सद्गुरू या जगात अवतरतो आणि वावरतो तो नेमका कुणासाठी? समर्थ म्हणतात, ‘जनाकारणें’ म्हणजे जनांच्यासाठी. आता जन शब्दाचा अर्थ ‘सामान्य लोक’ असा नाही, हे आपण मागेच जाणलं आहे. जन म्हणजे मुमुक्षु, साधक, भक्त, संत आणि निजजन. अर्थात जे अध्यात्माच्या वाटेवर खऱ्या प्रामाणिक भावनेनं आले आहेत असे मुमुक्षु, जे या वाटेवर चालण्याचा अर्थात संतजनांच्या बोधानुरूप जीवन जगण्याचा अभ्यास करीत आहेत असे साधक, जे संतसंगतीनं परमात्म्याविषयीच्या शुद्ध भावानं तन्मय होऊ लागले आहेत असे भक्त, जे परमात्म्याशी तादात्म्य पावले आहेत असे संत आणि ज्यांचा जीवन व्यवहार म्हणजे परमात्म इच्छेचंच प्रतििबब असे निजजन; यांच्यासाठी सद्गुरू या जगात वावरत असतात. ते अनंत लीला करतात, या सर्व लीलांचा हेतू जो ज्या पायरीवर आहे तिथून तो वरच्या पायरीवर जावा, हाच असतो. ते ‘बहूतांपरी’ म्हणजे अनेकांसाठी अनेक प्रकारचा ‘वेष’ म्हणजे अनेक प्रकारची रूपं मोठय़ा प्रेमानं धारण करतात. मात्र मनुष्य रूपात वावरणाऱ्या त्यांना ओळखणं सोपं नसतं. भगवंतानंही म्हटलं आहे ना? ‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्’ म्हणजे मी मनुष्याचा देह धारण करून आलो की मूढ लोक मला ओळखू शकत नाहीत. तर सद्गुरूला ओळखणं सोपं नसतं. आपण आपल्या मनुष्यत्वाच्या सर्व कल्पनांमध्ये फसून एक तर त्याच्याशी वागतो किंवा त्याला आपल्या कल्पनेप्रमाणे वागवू पाहतो. आपलं ‘मनुष्यत्व’ म्हणजे तरी काय? तर ‘मी’च्या आसक्तीजन्य इच्छा, कल्पना, धारणा यांचाच तो भरणा असतो. आपल्या अहंजन्य इच्छांना सद्गुरूंनी प्रतिसाद देत राहणं यालाच आपण त्यांचं प्रेम मानतो. पण सद्गुरू कर्तव्यकठोर असतात. ते ‘लीलावतारी’ असतात ना? आपल्या माणसाला ते प्रसंगी कठोर वागून योग्य मार्गावर आणतातच, पण मुमुक्षु असल्याचं भासवणाऱ्या जिवालाही तो कुठे आणि कसा बद्ध आहे, हेही दाखवून देतात. शुद्ध परमार्थालाच त्यांचा अग्रक्रम असतो. गुलाबराव महाराज म्हणत, ‘शिष्याच्या बुद्धीला वाढवून ती परमार्थप्रवण करणे हेच खरे दयाळूपणाचे लक्षण आहे!’ तर सद्गुरूच्या सर्व लीला, सर्व कृती, सर्व व्यवहार हा जिवाला परमार्थप्रवण करण्यासाठीच असतो. ‘मी’पणात अडकलेली जिवाची बुद्धी ही त्या ‘मी’पणातून सोडविल्याशिवाय ते राहात नाहीत. आजारी मूल जेव्हा आजार बळावेल अशा पदार्थासाठी हटून बसतं तेव्हा आई त्याला प्रथम समजावते, मग दटावते, मग ओरडते आणि अखेरीस फटकाही देते. अगदी त्याचप्रमाणे भवरोगानं ग्रासलेल्या जिवाच्या अहंकारास खतपाणी मिळेल असा कोणताही प्रतिसाद सद्गुरू कृतीनं वा शब्दानंही देत नाहीत. त्यांच्या या दयेचं आकलन कसं व्हावं? त्यांना मान, प्रतिष्ठा, पसा, अन्न-वस्त्रं यांच्याशी काहीच देणं-घेणं नसतं. तुम्ही पक्वान्नं वाढा की कोरडी भाकर वाढा, त्यांच्या बोधात आणि कळकळीत कणमात्र फरक पडत नाही. शंकर महाराज पाहा.. श्रीमंतांच्या गाद्या-गिरद्यांवर असताना अचानक उठायचे आणि कुणा गरिबाच्या घरी जाऊन पथारी पसरायचे! तसे सद्गुरू असतात. त्यांना ना कुणी आपला असतो ना परका. ना कुणी जवळचा असतो ना दूरचा. त्यांच्या दृष्टीनं ना कुणी लहान असतो ना मोठा. ना कुणी श्रीमंत असतो ना कुणी गरीब. ना कुणी ज्ञानी असतो ना कुणी अडाणी. सर्वाशी त्यांचा व्यवहार सारखाच असतो आणि सर्वाकडून त्यांची अपेक्षाही एकच असते.. मोह आणि भ्रमात अडकलेल्या जिवाला शुद्ध परमार्थाची वाट कळावी आणि त्याची खरी वाटचाल सुरू व्हावी. गाळात फसलेल्याला बाहेर काढायला ते आलेले असतात, ते कुणाच्या गळाला लागतात थोडेच! आणि जे गळाला लागतात, ते नि:संशय स्वत:ही गाळातच रुतलेले असतात!!