आपण साधनामार्गावर जाऊ इच्छित असू तर खऱ्या अर्थानं साधक झालंच पाहिजे. आता एखादा माणूस अन्य लोकांप्रमाणेच जगत असताना हळूहळू अध्यात्म मार्गावर वळतो आणि ‘साधक’ होतो, पण म्हणून त्याच्यात बाह्य़ बदल काही होत नाही. त्याचं घर, आप्तस्वकीय, उपजीविकेचं साधन आणि ठिकाण, हे सारं तेच राहातं. मग बदल नेमका कुठे होतो किंवा कुठे झाला पाहिजे? तर हा बदल निव्वळ आंतरिक आहे! साधकाच्या जीवनाचं बाह्य़ रूप लगेच बदलत नाही, पण त्याचं आंतरिक रूप मात्र बदलू लागतं. जीवन तसंच असतं, जीवनातले चढउतार त्यातली माणसं तशीच असतात, पण त्या जीवनाकडे, त्यातल्या चढउतारांकडे, परिस्थितीकडे, माणसांकडे पाहण्याची दृष्टी बदलली असते. आधी ज्या प्रसंगात आपण एकदम खचून गेलो असतो त्याच प्रसंगात मनाची उमेद टिकून राहू लागते. ज्या प्रसंगानं हुरळून गेलो असतो, त्या प्रसंगातही मन जागं राहातं आणि हर्षांतिरेकानं आपण बेफिकीर होत नाही, हे जाणवू लागतं. तेव्हा आंतरिक जीवनदृष्टी बदलणं हे साधनाभ्यासातील खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. मग लोकांना ज्या गोष्टींचा हव्यास आहे, त्या गोष्टींचा आपल्याला तिटकारा नसला, तरी हव्यास उरत नाही. लोकांना ज्या गोष्टी तासन्तास बोलूनही कंटाळा येत नाही, त्या गोष्टी बोलण्यात पूर्वीसारखी ओढ उरत नाही.  या उलट लोकांना ज्या गोष्टींचा हव्यास आहे, त्यांचाच आपल्यालाही हव्यास असेल तर.. लोकांना ज्या वायफळ गोष्टी बोलण्यात रस आहे त्याच गोष्टी बोलण्यात आपल्यालाही गोडी वाटत असेल तर आपण अजून खऱ्या अर्थानं अभ्यासाला लागलेलो नाही, आपण खऱ्या अर्थानं साधक झालेलो नाही, हे निश्चित. अशाच आपल्यासारख्या साधकाला समर्थ सावध करीत सांगतात की, ‘‘रघूनायकावीण वायां सिणावें। जनासारिखें व्यर्थ कां वोसणावें।।’’ बाबा रे, सद्गुरूंशिवाय व्यर्थ का शिणतोस? लोकांप्रमाणे वायफळ गोष्टींमागे वाहवत का जातोस? मग हे चित्र पालटण्याचा जो उपाय आहे तो मनोबोधाच्या या २४व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत सांगितला आहे. समर्थ सांगतात, ‘‘सदा सर्वदा नाम वाचें वसों दे। अहंता मनीं पापिणी ते नसों दे।। ’’ सदासर्वदा वाचेनं नामाचाच उच्चार होऊ दे आणि पापिणी अहंतेला मनात स्थान नसू दे! आता सदासर्वदा नाम वाचे वसो दे, म्हणजे काय, ते पाहूच, पण त्याआधी अहंतेला पापिणी का म्हटलंय, ते पाहू. हे पाप सुबुद्धीच्या आधारावर होतं की दुर्बुद्धीच्या? तर अर्थात दुर्बुद्धीमुळेच माणसाचा तोल जातो आणि त्याच्याकडून पापाचरण घडत असतं.  आता ही दुर्बुद्धीसुद्धा कशाच्या आधारावर पोसली जात असते? तर अहंकाराच्याच! अहंकारामुळे माणसाला योग्य काय आणि अयोग्य काय, चांगलं काय आणि वाईट काय, हिताचं काय आणि अहिताचं काय, हे कळत नाही. तेव्हा अहंकारावरच दुर्बुद्धी पोसली जात असते. गोंदवलेकर महाराज यांनी या दुर्बुद्धीची चपखल व्याख्या केली आहे. ते म्हणतात, ‘‘भगवंतापासून दूर करते ती दुर्बुद्धी!’’ तेव्हा अहंकारामुळेच माणसाच्या मनात दुर्बुद्धी फोफावते.  त्यातूनच भगवंताचं विस्मरण घडतं आणि शाश्वताच्या विस्मरणातच समस्त पापाचरणाचा उगम असतो. म्हणूनच समर्थ या अहंतेला पापिणी म्हणतात! ही अहंता भगवंताचं विस्मरण घडविते म्हणजेच जे जे शाश्वत आहे, व्यापक, सर्वातीत, शुद्ध आणि सत्य आहे त्यापासून दूर करते. माझ्या मनात अशाश्वताची गोडी वाढवते, असत्यच बिंबवते आणि मनाला अधिकाधिक संकुचित करीत राहाते. त्यामुळे सद्गुरूंचा आंतरिक आधार दृढ धरण्यासाठी आणि अहंतेपासून मुक्त होण्यासाठी समर्थ म्हणतात, ‘‘सदा सर्वदा नाम वाचे वसो दे!’’

– चैतन्य प्रेम

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
pune mahametro marathi news, metro station name change pune marathi news
पुणे मेट्रोच्या स्थानकांचे आता नामांतर! जाणून घ्या कोणत्या स्थानकांची नावे बदलणार…
Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
Overcrowding on footbridges at Thane station
ठाणे स्थानकातील पादचारी पुलांवर गर्दीचा महापूर