जगात सर्वाभूती दयाभाव ठेवून वावरायचं, सदा प्रेमळ राहायचं, असं जर मनात आणून जगू लागलो तर काय होईल? पुन्हा मन याच जगात भावनिकदृष्टय़ा गुंतू लागेल. आता जेव्हा आपण जगाचा उल्लेख करतो तेव्हा ही विराट सृष्टी आपल्याला अभिप्रेत नसते. तर आपण ज्यांना आपलं मानतो अशी माणसं, ज्यांच्याशी आपला अटळ संबंध येतो अशी नावडतीही माणसं आणि आपल्या अंतर्मनातल्या इच्छा, वासना, अपेक्षा हा गोतावळाच आपण जग म्हणून भावनेच्या पातळीवर गृहीत धरत असतो. तेव्हा सर्वाभूती दयाभाव ठेवायचा, सदा प्रेम करीत राहायचं ठरवलं तर मन पुन्हा या जगाला, जगातल्या आधारांनाच खरं मानून त्या आधारांवर विसंबू लागेल. त्या आधारांबाबत मोह, आसक्ती, दुराग्रह, हट्टाग्रह जोपासू लागेल. याच जगात गुरफटू लागेल. अशा जगावर प्रेम करीत राहून कुणाचंही मन भक्तिभावानं निवू शकत नाही. कारण या जगाला आजवर कुणीही सुखी करू शकलेला नाही. जगाच्या अपेक्षा कुणीही पूर्ण करू शकलेला नाही. जगाला आनंदी करायला जावं, तर या जगाची तृप्ती कशानंच होत नाही. तेव्हा गेल्याच वेळी सांगितलं त्याप्रमाणे, ‘दया सर्व भूतीं जया मानवाला। सदा प्रेमळू भक्तिभावें निवाला॥’ या दोन्ही चरणाचा अर्थ आपल्या जीवनात आलेल्या माणसांबद्दल समबुद्धी ठेवून जो भगवंताच्या प्रेमासाठी तळमळतो त्याच्याच अंतकरणात खरी भक्ती उत्पन्न होते आणि त्याचीच तळमळ शांत होते, असाच आहे. एकदा अध्यात्माच्या वाटेवर आल्यावर पूर्वायुष्यात ज्या माणसांमुळे कटू अनुभव आले त्यांच्याबाबत दया आणि क्षमाशीलता असली पाहिजे. जे आपल्याकडून दुखावले गेले त्यांचीही मनोमन क्षमा मागितली पाहिजे. निदान तशी इच्छा तरी असली पाहिजे. गतकाळात जमा झालेल्या कटू नात्यांबाबत आपण क्षमाशील असलं पाहिजे, दया आणि करुणाभाव ठेवला पाहिजे. जे घडून गेलं त्यांचं ओझं अंतकरणावर लादून जगता कामा नये. कुणाहीबद्दल मनात कटुता उरता कामा नये. ती उरली तर मानसिक अस्थिरता अखंड राहून अंतकरण सदोदित धगधगत राहील आणि साधनेतही एकाग्रता येणार नाही. आता १०६व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांचा जो अर्थ मांडला त्याला सुसंगत अशीच पुढील श्लोकांची सुरुवात आहे! ‘मनोबोधा’च्या या १०७व्या श्लोकाकडे वळू. हा मूळ श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

मना कोपआरोपणा ते नसावी।

मना बुद्धि हे साधुसंगीं वसावी।

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।

मना होई रे मोक्षभागीं विभागी॥ १०७॥

प्रचलित अर्थ : हे मना कोपाची आरोपणा म्हणजे धारणा नसावी. त्यासाठी बुद्धी साधूंच्या सत्संगात रमू दे. कामक्रोधादि विकारांच्या संगापासून अगदी दूर राहा. मगच तू मोक्षभागात वाटेकरी होशील.

आता मननार्थाकडे वळू. या श्लोकात अध्यात्म पथावर येण्यामागे काय ध्येय आहे किंवा असलं पाहिजे, याचा स्पष्ट निर्देश आहे. हे ध्येय आहे मोक्ष! आता मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष म्हणजे मुक्ती! आणि मृत्यूनंतरच्या मोक्षाला काय अर्थ आहे? तो कुणी पाहिला आहे! तेव्हा मृत्यूनंतर नव्हे जगतानाच मोक्षात वाटेकरी होता आलं पाहिजे. मुक्तपणे जगता आलं पाहिजे. अर्थात अर्निबध स्वैराचारानं जगणं म्हणजे मुक्त जगणं नव्हे बरं का! मुक्त जगणं म्हणजे आसक्तीपासून मोकळं होऊन जगणं. भीती, चिंता, काळजी यांच्या तावडीतून कायमची सुटका होणं.. आणि असं जर मुक्त जगायचं असेल तर, सर्वाविषयी समत्व भाव आणि विवेकानुरूप जीवन जगणंच अनिवार्य आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘मना कोपआरोपणा ते नसावी,’ आणि ‘मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।!’

चैतन्य प्रेम