सर्वसामान्य माणसाप्रमाणे बाह्य़ जीवन जगत असताना परम तत्त्वाशी एकरूपता साधण्याचा अभ्यास करता येतो. त्या अभ्यासानं आंतरिक धारणेत पालट होतो आणि आंतरिक धारणेला जीवनात सर्वोच्च महत्त्व आहे. कारण जशी धारणा असते त्यानुसारच माणसाचा विचार, चिंतन, मनन, कल्पनांचा प्रवाह हे सारं चालतं. त्यामुळे जर आंतरिक धारणा भ्रामक, मायिक गोष्टींशी जखडली असेल तर जगण्यात त्याच गोष्टींना महत्त्व येतं. जर ती धारणा व्यापक, परम, शाश्वत तत्त्वाशी जोडली असेल तर जगणंही व्यापक होऊ लागतं. आंतरिक धारणेतील या पालटाची प्रक्रियाच समर्थ रामदास स्वामी ‘मनोबोधा’च्या ८९व्या श्लोकात सांगत आहेत. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

जनीं भोजनी नाम वाचे वदावें।

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

अती आदरें गद्य घोषे म्हणावें।

हरी चिंतने अन्न जेवीत जावें।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें।। ८९।।

प्रचलित अर्थ : लोकांमध्ये असताना आणि भोजन करताना भगवंताचं नाम घ्यावं. ते आदरानं आणि स्पष्टपणे उच्चारावं. भगवंताच्या अनुसंधानात राहून अन्न सेवन करावं. असं करता विनासायास भगवंताची सहज प्राप्ती होते.

आता मननार्थाकडे वळू. ‘मनोबोधा’च्या दुसऱ्या श्लोकापासूनच जीवनाचा हेतू काय, जीवनाचं सूत्र काय, हे समर्थानी सांगितलं आहे. ते म्हणजे.. ‘‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे!’’ हे मना सज्जनांचा जो भक्तीपंथ आहे त्या मार्गानं जा. कारण या मनाची जन्मापासूनची अखंड धडपड ही केवळ अखंड समाधान मिळवण्यासाठीच आहे. पण ज्याच्या योगानं हे खरं शाश्वत अखंड समाधान मिळू शकतं त्याचाच योग त्यासाठी घडणं आवश्यक आहे. असं असताना आपण त्याच्यापासून विभक्त होणारेच सर्व उपाय, सर्व मार्ग अवंलबतो. भक्तीच्या नव्हे तर विभक्तीच्या मार्गानं वणवण फिरत राहातो. समर्थ मात्र सांगतात की हे मना, तुला जर समाधान हवं असेल तर ते केवळ सज्जनांचा जो भक्तीपंथ आहे त्याच मार्गानं गेलास तर मिळेल.. कारण त्या मार्गानं गेल्यावर श्रीहरी म्हणजे खरा सद्गुरू स्वभावत:च प्राप्त होईल! ‘‘तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे!’’ हेच सूत्र या श्लोकातही पुन्हा आलं आहे आणि जगण्यातला सर्व विभक्तीचा मार्ग सुटून भक्तीचा मार्ग कसा आचरावा, हेच या श्लोकात पुन्हा एकवार सांगितलं आहे. जगण्यातला विरोधाभास कसा संपावा, परम तत्त्वापासून असलेलं विभक्तपण कसं संपावं, हेच समर्थ या श्लोकात पुन्हा सांगतात. या श्लोकातले पहिले दोन शब्द ‘जनी भोजनी’ हे फार मार्मिक आहेत. ‘जनी’ म्हणजे संत जनांच्या संगतीत, सत्पुरुषांच्या सहवासात किंवा सत्त्प्रवृत्त साधकांच्या संगतीत.. या संगतीतसुद्धा वाचेनं नामच वदावं, असं समर्थ सांगतात. आता हे ‘नाम वाचे वदावे’ म्हणजे काय? तर परम तत्त्वाचं भान सुटू देऊ नये! आता जनांच्या म्हणजे सत्पुरुषांच्या आणि सत्प्रवृत्त साधकांच्या संगतीत परम तत्वाचं भान सुटू देऊ नका, असं समर्थ प्रथम सांगतात. आपल्याला वाटेल की, संत-सत्पुरुषांच्या संगतीत तर हे भान जागंच राहील ना? तिथं परमात्म्याशिवाय दुसरी चर्चाच नसेल.. प्रत्यक्षात होतं असं की त्या संगतीतही ‘मी’ आणि ‘माझे’च्याच चिंता मनात पिंगा घालत असतात! ‘सत्संग’ कधी आटोपतो आणि माझ्या अडीअडचणींचा पाढा कधी वाचता येतो, असं वाटत असतं. जीवन अशाश्वत आहे, मायेत गुरफटणं म्हणजे मनाची शक्ती वाया घालवणं आहे, आदी गोष्टी आपण संतांकडून ऐकतो खऱ्या, पण त्यांचं बोलणं थांबताच मायाग्रस्त शंकांची आणि प्रश्नांची उबळ आपल्याला रोखता येत नाही. तेव्हा सज्जनांच्या संगतीत तरी संकुचिताचं भान ओसरलं पाहिजे.

चैतन्य प्रेम