ या चरणांचा अर्थही उकलू लागेल.

– चैतन्य प्रेम

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान