जे ज्ञान केवळ ऐकीव आहे, पढिक आहे, अनुभवहीन आहे ते ज्ञान केवळ शाब्दिकच भासतं. ज्ञान असंच हवं; ज्याचा कुणालाही, कधीही अनुभव घेता येईल. ज्याची प्रत्यक्ष चाचणी करून शहानिशा करता येईल. जर ‘मी’ खोटा आहे, भ्रामक आहे तर तसा अनुभवही मला आलाच पाहिजे. जर ‘तू’ म्हणजे परमात्मा किंवा त्याच्याशी एकरूप असा सद्गुरूच खरा आहे, तत्त्वार्थानं शाश्वत आहे, तर त्याचाही अनुभव मला आलाच पाहिजे. ‘या चराचरात परमात्माच भरून आहे,’ असं नुसतं तोंडानं बोलण्यात काय अर्थ आहे? तसा अनुभवही आलाच पाहिजे, यावर आता समर्थ भर देत आहेत. त्यासाठीचा अगदी सुलभ मार्गही ते ११४व्या श्लोकापासून दाखवत आहेत. या श्लोकापासून ‘मनोबोधा’च्या मुख्य गाभ्याला समर्थ स्पर्श करीत आहेत. परमात्मस्वरूपाशी एकरूप सद्गुरू हा तो गाभा आहे! तर आता हा मूळ श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू.

हा श्लोक असा आहे :

फुकाचें मुखीं बोलतां काय वेंचे।

दिसेंदीस अभ्यंतरीं गर्व सांचे।

क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे।

विचारें तुझा तूंचि शोधून पाहे॥ ११४॥

प्रचलित अर्थ : ब्रह्मज्ञान नुसतं तोंडानं सांगण्यात काय अर्थ आहे? ‘मी मोठा ब्रह्मज्ञानी आहे,’ हा गर्व मात्र अंतकरणात दिवसेंदिवस साचत जातो. म्हणून हे मना क्रियेशिवायची बडबड व्यर्थ आहे. ती थांबवून तू आपल्या ठिकाणीच आपला शोध घे.

आता मननार्थाकडे वळू. आध्यात्मिक ज्ञान ही निव्वळ बोलण्याची, ऐकण्याची, सांगण्याची गोष्ट नाहीच. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. दुसऱ्याला भारंभार आध्यात्मिक ज्ञान ऐकवण्यात किंवा त्यावर शाब्दिक गप्पा झोडण्यात साधकाला प्राथमिक टप्प्यावरच गोडी लागू शकते. ऐकलेल्या वा वाचलेल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या जोरावर दुसऱ्याशी उत्तम प्रतिवाद करता आला तर तेवढय़ानं ज्ञानी झाल्याचाच साक्षात्कार साधकाला होतो! अशा साधकाला फटकारताना समर्थ म्हणतात, ‘‘अध्यात्म जगण्यात आणण्यासाठी कणभरही शारीरिक, मानसिक, भावनिक झळ स्वतला लागू न देता जे फुकाचं ज्ञान दुसऱ्याला ऐकवतोस, त्याचा काय लाभ?’’ काही गावी आजही लाकूडफाटा, गोवऱ्या जाळून चुलींवर स्वयंपाक करतात पाहा. पण त्यासाठी आधी स्वयंपाकाची पूर्वतयारी लागते. ती केल्याशिवाय फुंकणीनं फुंकून नुसता जाळ करून काय उपयोग? त्यानं नुसता धूर मात्र होईल, पोट भरण्यासाठीचा पदार्थ काही रांधला जाणार नाही.

अगदी त्याचप्रमाणे अध्यात्म जगण्यात यावं, अशी ना सांगणाऱ्याला ओढ आहे ना ऐकणाऱ्याला ओढ आहे! मग नुसतं रिकाम्या तोंडानं शब्द फुंकून शब्दचच्रेचा धूर करून काय उपयोग? जे सांगितलं गेलं वा ऐकलं गेलं ते आचरणात पडताळून पाहण्याची इच्छाच नसेल तर ते ज्ञान अनुभवसिद्ध होणारच नाही. त्यानं आत्मतृप्ती लाभणारच नाही..आणि आपणही पाहतो ना? भारंभार आध्यात्मिक चर्चा करणारी, पूजाअच्रेत तासन्तास रमणारी, ‘ध्यान’ किंवा ‘जपा’त खूप वेळ व्यतीत करणारी काही माणसं लहानसहान, क्षुद्र गोष्टींत किती अडकून असतात! कारण चच्रेचा आधार असलेल्या त्यांच्या ज्ञानाला किंवा स्वतच्या आवडीनुसार त्यांनी सुरू केलेल्या साधनेला ‘तू’चं अर्थात परम शाश्वताच्या जाणिवेचं नव्हे तर संकुचित ‘मी’च्या जाणिवेचंच अस्तर असतं. ही स्थिती पालटलीच पाहिजे. या भ्रामक ‘मी’चा विलय आणि शाश्वत ‘तू’चा शोध हेच साधक जीवनाच्या प्रारंभिक टप्प्यावरचं मुख्य कर्तव्य आहे, असं मोठं मार्मिक सूत्र समर्थ या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणात प्रकट करीत आहेत!