‘मी’ साधना करीत आहे, असं नुसतं मानून उपयोग नाही. मुळात साधना म्हणजे नेमकं काय, ती का, कशी आणि कोणती करावी, हे नेमकेपणानं माहीत नसताना आपण जे काही करतो ती म्हणजे एका अज्ञात कारणासाठी अज्ञाताच्या शोधाची धडपड असते! शोधाचं कारणही अज्ञात आहे, असं का याचा प्रथम विचार करू. साधनापथावर येण्याआधी आपण भौतिकातलं जे जीवन जगत होतो ते जाणतेपणानं जगत आहोत, असं आपण गृहीत धरलं होतं. अमुक एक केलं की अमुकच घडेल, असं आपण गृहीत धरलं होतं. आपण दुसऱ्यावर ‘प्रेम’ करत आहोत म्हणजे दुसराही आपल्यावर प्रेमच करील, आपल्या प्रेमाला जागेल, हे आपण गृहीतच धरत होतो! मग हे गृहीत धरणं आई-बापाचं मुलांकडून असेल, पतीचं पत्नीकडून वा पत्नीचं पतीकडून असेल, मित्राकडून असेल, प्रियकराचं प्रेयसीकडून असेल.. आपण परिस्थितीकडून, व्यक्तींकडून अनेक गोष्टी मनाजोग्या मिळतील, घडतील हे गृहीत मानूनच आशेवर जगत होतो. आपण सुखासाठीच प्रत्येक क्षणी प्रयत्न केला, पण प्रयत्नांच्या तुलनेत हमखास ‘सुखी’ काही झालो नाही! थोडं सुख मिळालंही, पण त्याला ‘हे टिकेल का?’ या प्रश्नाची किनार आपण जोडलीच. तेव्हा कोणत्याही क्षणी आपल्याला नि:शंक मनानं खरं सुख काही भोगता आलं नाही. मग आपली गृहीतकंही जेव्हा कोलमडू लागली तेव्हा आपण अस्वस्थ होऊन तळमळू लागलो. खरं सुख कशानं मिळेल, याचा शोध घेऊ लागलो. या भौतिक प्रयत्नांपलीकडेही असं काही आहे का, ज्याच्या आधारावर आपल्याला सुख मिळेल, हा विचार प्रथमच मनात आला! मग कुणी म्हणालं ‘ध्यान’ केल्याचा फार फायदा होतो, तर पुस्तकं वाचून किंवा कुणाचं तरी ऐकून ‘ध्याना’ला लागलो. कुणी कसले कसले ‘जप’ सुचवले ते करू लागलो, पोथ्या वाचू लागलो, पारायणं करू लागलो, मंदिरांमध्ये जाऊ लागलो, तीर्थयात्रा करू लागलो, आध्यात्मिक ज्ञानानं भरलेली पुस्तकं वाचू लागलो.. हे सुरू असतानाच गृहीत धरण्याची आपली सवय काही सुटली नाही! आता ध्यानानं आपल्याला बरं वाटेल, जपानं चिंता दूर होतील, व्रतानं जीवनातली प्रतिकूलता दूर होईल, पारायणानं अमुक समस्या दूर होईल, तीर्थयात्रेनं भौतिकातला अमुक एक हेतू सिद्धीस जाईल, अशा तऱ्हेची नवी गृहीतकं मनानं निर्माण केली!

या साऱ्या धडपडीचं नेमकं कारण काय, आपण जो शोध घेत आहोत.. हे जे ‘आध्यात्मिक’ प्रयत्न करीत आहोत, त्या मागचा हेतू नेमका काय, हेसुद्धा अगदी स्पष्टपणे आपल्याला माहीत नसतं. परमेश्वराचं दर्शन व्हावं, परमेश्वर प्रसन्न व्हावा, त्याची अखंड कृपा लाभावी वा साक्षात्कार होऊन परम शक्तीचं पाठबळ अखंड लाभावं, अशी काहीशी आपल्या मनातली सुप्त भावना असते. बरं परमेश्वर नेमका कसा आहे, त्याचं दर्शन होणं म्हणजे काय, त्याचा साक्षात्कार होणं म्हणजे काय, परम शक्ती म्हणजे नेमकी काय, तिचं पाठबळ लाभणं म्हणजे काय; यातलं काहीही आपल्याला नेमकेपणानं माहीत नसल्यानं नेमके काय प्रयत्न करावेत, हेही माहीत नसतं. बरं हे जे काही परमेश्वराचं दर्शन घडणं / कृपा प्राप्त होणं आहे ते तरी कशासाठी, हेसुद्धा नेमकं माहीत नसतं. म्हणजे जर परमेश्वर खरंच प्रसन्न झाला तर नेमकं त्याच्याकडे असं काय मागावं ज्यायोगे जीवनातलं दु:ख कायमचं नष्ट होईल, हेसुद्धा माहीत नसतं! तर ज्याचा शोध सुरू आहे तो अज्ञात आहे, त्याच्याकडून नेमकं काय हवं आहे हेही अज्ञात आहे आणि म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की, आध्यात्मिक वाटचालीच्या प्राथमिक टप्प्यावरचे आपले सर्व प्रयत्न म्हणजे अज्ञात कारणासाठी अज्ञाताच्या शोधाची धडपड! याच धडपडीत गुंतलेल्या आणि काहीशा भांबावलेल्या मनाला समर्थ ओरडून सांगत आहेत, ‘‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे। विचारें तुझा तूंचि शोधून पाहे!!’’