समर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’तील १२५व्या श्लोकाकडे वळण्याआधी १२४व्या श्लोकाचा काणे महाराज आणि उमदीकर महाराज यांनी लावलेला अन्वयार्थ आपण जाणून घेणार आहोत. श्रीकृष्ण आणि बुद्ध या दोन अवतारांचा उल्लेख करताना समर्थ म्हणतात की, ‘‘तये द्रौपदीकारणें लागवेगें। त्वरें धांवतू सर्व सांडूनि मागें। कळीलागि जाला असे बौद्ध मौनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।।’’ श्रीभाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या विवेचनानुसार प्र. ह. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘मनोबोधामृत’ या पुस्तकात ‘द्रौपदी’चा अर्थ दोन डोळे असा केला आहे. यामागचं कारण कुलकर्णी यांनी विशद केलं नसलं तरी थोडा विचार केला तर काही गोष्टी जाणवतात. द्रौपदी ही द्रुपद राजाची कन्या. द्रुपद या शब्दाचा एक अर्थ दृढ चरणाचा अर्थात आपल्या भूमिकेवर दृढ असणारा, असा आहे. त्याचप्रमाणे ‘द्रु’ हा शब्द द्रुत गतीही सूचित करतो. ‘‘तये द्रौपदीकारणें लागवेगें। त्वरें धांवतू सर्व सांडूनि मागें।’’ या चरणाचा जो अर्थ उमदीकर महाराज सांगत आहेत तो हे शब्दार्थ ध्यानात घेतल्यावर डोळ्यासमोर उभा राहातो. हा अर्थ उमदीकर महाराज सांगतात की, ‘‘दोन्ही डोळे नासाग्रदृष्टी ठेवून नामस्मरणात राहिले तर देव धावून येऊन दर्शन देतो. तू बोलावल्याबरोबर तो येतो.’’ या अर्थाच्या परिशीलनातूनच अनेक अर्थच्छटा प्रकाशमान होऊ  लागतात. दोन्ही डोळे नासाग्र दृष्टी होणं, याचाच अर्थ जगात विखुरलेली दृष्टी जी आहे, जगात विखुरलेलं जे ध्यान आहे ते केवळ चैतन्य तत्त्वाशीच दृढ होणं! श्वास-उच्छ्वास प्रक्रियेची जाणीव नासाग्री लक्ष केंद्रित होऊ  लागताच स्थिरावू लागते; पण ही केवळ देह जिवंत राखणारी प्रक्रिया नाही. चैतन्य तत्त्वाचं अंतर्बाह्य़ स्फुरण असलेली अशी ती प्रक्रिया आहे. त्यामुळे जगातलं लक्ष त्या चैतन्य तत्त्वावर केंद्रित होऊ  लागलं की कुंडलिनी शक्ती जागृत होऊ  लागते. ध्यानाचं, लक्ष्याचं केंद्र केवळ परम तत्त्वच असेल तर मग त्वरेनं ही शक्ती ऊध्र्वगामी होत परमोच्च बिंदूपर्यंत उसळी मारल्यागत प्रवाहित होऊ  लागते. कुंडलिनीचा हा प्रवास ‘मागे’ होतो ना? म्हणून हा चरण सांगतो, ‘‘त्वरें धांवतू सर्व सांडूनि मागें!’’ हा देव धावून येतो आणि दर्शन देतो म्हणजे काय? तर ही सुप्त परम चैतन्य शक्तीच एक एक चक्र शुद्ध करीत म्हणजे वासनास्थिती निर्वासन करीत, आसक्ती सांडत जगण्यात पदोपदी विलसू लागते. पुढे, ‘‘कळीलागि जाला असे बौद्ध मौनी।’’ या चरणाचा अर्थ उमदीकर महाराज सांगतात की, ‘‘या शरीरापुढे तो बौद्धरूप धारण करून मौन धरून उभा राहातो. ध्यानात समोर दिसणारे रूप बोलत नसले तरी शब्द ऐकू येतात.’’ यावर विचार करताना जाणवलं की, ज्या देहातील कुंडलिनी शक्तीच्या आधारावर परम तत्त्व जगण्यात प्रकाशमान झालं आहे त्या परम तत्त्वाशी साधलेली एकलयता ही केवळ अव्यक्त जाणीवरूपानं विलसत असते. सद्गुरूचं हे बोधरूप मौनातूनच जाणवणारं असतं.. आणि हे फार हृदयंगम सूचन आहे बरं! प्रेमाची जाणीव मौनातच असते. बोलून व्यक्त होतं ते प्रेम नव्हे. प्रेम बोलून दाखवण्याची गरज म्हणजे प्रेमाचा पुरावा शब्दांच्या आधारावर द्यावा लागण्याची गरज असते. खऱ्या प्रेमाची केवळ जाणीवच असते आणि हे प्रेम म्हणजे आसक्तीयुक्त निर्बुद्धपणा नसतो बरं का! प्रेम शब्दातून व्यक्त होईलही, पण शब्दांना ते झेपणारच नाही! खरा बोध हा असाच असतो. मूक.. सद्गुरूंना काय आवडेल, हे शब्दांनी कुणी तरी सांगितल्यावर कळण्याची स्थितीच तिथं नसते. चंद्राची प्रत्येक कला उलगडत जावी तशा बोधार्थाच्या अनंत अर्थच्छटा उलगडत बोधाचा पूर्णचंद्र अंत:करणात प्रकाशमान होतो. चंद्र आणि त्याचा प्रकाश यांचा कलकलाट असतो का? तसा हा बोधचंद्र आणि त्याचा अंत:करणात पसरलेला प्रकाश नि:शब्द तृप्त असतो!