आपल्या भक्तांची देव कशी कधीच उपेक्षा करीत नाही, त्या भक्तांचा तो कसा नेहमी सांभाळ करतो, हे ठसविण्यासाठी समर्थानी ‘मनोबोधा’च्या ११६ ते १२५ या श्लोकांत पुराणकथांचे दाखले दिले आहेत. या श्लोकांपैकी पहिल्या चार श्लोकांचा प्रचलित अर्थ आपण जाणून घेतला. त्यांच्या मननार्थाकडे वळत असतानाच एक प्रश्नही उपस्थित झाला की, आताचा काळ कुठला आणि त्यात या पुराणकालीन कथा कुठल्या? देवानं त्या काळी धाव घेतली असेलही, पण आज तो घेईल का? या कथांवर विश्वास ठेवून मनानं नि:शंक होता येईल का?.. पुढे मी असंही म्हटलं की, समर्थाच्या काळीही हाच प्रश्न काहींच्या डोक्यात आलाच असेल! समर्थाच्या काळी शिवरायांचा उदय होईपर्यंत देश अनाचार, अत्याचार, दडपशाहीनं गांजला होताच, त्यामुळे तेव्हाही काहींचा या दाखल्यांवर नि:शंक विश्वास बसला नसेलच.

या प्रश्नाचा विचार आपण ओघानं करणार आहोतच. पण प्रथम या श्लोकांत ज्या कथा आल्या आहेत त्यांचा थोडा विचार करू. गेल्या वेळी म्हटल्याप्रमाणे ११६ ते १२५ या श्लोकांत  तपस्वी राजा अंबरीश, ऋषिपुत्र उपमन्यु, राजपुत्र ध्रुव, गजराज गजेंद्र, पापकृत्यांत जन्म गेलेला अजामिळ यांच्या कथा आहेत. म्हणजेच एक तपाचरणी राजा आहे (अंबरीश), तर एक पापाचरणी सामान्य नागरिक आहे (अजामिळ), एक राजसंपन्न राजपुत्र (ध्रुव) आहे तर एक दारिद्रय़संपन्न ऋषिपुत्र (उपमन्यु) आहे. त्या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे प्रतिकूल परिस्थिती! आणि या सर्व उदाहरणांचा कळसाध्याय असलेला एक गजराज आहे तो म्हणजे गजेंद्र! या सर्वाचं रक्षण देवानं केलं, असा दाखला समर्थ देत आहेत. त्यासाठी काही पुराणकथांचा उल्लेख ते करीत आहेत.

पहिला दाखला आहे तो राजा अंबरीशाचा. हा मोठा विष्णुभक्त होता. कार्तिकात एकदा द्वादशीला दुर्वास ऋषी अनेक शिष्यांसह त्याच्याकडे आले, राजाच्या विनंतीवरून भोजनास थांबले. दुर्वास मुनी नदीवर स्नानासाठी म्हणून गेले आणि त्यांना परतायला उशीर होऊ  लागला. द्वादशी संपायची वेळ आली आणि म्हणून राजानं नुसतं तीर्थ ग्रहण करून पारणं केलं. त्यावर संतापून दुर्वासांनी राजाला शाप दिला. पुराणातली कथा सांगते की ऋषींनी राजाचा संहार करण्यासाठी एक कृत्या निर्माण करून ती सोडली. तेव्हा विष्णूने भक्ताच्या रक्षणासाठी सुदर्शनचक्र सोडून तिचा नि:पात केला. मग ते चक्र ऋषींच्या मागे लागले, पण त्यांच्या तप:प्रभावामुळे त्यांना स्पर्श मात्र करू शकले नाही. अखेर ऋषी विष्णूस शरण गेले आणि मग राजाला शापप्रभावातून मुक्त करण्यासाठी विष्णूने विविध अवतारांत ते सर्व कष्ट आनंदानं सोसले.

दुसरी कथा आहे ती पापाचरणी अजामिळाची. ‘मनोबोधा’च्या ९५व्या श्लोकात याआधी अजामिळाची कथा आलीच आहे. त्या अनुषंगानं आपण विस्तृत चिंतनही केलं आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती टाळून थोडा विचार करू. अंबरीश आणि अजामिळ या दोघांची कथा काय सांगते? अंबरीश हा तपाचरणी राजा होता, तर अजामिळ हा पापाचरणी होता. ‘जेणें जाळिला काम तो राम ध्यातो,’ असं समर्थानी ८३व्या श्लोकात सांगितलं असताना जो पापात पूर्ण बुडाला होता अशा अजामिळाला एका नामोच्चारानंही उत्तम गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला! (गती ‘मिळाली’ नाही, तो मार्ग मोकळा झाला, हे नीट लक्षात घ्या. तो कसा मोकळा झाला हे याच सदराच्या ९५व्या श्लोकाच्या चिंतनात आलंच आहे). थोडक्यात पापाचरणी माणसालाही तपाचरणाकडे वळण्याची एक संधी परमात्मा देतोच, हेच ही कथा सांगते. आता ऋषिपुत्र उपमन्यु आणि राजपुत्र ध्रुवाच्या कथांचा विचार करू.