समर्थ रामदासविरचित ‘मनोबोधा’च्या १२४व्या श्लोकाचे अखेरचे दोन चरण हे भगवंताच्या नवव्या अवताराविषयी म्हणजे बौद्ध अवताराविषयी आहेत. गेल्याच भागात म्हटलं त्यानुसार काही तत्त्वज्ञ हा अवतार भगवान गौतम बुद्धांचा आहे, हे मानत नाहीत. बौद्ध धर्म मांडणाऱ्या भगवान बुद्धांच्याही आधी पुराणांतरी बुद्ध म्हणून एका अवताराचा उल्लेख आहे. राक्षसांना वेदविद्या मिळू नये आणि ती देवांकडेच राहावी यासाठी भगवंतानं हा अवतार घेतला होता, असं सांगतात. त्या अवतारानं वेदांची निंदा करून राक्षसांचा बुद्धिभेद केला होता. आता कुणाला स्वाभाविकपणे वाटेल की, वेदांचं ज्ञान राक्षसांनी मिळवलं तर त्यात गैर काय आहे?  भगवंतानं अवतार घेऊन वेदांची निंदा करून राक्षसांची दिशाभूल करणं, फसवणूक करणं, हे तरी योग्य आहे का? वरकरणी प्रश्न अगदी अचूक आणि रास्त आहे, पण त्यासाठी थोडा सूक्ष्म विचार करू. ‘देव’ आणि ‘दानव’ किंवा ‘सुर’ आणि ‘असुर’ हे दोन विभिन्न प्रवृत्तींचे प्रतिनिधी आहेत. तप करून लाभलेल्या पुण्याच्या जोरावर कुणालाही देवयोनी सहज प्राप्त करून घेता येत असे, हे पुराणातील अनेक गोष्टींवरून दिसतं. म्हणून तर कुणी तप करू लागला तर त्याच्या तपोबलानं आपलं इंद्रपद आपण गमावू, अशी भीती इंद्राला सतत वाटत असे! अगदी त्याचप्रमाणे एखादं गैरकृत्य वा पापकर्म केल्यावर स्वर्गलोकातले अनेक गंधर्वही शापामुळे राक्षस म्हणून जन्मल्याच्या कथा आहेत. थोडक्यात ज्याची प्रवृत्ती तामसी आहे तो राक्षस झाला आहे आणि ज्याची प्रवृत्ती सात्त्विक आहे तो देव झाला आहे. शापमुक्त होताच गंधर्व वा देवता आपल्या मूळ स्वर्गलोकाला गेले आहेत, तर पुण्यसाठा संपताच स्वर्गलोकातून पुण्यात्म्यांची हकालपट्टी झाल्याचं ‘गीते’तदेखील नमूद आहे. तरीही दानवांना वेद मिळाले असते तर त्यात काय विपरीत होतं, असं कुणालाही वाटेल. थोडा आजचा विचार करून पाहा! अध्यात्माचा ज्यांनी बाजार केलाय आणि आपणच धर्माचे आणि लोकांचे भाग्यविधाते आहोत, असं भासवत जो आर्थिक आणि नैतिक अनाचार केला आहे, त्यांना वेदांचं ‘ज्ञान’ नाही का? उलट त्या ज्ञानाच्या जोरावरच तर त्यांच्याकडून लोकांची फसवणूक होते आणि ती अधिक घातक आहे! तेव्हा ज्ञानाचा उपयोग न होता उलट त्या ज्ञानाच्या जोरावर लोकांची हानी होईल, हे लक्षात आल्यावर भगवंतानं बुद्धिभेद करणारा अवतार घेतला असावा.  देवांचा अहंकार जेव्हा जेव्हा वाढू लागला तेव्हा तेव्हा परमात्म्यानं राक्षसांचं सामथ्र्य वाढवून देवांना कोंडीत पकडलं आहे. त्यांना त्यांच्या अहंकाराचा निरास करायला लावला आहे. तेव्हा नववा अवतार जर सूक्ष्म मानला तर तो कलियुगातल्या ‘मौन’ म्हणजे सत्य काय आणि असत्य काय, हे उघड न करणाऱ्या बुद्धीचाही आविष्कार आहे! त्यामुळे ज्या बुद्धीच्या जोरावर माणूस सूक्ष्म ज्ञान हस्तगत करू शकतो त्याच बुद्धीच्या जोरावर तर्क-वितर्क वाढवीत तो त्या ज्ञानालाच अज्ञान मानून त्याचा अव्हेरही करू शकतो! तेव्हा तामसी अंत:करणात याच बुद्धिभेदानं अध्यात्माचं सूक्ष्म ज्ञान स्थिरावू शकत नाही आणि सात्त्विक अंत:करणात ते प्रकाशमान होत जीवन घडवू शकतं! हा सूक्ष्म ‘बुद्धावतार’ दोन पातळ्यांवर अशी मोठी रहस्यमय कामगिरी पार पाडत आहे! आता गौतम बुद्धांचा जो अवतार आहे तो विष्णूचा नववा अवतार मानायला काही तत्त्वचिंतक तयार नाहीत. याचं एकमेव कारण काय, तर गौतम बुद्धांनी वेदच नाकारले होते, वेदांची निंदा केली होती, ईश्वरच नाकारला होता आणि आत्मा-परमात्माही नाकारला होता! आणि हे नाकारण्यातच तर गौतम बुद्धांच्या अवताराचं मोठं रहस्य दडलं आहे! अगदी निखळ मनानं हे रहस्य काय आणि भगवान गौतम बुद्धांच्या रूपात भगवंतानं किती मोठी कृपा कलियुगात केली आहे, ते जाणून घेऊ.