‘मी’ जर भ्रामक असेन तर तो भ्रामकपणा मला उमगत का नाही? आणि ‘तू’ म्हणजे सद्गुरूच जर खरा असेल तर तो सहजप्राप्य का नाही? जो खरा आहे अशा सद्गुरूपर्यंत पोहोचावं कसं? त्याचा शोध कसा घ्यावा, असे काही प्रश्न साधनेच्या प्रारंभिक टप्प्यावर प्रत्येक प्रामाणिक माणसाच्या मनात निर्माण होत असतात. त्यासाठी तो मिळेल ते ग्रंथ वाचतो, साधना करणाऱ्या ज्येष्ठ साधकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. कधी कुणा सत्पुरुषाच्या भेटीचाही लाभ घेतो. पण तरी ‘मी’चं खरं म्हणजेच भ्रामक स्वरूप काही ठोसपणे समजत नाही. शब्दार्थानं बरंच काही माहीत झालेलं असतं, पण ते खरेपणानं भिडत मात्र नसतं. ‘मी’च खोटा आहे त्यामुळे ‘मी’चा त्याग झाला की ‘माझे’चा त्याग आपोआप घडेल, हे त्याला ऐकून माहीत असतं. पण मुळात ‘मी’ खोटा नव्हे खराच वाटत असतो. त्यामुळे त्याचा त्याग शक्यच नाही, हाच मनोभाव दृढ असतो. मुळात हा ‘मी’चा त्याग म्हणजे काय, हेच कळलं नसल्यानं जे काही वाचतो, ऐकतो ते अंत:करणात पक्कं ठसत नसतं. कळल्यानुसार आणि आवडीनुसार जी काही ‘साधना’ करत असतो त्यातही चिकाटी नसते. स्वबळावर हा शोध शक्य नाही, हे खरं, तरीही या शोधासाठीची अंतरंगातली तळमळ वाढावी यासाठी समर्थानी ‘मनोबोधा’च्या ११४व्या श्लोकात हा शोध आधी तुझा तूच सुरू कर आणि खऱ्या ‘तू’चा शोधही तुझा तूच घे, असं सांगून टाकलं!

आता पुढील म्हणजे ११५ व्या श्लोकात ते ‘मनोबोधा’च्या हृदयाकाशाच्या वेशीपर्यंत आपल्याला नेणार आहेत आणि गेल्या भागात म्हटलं त्याप्रमाणे तीन महाप्रश्नांची स्पष्ट उत्तरंही देत आहेत. सद्गुरूच्या या शोधाची प्रक्रिया कशी आहे, या शोधाची पूर्वतयारी आणि जोडतयारी काय आहे आणि या शोधाची अखेर किंवा परिपूर्ती काय आहे, हे ते तीन महाप्रश्न आहेत! तर प्रथम ‘मनोबोधा’चा हा पुढला म्हणजे ११५ वा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू, मग मननार्थाकडे वळू.

तर हा श्लोक असा आहे :

तुटे वाद संवाद तेथें करावा।

विवेकें अहंभाव हा पालटावा।

जनीं बोलण्यासारिखें आचरावे।

क्रियापालटें भक्तिपंथेंचि जावें॥ ११५॥

प्रचलित अर्थ : वाद मिटण्यासारखा असेल अशा ठिकाणीच तत्त्वजिज्ञासेने निरभिमानी सत्पुरुषाशी संवाद करावा. विवेकाने आपला अहंभाव सोडावा. आपण बोलतो त्याप्रमाणे वागावे आणि आपले आचरण शुद्ध करून भक्तिमार्गाची वाट धरावी.

आता मननार्थाकडे वळू. मनाच्या श्लोकांना एक निश्चित क्रमवारी आहे. साखळीतल्या कडय़ा जशा एकमेकींत गुंफलेल्या असतात त्याप्रमाणे प्रत्येक श्लोक हा आधीच्या श्लोकाशी सांधला आहे. याच श्लोकाचं पाहा ना.. पहिला चरण सांगतो की, ‘‘तुटे वाद संवाद तेथें करावा!’’ आता ‘तेथे’ म्हणजे नेमकं कुठं? आणि तिथं काय करायचं आहे? कोणती कृती करायची आहे? तर ती कृती आधीच्या ११४व्या श्लोकाच्या अखेरच्या चरणातच तर सांगितली आहे! विचारें तुझा तूंचि शोधून पाहे, ही ती शोध घेण्याची कृती आहे. ही कृती कुठं करायची आहे? हा शोध कुठं घ्यायचा आहे? तर जिथं वाद आणि संवाद तुटलेला असतो अशा ठिकाणी हा आत्मशोध सुरू करायचा आहे.

थोडक्यात जगाशी वाद घालण्याचीही हौस उरलेली नाही की आपलं मत दुसऱ्यानं मान्य करावं, या एकमेव हेतूनं जगासोबत चालणाऱ्या संवादाच्या धडपडीतही रस उरलेला नाही! आता मनाची ही स्थिती कशानं प्राप्त होईल? तर विवेकानं! विचाराशिवाय विवेक शक्य नाही आणि त्यामुळे, काय योग्य आणि काय अयोग्य, या विचारानुरूप जेव्हा जे योग्य आहे त्याच्या निवडीचा विवेक रुजू लागेल तेव्हाच अविवेक ओसरेल आणि वाद-संवादाचं मूळ असलेला अहंभाव पालटेल.